सावरकरांविषयी आक्षेपार्ह माहिती दिल्याचे प्रकरण
मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) – म. गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. याप्रमाणे काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या मुखपत्रांमध्ये ‘जनमानसातील शिदोरी’ या मुखपत्रकात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, समलैंगिक होते, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाहीत’, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ‘जनमानसातील शिदोरी’ या मुखपत्रकावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत दिली.
संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध अमरावती येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुठल्याही महापुरुषाविरुद्ध कुणी अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. पण त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या… pic.twitter.com/rCGeFzJjmU— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 2, 2023
विरोधकांनी पू. संभाजीराव भिडे यांच्यावर कारवाई करण्याविषयी सरकारला खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमरावती येथे एका कार्यक्रमात पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी त्यांच्या एका सहकार्याला पुस्तकातील माहिती वाचायला सांगितली. ती २ पुस्तके डॉ. एस्.के. नारायणाचार्य आणि नारायण घोष यांची आहेत. घोष यांचे ‘द कुराण अँड द फकिर’ यांच्या १९२ पानांच्या पुस्तकातील २० व्या प्रकरणामध्ये हा भाग देण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम १५३अ, ५००, ५०५ अन्वये पू. भिडे (गुरुजी) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच त्यांना सी.आर्.पी.सी. १४१ नुसार नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी ती स्वीकारली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) हे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून गडकोट मोहीम घेतात. त्यांचे कार्य चांगले असून ते बहुजन समाजाला जोडत आहेत. असे असले, तरी कोणत्याही महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा कुणालाही अधिकार नाही. कुणीही महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले, तर कारवाई केली जाईल. ‘अमरावती येथील पू. भिडे (गुरुजी) यांच्या कार्यक्रमाची ध्वनीचित्रचकती उपलब्ध नाही’, असे तेथील पोलिसांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये जी ध्वनीचित्रचकती प्रसारित होत आहेत, ती वेगळीच आहे. दुसर्या एका व्हिडीओमध्ये २ वेगवेगळे आवाज येत आहेत; म्हणून आवाजाची पडताळणी करून सत्यता पडताळली जात आहे.
जसे ‘भाई’ तसेच ‘गुरुजी’ हे नाव !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचा उल्लेख ‘संभाजी भिडे गुरुजी’ असा आदरार्थी केला. यावर काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी आक्षेप घेतला. यावर फडणवीस म्हणाले, ‘‘जसे तुम्हाला सर्वजण ‘भाई’ म्हणतात, तसेच संभाजी भिडे यांनाही ‘गुरुजी’ नावाने ओळखले जाते.’’
पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावरील कारवाईवरून विधान परिषदेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग !
पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांना सरकार पाठीशी घालत असल्याच्या आरोप करत विधान परिषदेत विरोधकांनी दुसर्यांदा गोंधळ घातला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवेदन करत असतांना त्यांनी भिडे यांचा उल्लेख ‘गुरुजी’ असा केला. यावर काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी आक्षेप घेतला. यावर सरकार संभाजी भिडे यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी घोषणा देत सभात्याग केला.