काँग्रेसचे राहुल गांधी आणि वाद : एक समीकरण

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि वाद हे समीकरण काही थांबायला सिद्ध नाही. त्‍यातही कोणत्‍याही देशात ते गेले आणि वादग्रस्‍त विधाने केली नाहीत, असे कधी घडले नाही. जून २०२३ मध्‍ये अमेरिकेच्‍या दौर्‍यात त्‍यांनी चीनचे सूत्र वगळता उर्वरित सर्व सूत्रांवर ‘घरची धुणी परदेशी धोबी घाटावर धुतली’. अर्थात् त्‍यांतील काही भाग राहुल यांना चर्चेत बोलायला भाग पाडण्‍यात आला, असे असले, तरी त्‍याला राहुल बगल देऊ शकले असते. काही प्रश्‍न अडचणीचे होते. त्‍याला उत्तर देतांना वेळ निभावून नेली असती, तर अधिक चांगले झाले असते; परंतु एखाद्या निर्णयाचे समर्थन करतांना आपण ‘भाजपच्‍या हाती आयते कोलित देत आहोत’, हे त्‍यांच्‍या लक्षात आले नाही. ‘मुस्‍लिम लीग धर्मांध पक्ष असतांना त्‍याच्‍याशी युती कशी केली ?’, या प्रश्‍नावर राहुल म्‍हणाले, ‘‘अशी चर्चा करणार्‍यांना इतिहासाची जाणीव नाही. मुस्‍लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे.’’ त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यावर भाजपने प्रश्‍न उपस्‍थित केले. मुस्‍लिम लीग आणि काँग्रेसच्‍या इतिहासावरही चर्चा झाली. केरळमधील काँग्रेस आणि मुस्‍लिम लीग यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत; पण या पक्षाच्‍या स्‍थापनेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता, हेही वास्‍तव आहे.

१. देशाच्‍या फाळणीनंतर महंमद इस्‍माईल यांनी मुस्‍लिम लीग स्‍थापन केली !

खरेतर देशाच्‍या फाळणीनंतर महंमद अली जिना यांच्‍या नेतृत्‍वाखाली मुस्‍लिम लीग विसर्जित झाली. यानंतर जिना यांनी पूर्व आणि पश्‍चिम पाकिस्‍तानमध्‍ये दोन स्‍वतंत्र मुस्‍लिम लीग स्‍थापन केल्‍या होत्‍या. भारतात वर्ष १९४८ मध्‍ये ‘इंडियन युनियन मुस्‍लिम लीग’ची स्‍थापना झाली. या पक्षाची स्‍थापनाही काँग्रेसच्‍या पूर्वाश्रमीच्‍या नेत्‍याने केली होती. तमिळी नेते महंमद इस्‍माईल यांनी वर्ष १९२० च्‍या सुमारास काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला. देश स्‍वतंत्र झाल्‍यावर त्‍यांनी ‘इंडियन युनियन मुस्‍लिम लीग’ स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला; मात्र या निर्णयाला इस्‍माईल यांच्‍या अनेक मित्रांनी विरोध केला होता. पंडित नेहरूही असा पक्ष स्‍थापन करण्‍याच्‍या बाजूने नव्‍हते. गव्‍हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांनी महंमद इस्‍माईल यांना मुस्‍लिम लीग स्‍थापन करण्‍याचा त्‍यांचा हेतू सोडण्‍याचा सल्ला दिला होता. नेहरू म्‍हणाले होते, ‘‘आता देशात मुस्‍लिम लीगची काय आवश्‍यकता आहे ?’’ ‘धर्मनिरपेक्ष राजकारणाचे प्रणेते’ म्‍हणवल्‍या जाणार्‍या जवाहरलाल नेहरूंचे असे मत होते की, ‘भारतीय मुसलमानांना आता लीगसारख्‍या पक्षाची आवश्‍यकता नाही. काँग्रेस मुसलमानांचे प्रतिनिधित्‍व करते आणि त्‍यातूनच मुसलमानांना सार्वजनिक जीवनात स्‍थान मिळू शकते.’ तरीही महंमद इस्‍माईल यांना ते मान्‍य नव्‍हते आणि त्‍यांनी मुस्‍लिम लीगची स्‍थापना केली.

२. राहुल गांधी यांनी मुस्‍लिम लीगला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र देण्‍यामागील पार्श्‍वभूमी !

मुस्‍लिम लीगच्‍या स्‍थापनेनंतर फेब्रुवारी १९५७ मध्‍ये केरळमधील एका सभेत नेहरू यांनी तत्‍कालीन ‘पी.एस्.पी.’ पक्षाच्‍या मुस्‍लिम लीगसोबतच्‍या मैत्रीवर टीका केली होती. नेहरू म्‍हणाले होते, ‘‘मुस्‍लिम लीग दुसर्‍याच्‍या इशार्‍यावर चालते.’’ ते उघडपणे काहीही बोलले नाहीत; पण त्‍यांचा रोख शेजारच्‍या देशाकडे होता, हे स्‍पष्‍ट होते. पुढे संघ परिवाराकडून मुस्‍लिम लीगवरही असेच आरोप करण्‍यात आले. मुस्‍लिम लीगने स्‍वतःला ‘एक मुसलमान संघटना’ म्‍हणून तिच्‍या संकेतस्‍थळावर वर्णन केले आहे; मात्र इतर समाजातील लोकांशी चांगले संबंध ठेवण्‍याचा प्रयत्नही त्‍यांनी आपल्‍या उद्दिष्‍टांमध्‍ये समाविष्‍ट केला आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी अमेरिकेच्‍या दौर्‍यात मुस्‍लिम लीगला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र दिले.

३. राहुल गांधी यांच्‍या वक्‍तव्‍यावर भाजप नेत्‍यांनी दिलेले प्रत्‍युत्तर

३ अ. भाजपचे अमित मालवीय यांनी राहुल यांच्‍यावर केलेली टीका : वॉशिंग्‍टन येथील ‘नॅशनल प्रेस क्‍लब’मध्‍ये आयोजित कार्यक्रमात राहुल यांना केरळमधील ‘मुस्‍लिम लीग’शी केलेल्‍या युतीवर प्रश्‍न उपस्‍थित केला. तेव्‍हा त्‍यांनी दिलेले उत्तर आता वादाच्‍या भोवर्‍यात सापडले आहे. ‘इंडियन युनियन मुस्‍लिम लीग’ हा केरळचा पक्ष आहे. हा काँग्रेसच्‍या नेतृत्‍वाखालील ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चा (‘यू.डी.एफ्.’चा) पारंपरिक सहयोगी आहे. राहुल यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध भाजपने केला आहे.

भाजपचे अमित मालवीय

भाजपचे अमित मालवीय म्‍हणाले, ‘‘वायनाडमध्‍ये आपली स्‍वीकारार्हता टिकवून ठेवण्‍यासाठी मुस्‍लिम लीगला ‘धर्मनिरपेक्ष पक्ष’ म्‍हणण्‍यापर्यंत राहुल हतबल झाले. खरेतर त्‍यांनी परदेशी भूमिकेवर देशाची लोकशाही, सत्ताधारी पक्ष आदींवर भाष्‍य टाळायला हवे होते; परंतु मोदी जशी परदेशी भूमीवर भारतातील विरोधी पक्षांचे वस्‍त्रहरण करतात, तेच राहुल यांनीही केले आहे. ‘वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुका पंतप्रधान मोदी जिंकणार नाहीत’, असे राहुल यांनी अमेरिकेत म्‍हटले आहे. चीन भारतावर काहीही लादू शकत नाही आणि भारत अन् चीनचे संबंध सोपे नाहीत, ते कठीण होत आहेत’’, असे सांगतांना मोदी सरकारची एका सूत्रावर पाठराखणही केली.

कॅलिफोर्नियातील स्‍टॅनफर्ड विद्यापिठाच्‍या कॅम्‍पसमध्‍ये विद्यार्थ्‍यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना राहुल म्‍हणाले, ‘‘पुढील ५-१० वर्षांत भारत आणि चीन यांच्‍यातील संबंध सुधारणे अवघड आहे.’’ एकीकडे मोदी सरकारची परराष्‍ट्र धोरणाविषयी पाठराखण करतांना त्‍यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्‍यांनी सरकारवर मुसलमानांची अवस्‍था ‘दलितांसारखी’ केल्‍याचा आरोप केला. त्‍यावरून आता ‘एम्.आय.एम.’ पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्‍यांच्‍यावर टीका केली आहे.

३ आ. भाजप नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ‘राहुल यांच्‍यावर प्रत्‍येक भारतियाने बहिष्‍कार टाकावा’, असे सांगणे : सॅन फ्रॅन्‍सिस्‍कोमध्‍ये आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेचा उल्लेख केला. सरकारकडून यात्रा रोखण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. राहुल म्‍हणाले की, ‘आज भारतात मुसलमानांच्‍या संदर्भात जे घडत आहे, ते ८० च्‍या दशकात दलितांच्‍या संदर्भात घडायचे. या आव्‍हानाला सामोरे जावे लागेल’, असे ते म्‍हणाले. विशेष म्‍हणजे ८० च्‍या दशकात भारतात इंदिरा गांधी यांच्‍या नेतृत्‍वाखालील काँग्रेसचे सरकार होते. यापूर्वी ब्रिटीश विद्यापिठातही या सूत्रावरून त्‍यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. राहुल यांच्‍या या वक्‍तव्‍यावर भारतातील राजकारण तापले. भाजपने राहुल यांच्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केल्‍याचा आरोप केला. भाजपचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज म्‍हणाले, ‘‘जगभरातील देशांचे नेते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतांना थकत नाहीत आणि राहुल गांधी परदेशात जाऊन मोदी यांचा अपमान करतात. अशा नेत्‍यावर प्रत्‍येक भारतियाने बहिष्‍कार टाकला पाहिजे.’’

एकीकडे भाजप आणि ओवैसी यांनी टीका केली असली, तरी राहुल यांच्‍या वक्‍तव्‍याच्‍या समर्थनार्थ विरोधी पक्ष एकवटले. सर्वांत अगोदर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल यांच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन केले. संजय राऊत म्‍हणाले, ‘‘काँग्रेसचे नेते काहीही चुकीचे बोलले नाहीत. राहुल यांनी केवळ देशाचे प्रश्‍न मांडले आहेत. देशात राजकारण करणे अत्‍यंत भयावह झाले आहे. राहुल यांनी अमेरिकेत लोकशाही व्‍यवस्‍थेच्‍या काही घटकांवर सरकारचा अंकुश कसा वाढत आहे, यावर भाष्‍य केले होते.’’ त्‍यावरूनही आता टीका चालू आहे.

– भागा वारघडे

(साभार : फेसबुक)