पणजी, ३० जुलै (वार्ता.) – चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्या पारंपरिक गणेशमूर्तीकारांना त्यांचा व्यवसाय बंद पडण्याची भीती सतावत आहे. राज्यातील चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार्या ग्रामस्तरावरील मूर्तीकारांनी ही व्यथा प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
राज्यात पूर्वी गावस्तरावर श्री गणेशमूर्ती बनवणार्या अनेक चित्रशाळा होत्या आणि यातून सहस्रो श्री गणेशमूर्ती विकल्या जात होत्या; मात्र बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती येऊ लागल्यापासून या चित्रशाळांना उतरती कळा लागली आहे, तसेच अन्य अनेक कारणांमुळे या चित्रशाळा चालवणे मूर्तीकारांना कठीण होऊन बसले आहे. मूर्तीकारांच्या मते त्यांना आवश्यक अशी चिकण माती मिळत नाही. मूर्ती बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कारागीर मिळत नाहीत. नवीन पिढी या व्यवसायात उतरू पहात नाही. केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून पूर्वीपासून मूर्ती बनवणार्यांनी हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे. रंगांचे दर भरमसाठ वाढले आहेत. शासनाचे गोवा हस्तकला महामंडळ पारंपरिक मूर्तीकारांना प्रोत्साहन मिळावे; म्हणून त्यांना प्रतिमूर्ती १०० रुपये अनुदान देते. मागील अनेक वर्षांपासून प्रतिमूर्ती १०० रुपये अनुदान दिले जात आहे; मात्र महागाई मोठ्या प्रमाणात वाढूनही अनुदान अजूनही वाढवलेले नाही. श्री गणेशमूर्तींचे दर वाढवल्यास ग्राहकवर्ग नापसंती व्यक्त करतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवर राज्यात बंदी असली, तरी अशा आकर्षक आणि वजनाने हलक्या श्री गणेशमूर्ती लोकांना आवडतात. अनेक गणेशभक्त चिकणमातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती विकत घेणे पसंत करतात. या सर्व समस्यांमुळे पारंपरिक श्री गणेशमूर्तीकारांना त्यांचा व्यवसाय बंद पडण्याची भीती सतावत असून याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
(सौजन्य : Dainik Gomantak TV)
हे ही वाचा –
♦ गोवा : यंदाही अनुदानात वाढ न झाल्यामुळे शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार अप्रसन्न !
https://sanatanprabhat.org/marathi/702307.html
♦ श्री गणेशमूर्तीवरील शासकीय अनुदानात वाढ करा ! – पारंपरिक श्री गणेशमूर्तीकारांची मागणी
https://sanatanprabhat.org/marathi/506823.html
♦ शाडूच्या नावाखाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री
https://sanatanprabhat.org/marathi/599985.html
♦ सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेश मूर्ति ♦
https://www.sanatan.org/hindi/a/13320.html