वाळपई, २८ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा शासनाने शाडूमातीपासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तीवरील शासकीय अनुदानात यंदा वाढ करावी, अशी मागणी सत्तरी तालुक्यातील पारंपरिक श्री गणेशमूर्तीकारांनी केली आहे.
गोवा शासन पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बनवण्यास चालना देण्यासाठी शाडूमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्या पारंपरिक गणेशमूर्तीकारांना प्रतिमूर्ती १०० रुपये अनुदान देते आणि प्रत्येक मूर्तीकाराला अनुदानाच्या माध्यमातून सर्वाधिक १५ सहस्र रुपये मिळू शकतात. श्री गणेश मूर्तीकार म्हणाले, ‘‘आम्ही प्रत्येक श्री गणेशमूर्ती ५०० ते ८०० रुपयांपर्यंत विकतो, तरीही गावातील लोक मूर्तीचा दर अल्प करण्याची मागणी करत असतात. सांखळी, डिचोली किंवा म्हापसा बाजारात या प्रत्येक मूर्तीची किंमत ५ सहस्र रुपये आहे. मूर्ती सिद्ध करण्यासाठी आम्ही शाडूमाती महाराष्ट्रातून आणतो. या मातीच्या एका ट्रकला १० सहस्र रुपये खर्च येतो आणि वाहतूक खर्च निराळा असतो, तसेच मूर्ती रंगवण्यासाठी महागडा रंग वापरतो. यामुळे शाडूमातीपासून मूर्ती बनवणे आता परवडत नाही. यामुळे शासनाने शासकीय अनुदान वाढवून ते प्रतिमूर्ती किमान ४०० रुपये करावे.’’