विधानभवनात मनासारखे दालन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याचा कार्यालयावर बहिष्कार !

डॉ. विजयकुमार गावित

मुंबई – गेल्या २ आठवड्यांपासून चालू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत महायुती सरकारमधील एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने स्वत:ला मनासारखे, ज्येष्ठता आणि राजशिष्टाचार यांनुसार दालन न मिळाल्याने  देण्यात आलेल्या दालनावर चक्क बहिष्कार टाकत या दालनात पाय न ठेवल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत या कॅबिनेट मंत्र्याच्या अधिकार्‍यांनी स्वत:चे कामकाज चक्क मंत्रालयातून केले आहे. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित असे बहिष्कार टाकलेल्या मंत्र्याचे नाव आहे.

गेल्या २ अधिवेशनात विधानमंडळ सचिवालयाने डॉ. विजयकुमार गावित यांना त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन ज्येष्ठ मंत्र्यांच्या रांगेतील विधीमंडळातील तळमजल्यावरील २५ क्रमांकाचे दालन वितरित केले होते; मात्र ३ आठवड्यांपूर्वी राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत ९ मंत्र्यांनी थेट कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पावसाळी अधिवेशनाला आरंभ होणार असल्याने विधीमंडळ प्रशासनाने या नव्या मंत्र्यांना दालने उपलब्ध करून दिली. राष्ट्रवादीचे बहुंताश मंत्री हे ज्येष्ठ असल्याने त्यांना सामावून घेण्याकरता गावित यांचे दालन त्यांना न विचारता दुसर्‍या एका ज्येष्ठ मंत्र्याला वितरित केले. त्यामुळे भाजपचे गावित विधानमंडळ प्रशासनावर अप्रसन्न झाले. सोबतच, नवख्या मंत्र्यासह पहिल्या मजल्यावर दालन दिल्याने गावित यांनी संबंधित दालनातच न जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे डॉ. गावित यांनी लेखी तक्रारही केल्याचे समजते; मात्र त्याची अध्यक्ष नार्वेकर यांनी अद्याप नोंद घेतली नाही.