विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री ! – आमदार वेंझी व्हिएगस, गोवा

विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री (प्रतिकात्मक चित्र)

पणजी, २६ जुलै (वार्ता.) – विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री होत आहे. काही ‘पेस्ट्री’ दुकाने मारिजुआना हे अमली पदार्थ असलेले ‘ब्राऊनीस’ आणि ‘केक’ यांची विक्री करत आहेत. अशा दुकानांवर पोलिसांनी धाड टाकावी, अशी मागणी ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी विधानसभेत केली.

यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले,

‘‘राज्यातील प्रत्येक ‘पेस्ट्री’ दुकानावर धाड टाकता येणार नाही. यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. एखाद्या ‘पेस्ट्री’ दुकानातून अमली पदार्थाची विक्री होत असल्याचा संशय आल्यास  त्याविषयी अमली पदार्थविरोधी पथकाला अन्वेषण करण्यास सांगण्यात येईल.’’

अमली पदार्थ व्यवहाराविषयी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘वर्ष २०१८ ते ३० जून २०२३ या कालावधीत पोलिसांनी अमली पदार्थ व्यवहारावरून एकूण १६ अल्पवयीन मुलांवर कारवाई केली आहे आणि यामधील ६ जण हे राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत होते.’’