बंद सरकारी शाळांच्या इमारतीमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

पणजी, २५ जुलै (वार्ता.) – बंद पडलेल्या सरकारी प्राथमिक शाळांच्या इमारती या अंगणवाडी, तसेच इतर संस्था चालवत असलेले ‘फाऊंडेशन’ आणि पूर्व प्राथमिक वर्ग भरवण्यासाठी द्यायला सरकार सिद्ध आहे, अशी माहिती शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना दिली. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. सावंत उत्तर देत होते.

प्रारंभी आमदार मायकल लोबो प्रश्नादाखल म्हणाले, ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे, साधनसुविधा उपलब्ध करणे आदी सुविधा सरकारने उपलब्ध केल्या आहेत का ? बंद पडलेल्या सरकारी प्राथमिक शाळांच्या इमारती अंगणवाडी भरवण्यासाठी देणार का ?’’

यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘एखाद्या शिक्षण संस्थेच्या जवळ बंद पडलेल्या सरकारी प्राथमिक शाळेची इमारत असल्यास संबंधित शिक्षण संस्थेने त्या इमारतीचा वापर करण्यासाठी सरकारकडे रितसर मागणी करावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ‘फाऊंडेशन’ पातळीवर कार्यवाही चालू करण्यात आली आहे. सरकारच्या १३० पूर्व प्राथमिक शाळांत अभ्यासक्रम चालू आहे. पूर्व प्राथमिक शाळेच्या १३५ शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी ‘दृष्टावो’ चॅनेल चालू करण्यात आला आहे.’’