मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – जेथे मुलींची वसतीगृहे आहेत, तेथे महिला प्रबंधक नियुक्त करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. वसतीगृहात सुरक्षारक्षकांची नियुक्ती बाहेरील एजन्सींकडून करण्यात येते. असे असले तरी मुलींच्या वसतीगृहांमध्ये महिला सुरक्षारक्षक नियुक्ती करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी २५ जुलै या दिवशी विधानसभेत दिले.
आमदार आकाश फुंडकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात सुरक्षारक्षक, गृहपाल नसल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्यांनी वरील आश्वासन दिले. याविषयी अधिक माहिती देतांना शंभूराज देसाई म्हणाले की, ज्या वसतीगृहांमधील गृहपालांच्या रिक्त जागा भरण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत, तेथे महिला सुरक्षारक्षकाच्या अनुषंगाने महिला गृहरक्षकांची सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती करता येईल का ? याचाही अभ्यास करण्यात येईल.
या तारांकित प्रश्नाच्या चर्चेत आमदार सौ. भारती लव्हेकर, आमदार प्रणीती शिंदे यांनीही सहभाग घेऊन मुलींच्या वसतीगृहांचे विविध प्रश्न उपस्थित केले. याविषयी अधिवेशन संपल्यावर १ मासाच्या आता बैठक घेण्यात येईल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.