ग्राहकांनी वीजदेयकात मिळणार्‍या सवलतींचा लाभ घ्यावा !

महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण आस्थापनाचे आवाहन

चिपळूण – महावितरणच्या ग्राहकांनी तत्पर देयक (बिल) भरणा, ‘ऑनलाईन पेमेंट’ आणि ‘गो ग्रीन’च्या सुविधेमुळे वीजदेयकात मिळणार्‍या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन येथील कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी केले आहे.

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजदेयकांतील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. वीजग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजदेयकांचा भरणा केला, तर त्यांना तत्पर देयक भरणा (प्रॉम्प्ट पेमेंट) केल्याबद्दल १ टक्का सवलत मिळते. हे देयक ‘भीम ॲप’, ‘गूगल पे’, ‘पेटीएम’, बँकेचे ‘ॲप’वरून किंवा महावितरणच्या ‘वेबसाईट’वरून असे ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरले, तर पाव टक्का सवलत मिळते. ग्राहकांनी छापील कागदी बिलाऐवजी इ-मेलने देयक स्वीकारण्याचा ‘गो ग्रीनचा’ पर्यावरणपूरक पर्याय निवडला, तर प्रत्येक देयकात १० रुपये सवलत मिळते.

 

शंभर युनिट वीज वापरणार्‍या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर केला, तर प्रतिमहा किमान २० रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची सूट मिळते. २०० युनिट वीज वापरणार्‍या ग्राहकाने या तीनही उपायांचा अवलंब केला, तर प्रतिमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची सवलत मिळते. महिना ३०० युनिट वीज वापरणार्‍या ग्राहकाला तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हीचा वापर करून प्रतिमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते. विजेची देयके ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे, हे वीजग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि देयकातही सवलत मिळते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा.