Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !

भारतीय सैन्याची माहिती

(सिलीगुडी कॉरिडॉर : बंगालमध्ये असणारा अनुमाने २२ किलोमीटर लांबीचा अत्यंत अरुंद भूभाग. ईशान्येकडील ७ राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा हा एकमेव भूमार्ग आहे. त्याच्या अरुंदपणामुळे त्याला ‘चिकन नेक’ (कोंबडीची मान) संबोधले जाते.)

नवी देहली – ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य भूमीशी जोडणारा सिलीगुडी कॉरिडॉरला अनेक वर्षे याला ‘चिकन नेक’ (कोंबडीची मान) म्हटले जात; कारण मोठ्या युद्धाच्या परिस्थितीत या मार्गाला लक्ष्य केल्यास ईशान्येकडील भागाशी असलेला संपर्क तुटू शकत होता. तथापि एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय सैन्याचे म्हणणे आहे की, ही धारणा आता पालटली आहे. सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मते, हा भाग आता ‘एलिफंट्स ट्रंक’ (हत्तीची सोंड) बनला आहे, जे सामर्थ्य, लवचिकता आणि प्रभावी प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे.

भारतीय सैन्याच्या ‘ईस्टर्न कमांड’च्या म्हणण्यानुसार वर्ष २०१४ पासून केंद्रशासनाने भारताच्या पूर्व सीमेवरील धोरणात्मक सज्जता मोठ्या प्रमाणावर वाढवली. सैनिकी पायाभूत सुविधांचा विस्तार, नवीन रस्ते बांधणी, रेल्वे जाळ्यातील सुधारणा आणि आधुनिक पाळत ठेवण्याच्या यंत्रणा, तसेच सैन्याची संपर्क व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली.

सैन्याने विकसित केले ३ प्रमुख सैनिकी तळ !

१. लाचित बोरफुकन सैन्य तळ (आसाम) : धुबरी येथील बामुनी भागात असलेले हे तळ पूर्व क्षेत्रातील सैन्याच्या संपर्क आवश्यकतांसाठी एक प्रमुख केंद्र बनले आहे. हे केंद्र सैन्याची हालचाल, शस्त्रे आणि दारूगोळा साठवणूक, उपकरणांची देखभाल आणि सैनिकी पुरवठ्याचे व्यवस्थापन सुलभ करते.

२. किशनगंज फॉरवर्ड बेस (बिहार) : हे तळ कॉरिडॉरच्या पश्चिम भागाची सुरक्षा करते आणि आवश्यकता भासल्यास ईशान्येकडे जाणार्‍या सैन्याला त्वरित साहाय्य पुरवणे शक्य करते.

३. चोप्रा फॉरवर्ड बेस (बंगाल) : आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित असलेले हे तळ सिलीगुडी कॉरिडॉरच्या सर्वांत अरुंद भागावर लक्ष ठेवते. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत सैन्याचा प्रतिसाद देण्याची वेळ यामुळे लक्षणीयरित्या अल्प होते.

४. ‘चिकन नेक’वरील अवलंबित्व अल्प करण्याचा प्रयत्न : याव्यतिरिक्त ईशान्य भारताशी संपर्क साधण्यासाठी केवळ ‘सिलीगुडी कॉरिडॉर’वर अवलंबून रहाण्याची आवश्यकता अल्प करण्याच्या उद्देशाने म्यानमारमार्गे जाणार्‍या ‘कलादान मल्टी-मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट’चे कामही चालू आहे.

बांगलादेश सीमेवर वाढलेली सतर्कता !

सैन्याने नमूद केले आहे की, बांगलादेशातील राजकीय परिवर्तन आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता भारताने आपल्या पूर्व सीमेवरही पाळत वाढवली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आधुनिक पाळत ठेवण्याच्या यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत.

चीनवरही लक्ष केंद्रित !

सैन्य चीनच्या चुंबी खोरे क्षेत्रावरही बारीक लक्ष ठेवून आहे. भूतान आणि सिक्किम यांच्यामध्ये असलेला हा भाग सिलीगुडी कॉरिडॉरच्या जवळ असल्यामुळे नेहमीच सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या क्षेत्रातील भारताच्या ‘त्रिशक्ती कॉर्प्स’ला आधुनिक शस्त्रास्त्रे देऊन अधिक बळकट करण्यात आले आहे.