

पंढरपूर – आषाढ शुक्ल अष्टमीच्या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश झाला. यापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूरबुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण पार पडले, तर माळशिरस तालुक्याच्या हद्दीत संत सोपानदेव महाराज (सोपानकाका) यांच्या पालखीशी भावपूर्ण बंधूभेट झाली.
वेळापूर येथून प्रस्थान केल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठाकूरबुवा समाधी येथे पोचली. येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘माऊली… माऊली…’च्या जयघोषात गोल रिंगण पार पडले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्यांची बंधूभेट झाली.

दोन्ही पालख्यांचे रथ काही वेळ समोरासमोर थांबवण्यात आले. या वेळी दोन्ही संस्थानांच्या मानकर्यांनी परस्परांना मानाचा नारळ आणि प्रसाद अर्पण केला. या प्रसंगी वारकर्यांनी ‘विठ्ठल…विठ्ठल..’ असा जयघोष केला. त्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोचली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी बोरगावमार्गे तोंडले-बोंडले येथे पोचली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
श्री विठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षण !
दिंडी चालली, दिंडी चालली ।
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त