गुरूंची आवश्‍यकता का ?

१. गुरु सदाचरणाकडे जाण्‍यासाठी मार्गदर्शन करतात !

एक माणूस वाळवंटातून घरी परतत असतांना वाट चुकतो. तो अन्‍न-पाण्‍याविना रात्रंदिवस चालत रहातो. सुदैवाने एक माणूस त्‍याला पहातो आणि त्‍याला त्‍याच्‍या घराकडे जाण्‍याचा सोपा मार्ग दाखवतो. याप्रमाणे या मायेतील दोषांच्‍या वाळवंटामधून सदाचरणाकडे जाण्‍याचे मार्गदर्शन करण्‍यासाठी आपल्‍याला गुरूंची नितांत आवश्‍यकता असते.

२. गुरु दिव्‍याप्रमाणे असतात !

अ. माणूस अंधारात चालत असतांना धडपडतो; परंतु त्‍याने स्‍वतःसमवेत विजेरी घेतल्‍यास तिच्‍यामुळे मार्गावर प्रकाश पसरून त्‍याला मार्ग स्‍पष्‍टपणे दिसतो. गुरु हे विजेरीप्रमाणेच असतात. ते लोकांना अज्ञानाच्‍या अंधारातून पुढे जाण्‍याचे मार्गदर्शन करतात.

आ. रस्‍त्‍यावरचा दिवा येणार्‍या जाणार्‍या लोकांना प्रकाश दाखवतो, तर भक्‍तांना आध्‍यात्मिक ज्ञानरूपी प्रकाश दाखवण्‍यासाठी गुरु झटत असतात.

३. गुरूंविना ईश्‍वरदर्शन होणे अशक्‍य !

अ. हवा डोळ्‍यांना दिसत नाही; पण जेव्‍हा पंखा फिरतो, तेव्‍हा त्‍वचेला तिचा स्‍पर्श होतो.

आ. सूक्ष्म असा अणू आपण डोळ्‍यांनी पाहू शकत नाही; परंतु सूक्ष्मदर्शक यंत्राच्‍या साहाय्‍याने तो पाहू शकतो.

इ. तीव्र अज्ञानामुळे माणूस आंधळा बनतो; मात्र गुरु अज्ञान दूर करून ईश्‍वराचे दर्शन घडवतात.

ई. त्‍याचप्रमाणे उच्‍चतम चैतन्‍यशक्‍ती आपण अनुभवू शकत नाही; मात्र गुरूंच्‍या साहाय्‍याने ती अनुभवू शकतो.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘सुगम अध्‍यात्‍म’)

ईश्‍वरप्राप्‍तीसाठी गुरु आवश्‍यक !

‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’, असे संतश्रेष्‍ठ ज्ञानदेवांनी म्‍हटले आहे. ज्ञान देतात, ते गुरु ! शिळेपासून शिल्‍प बनू शकते; पण त्‍यासाठी शिल्‍पकार लागतो. त्‍याप्रमाणे साधक आणि शिष्‍य ईश्‍वराला प्राप्‍त करू शकतात; पण त्‍यासाठी गुरूंची आवश्‍यकता असते. गुरूंनी आपल्‍या बोधामृताने साधक आणि शिष्‍य यांचे अज्ञान दूर केल्यावर त्यांना ईश्‍वरप्राप्‍ती होते.