शिष्‍याचे प्रकार : उत्तम, मध्‍यम आणि कनिष्‍ठ !

१. उत्तम

उत्तमाधिकारी शिष्‍य म्‍हणजे जीवत्‍व प्राप्‍त होऊन दुःख होत असले, तरी शास्‍त्राभ्‍यासामुळे ‘मी जीव नसून खराखुरा शिव आहे’, असा निश्‍चय झाल्‍यामुळे ज्‍याचा अनादी भ्रम गेला आहे; परंतु जीवदशा मावळली नाही आणि शिवत्‍वाची अनुभूती येत नाही, अशा अवस्‍थेत सापडलेला साधक ! आपल्‍या मूळ शिवत्‍वाच्‍या प्राप्‍तीसाठी पाण्‍याविना मासा जसा तळमळत असतो, तसा तो तळमळत गुरूंच्‍या शोधात हिंडत असतो. अशा वेळी प्रत्‍यक्ष ईश्‍वरच त्‍याच्‍या श्री गुरूंचे रूप घेऊन त्‍याच्‍यापुढे उभा रहातो. त्‍याचा नमस्‍कार, म्‍हणजे संपूर्ण शरणागती ! ती झाल्‍यावर गुरूंची जी दृष्‍टी त्‍याच्‍यावर पडते, त्‍यानेच तो कृतार्थ होतो.

उत्तमाधिकारी शिष्‍य त्‍याच्‍या साधनकाळात येणार्‍या कोणत्‍याही ऋद्धी-सिद्धीला बळी पडत नाही. विश्‍वब्रह्मांडातील यच्‍चयावत् रहस्‍ये जरी त्‍याच्‍यापुढे नग्‍न उभी राहिली, तरी ती त्‍याला त्‍याच्‍या ध्‍येयापासून यत्‍किंचितही विचलित करू शकत नाहीत आणि तो सत्‍पदाची प्राप्‍ती करून घेतो.

२. मध्‍यम

गुरु मध्‍यमाधिकार्‍याला त्‍याच्‍या प्रश्‍नांच्‍या उत्तरांनी ज्ञान देतात. हा योगारूढ झालेला नसल्‍याने कर्मयोगाचा अधिकारी असतो. हा सत्त्व-रजप्रधान असतो.

३. कनिष्‍ठ

कनिष्‍ठ किंवा अधम अधिकार्‍याकडून पुष्‍कळ सेवा घेऊन गुरु त्‍याला ज्ञान देतात. याला काही जन्‍म साधना करावी लागते. हा रजप्रधान असतो. मध्‍यम आणि कनिष्‍ठ अधिकारी हळूहळू उत्तमाधिकारी होऊ शकतात; पण तसा अपवाद एखादाच ! बहुसंख्‍य ऋद्धी-सिद्धी, लोकेषणा आदींना बळी पडतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्‍य’)