सद़्गुरुवांचूनी सांपडेना सोय ।
धरावे ते पाय आधीं त्याचे ॥
आपणासारिखे करिती तात्काळ ।
नाहीं काळ वेळ मग त्यासी ॥
लोह परिसाची न साहे उपमा ।
सद़्गुरुमहिमा अगाधचि ॥
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन ।
गेले विसरुन खर्या देवा ॥
– संत तुकाराम महाराज
अर्थ : सद़्गुरु लाभल्याविना (मोक्षाला जाण्याचा) मार्ग सापडत नाही; म्हणून प्रथम त्यांचे पाय धरावेत. (त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत.) सद़्गुरु त्यांच्या शिष्याला क्षणार्धात स्वतःसारखे (मोक्षाचे अधिकारी) करतात. त्यांना काळ, वेळ लागत नाही. सद़्गुरूंचा महिमा एवढा अगाध आहे की, त्यांना लोह-परिसाची उपमाही शोभत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ‘लोक असे कसे आंधळे झाले आहेत ? ते खर्या देवालाच (सद़्गुरूंनाच) विसरले आहेत.’
शिष्यामध्ये आवश्यक असणारे गुण !
१. मुमुक्षत्व, २. आज्ञाधारकपणा, ३. नम्रता, ४. सर्वस्वाचा त्याग करणारा, ५. अर्पण केलेल्या गोष्टीचा विचार न करणारा, ६. ‘जाणूनी श्रींचे मनोगत’ या भावाने सेवा करणारा, ७. सेवेतील प्राधान्य आणि तारतम्य ओळखणारा, ८. सेवेसाठी कुठेही जाण्याची सिद्धता असणारा, ९. गुरुसेवेत बुद्धीचा अडथळा न आणणारा, १०. संपूर्ण शरणागती, ११. गुरुसान्निध्यात रहाणारा, १२. साधकत्व असणारा, १३. गुरूंना मान देणारा, १४. तळमळ, जिज्ञासा असणारा, १५. गुरूंविषयी अनन्यभाव असणारा, १६. ‘सद़्गुरु’ हेच सर्वस्व असणारा
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)