गोवा राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी चालूच : जनजीवन विस्कळीत

गोव्यात दुसर्‍यांदा विक्रमी पाऊस !

पणजी, ६ जुलै (वार्ता.) – बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीय वारे, तसेच अल्प दाबाचा पट्टा यांमुळे राज्यात ५ जुलैपासून मुसळधार पाऊस चालू आहे. ६ जुलै या दिवशीही हवामान खात्याने अतीवृष्टीची चेतावणी दिली होती. ६ जुलै या दिवशी सकाळपासून मुसळधार पाऊस चालू होता. यामुळे पूरस्थिती उद्भवणे, दरड कोसळणे, झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित होणे, वाहतुकीचा खोळंबा, विविध ठिकाणी सखल भागांत पाणी तुंबल्याने घरे आणि इमारती यांना पाण्याने वेढणे आदी घटना घडल्या. पावसामुळे नद्या तुडुंब भरल्या आहेत. हवामान खात्याने ७ जुलै या दिवशीही मुसळधार पावसाची (येलो अलर्टची), तर पुढील ४ दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची (ऑरेंज अलर्टची) चेतावणी दिली आहे.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पणजी येथे सर्वत्र पाणी साचले आहे. गिरी, म्हापसा येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी शेतात पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. ताळगाव येथे काही घरांतही पाणी शिरले आहे. दांडोसवाडा, मांद्रे येथे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पणजी येथे डॉन बॉस्को शाळेनजीक झाड कोसळून दुचाकीची हानी झाली. उपासनगर, सांकवाळ येथे दरड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली. पिळर्ण, साळगाव येथे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. डिचोली येथे गावकारवाडा, कुडणे आणि धनगरवाडा, कुडचिरे येथे घरांवर झाड पडले. सर्वण येथे पाणी तुंबल्याने लोकांची तारांबळ उडाली. डिचोली तालुक्यातील विविध नद्यांच्या पात्रांत पाण्याच्या पातळीत वाढ झालेली असली, तरी स्थिती नियंत्रणाखाली असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

चालू हंगामात ५ जुलै या  दिवशी दुसर्‍यांदा विक्रमी पाऊस

५ जुलै या दिवशी चालू हंगामातील दुसर्‍यांदा विक्रमी पाऊस पडला. ६ जुलै या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (मागील २४ घंट्यांत) १३३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २८ जून या दिवशी १४२.५ मि.मी. पाऊस पडला होता. चालू हंगामातील पावसाची तूट भरून निघाली आहे, तर यंदा गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा ५.८ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मागील ४ दिवसांतच गोव्यात सरासरी ४०० मि.मी. पाऊस पडला आहे.

काणकोण येथे सर्वाधिक पाऊस

५ जुलै या दिवशी काणकोण येथे सर्वाधिक १६८.८ मि.मी. पाऊस पडला आहे. पणजी येथे १५८.८ मि.मी., सांगे येथे १५५ मि.मी., मडगाव आणि मुरगाव येथे १४० मि.मी., पेडणे येथे १३०.८ मि.मी., फोंडा आणि दाबोळी येथे १२६ मि.मी., म्हापसा येथे १२५.२ मि.मी., जुने गोवे येथे १२४.५ मि.मी., केपे येथे १२० मि.मी., वाळपई येथे ८४ मि.मी. आणि साखळी येथे ८१.८ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.

मुसळधार पावसामुळे गोव्यात महिलेचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे नाकेरी येथील महिलेचा मृत्यू झाला. फ्लोरिना डिसोझा (वय ५६ वर्षे) ५ जुलै या दिवशी शेतातून घरी येत असतांना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या होत्या. डिसोझा यांचा मृतदेह ६ जुलै या दिवशी नाकेरी येथे बॉक्साईट खाणीच्या खंदकात सापडला.