ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार !
छत्रपती संभाजीनगर – शेत भूमीसाठी सावत्र मुलाने जिवंत असलेल्या आईला ग्रामपंचायतीच्या कागदोपत्री मृत दाखवण्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील आघूर येथे उघड झाला आहे. स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊनच मंगलबाई राजपूत ही महिला पंचायत समितीत आल्याने एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे ३ एकर शेतभूमी हडपण्याचा डाव मुलाने रचला असल्याचा आरोपही महिलेने केला आहे, तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने कोणतीही निश्चिती न करता हे प्रमाणपत्र कसे दिले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंगलबाई राजपूत या त्यांच्या मुलीच्या घरी रांजणगाव येथे रहातात. आघूर शिवारात त्यांची शेतभूमी आहे. ही शेतभूमी हडपण्याच्या उद्देशाने त्यांचा दीर शंकरसिंह राजपूत, त्यांची २ मुले आणि महिलेचा सावत्र मुलगा पंकज राजपूत यांनी ग्रामपंचायतीला खोटी माहिती देत त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र बनवले. पंकज राजपूत, दीपक राजपूत, शंकरसिंग राजपूत, सागर सोळुंके या सर्वांनी मिळून खोटी माहिती देऊन ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र सिद्ध केले. हे प्रमाणपत्र तलाठी कार्यालयात देऊन आपली भूमी नावावर करण्याचा त्यांचा डाव असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
वस्तूनिष्ठ अहवाल २ दिवसांत देण्याचे आदेश !
या मृत्यू प्रमाणपत्रावर गंभीर स्वरूपातील चुका दिसून आल्याने त्याच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित होत आहे. महिलेचा मृत्यू १२ मे २०२३ या दिवशी झाल्याचे म्हटले असतांना नोंदणी मात्र मागील वर्षी १७ मे २०२२ या दिवशी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र ग्रामसेवकानेच दिले कि अन्य कुणी शिक्क्यांचा वापर करून सिद्ध केले ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिवंत महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र कोणत्या आधारे देण्यात आले ? याविषयी वस्तूनिष्ठ अहवाल येत्या २ दिवसांत देण्याचे आदेश ग्रामसेवक के.जे. काळे यांना पंचायत समिती प्रशासनाने दिले आहेत.
संपादकीय भूमिका :केवळ पैशांसाठी हा सर्व खटाटोप करणारे महिला जिवंत असतांनाही खोट्या कागदपत्रांद्वारे मृत्यूचे प्रमाणपत्र देणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी. |