संत किंवा उन्‍नत साधक यांच्‍याविषयी विकल्‍प बाळगून पाप ओढवून घेऊ नका !

पू. संदीप आळशी

‘सनातनचे बरेच संत किंवा उन्‍नत साधक विविध सेवांचे दायित्‍व पहातात. काही वेळा त्‍यांनी साधकांना एखादी चूक दाखवली किंवा निर्णय दिला आणि साधकांना तो पटला नाही, तर साधकांना त्‍यांच्‍याविषयी नकारात्‍मक प्रतिक्रया किंवा विकल्‍प येतात. चूक दाखवण्‍यामागील किंवा निर्णयामागील कारणमीमांसा नीट समजून न घेता किंवा त्‍या निर्णयासंबंधाने स्‍वतःच काहीतरी समज करून घेऊन साधक दोषांच्‍या आहारी जातात अन् स्‍वतःच्‍या साधनेची हानी करून घेतात.

संत किंवा उन्‍नत साधक यांच्‍याविषयी विकल्‍प येणे, हे पापकारक आहे. विकल्‍प येणार्‍या साधकाची आध्‍यात्मिक पातळी जितकी जास्‍त, तेवढे या विकल्‍पामुळे त्‍याला लागणारे पाप जास्‍त. तसेच विकल्‍प जितका जास्‍त पातळीच्‍या व्‍यक्‍तीविषयी येतो, तितके लागणारे पापही जास्‍त असते.

असे पाप आपल्‍याला लागू नये, यासाठी साधकांनी विकल्‍प आल्‍यास संबंधितांशी मनमोकळेपणाने बोलून घ्‍यावे. ते शक्‍य न झाल्‍यास समष्‍टी संतांशी किंवा जे साधक समष्‍टी स्‍तरावरील योग्‍य दृष्‍टीकोन देऊ शकतील, अशांशी बोलून घ्‍यावे. तो विकल्‍प मनातून काढून टाकावा. याचसह भावाच्‍या स्‍तरावर प्रयत्नही वाढवावेत. विकल्‍पाबद्दल क्षमायाचना करून प्रायश्‍चित्त घ्‍यावे. यामुळे साधकांच्‍या पापाचे परिमार्जन होण्‍यास साहाय्‍य होईल.

एकदा एका संतांनी एक लिखाण केले होते. त्‍या लिखाणाचे ग्रंथासाठी संकलन करतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी व्‍याकरणाच्‍या दृष्‍टीने त्‍यात काही पालट केले. ते पालट पाहिल्‍यावर त्‍या संतांंना ते योग्‍य वाटले नाहीत. हे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना कळल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘ते संत आहेत. संतांचे ऐकायला हवे. संत सांगतील, तसेच करूया.’’ या एका उदाहरणावरूनही ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांच्‍या मनात संतांविषयी किती अपार भाव आहे’, हे आपल्‍या लक्षात येते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचा हा आदर्श डोळ्‍यांसमोर ठेवून साधकांनीही वरीलप्रमाणे प्रयत्न केले, तर त्‍यांची अध्‍यात्‍मात लवकर प्रगती होईल.’

– पू. संदीप आळशी (२३.६.२०२३)