आषाढ कृष्ण पंचमी (७.७.२०२३) या दिवशी श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलींना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांना ७९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. सौ. कविता बेलसरे (श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांची मोठी मुलगी), पुणे
अ. ‘आमच्या बाबांचे जीवन संघर्षमय होते. त्यांना हृदयाशी संबंधित त्रासही होता, तरीही त्यांना साधना समजल्यापासून कोणतीही सवलत न घेता ते साधना करत आहेत.
आ. आता त्यांची अंतर्मुखता पुष्कळ प्रमाणात वाढली आहे.’
२.
सौ. प्रकृती कुलकर्णी (श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांची मधली मुलगी), भाग्यनगर, तेलंगाणा.
‘प.पू. गुरुमाऊलींच्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगली येथे जाण्याचा आणि आई-बाबांच्या सहवासात रहाण्याचा योग अनेक दिवसांनी आला. त्या वेळी मला बाबांच्या वागण्या-बोलण्यात पुष्कळ सहजता जाणवत होती.
२ अ. उतारवयातही प्रत्येक कृती उत्साहाने करणे आणि वडिलांवरील गुरुकृपेची जाणीव होणे : मी सांगली येथे पोचल्यावर ‘तत्परतेने आमचे सामान घेणे, चहा करणे, अल्पाहाराची सिद्धता करणे, हे सर्व ते पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने करत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या चेहर्यावर थकवा मुळीच जाणवत नव्हता. त्यांची प्रत्येक कृती आणि हालचाल चैतन्यदायी अन् उत्साही वाटत होती. त्यांना पाहून मलाच लाज वाटली. मला वाटले, ‘मी या वयातही त्यांच्यापेक्षा किती थकले आहे.’ मी हे नातेवाइकांना सांगितल्यावर सर्व जण म्हणतात, ‘‘या वयात हे सर्व करणे सामान्य माणसाला शक्यच नाही.’’ बाबांच्या समवयस्क लोकांकडे पाहिल्यावर ‘बाबांवर किती गुरुकृपा आहे !’, याची जाणीव होते.
२ आ. भाव : ते प्रत्येक कृती सहजतेने आणि भावपूर्ण करतात. ते कृती करण्यापूर्वी प्रार्थना करतात आणि नंतर कृतज्ञता व्यक्त करतात. ते नामजप करतांना भावावस्थेत असतात.’
३. सौ. गौरी कुलकर्णी (श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांची धाकटी मुलगी), पुणे
३ अ. आध्यात्मिक स्तरावर रहाणे : ‘माझे बाबांशी अल्प बोलणे होते. आमचे ‘नामजप चालू आहे ना ? नामजपादी उपाय करत आहात ना ?’, असेच आध्यात्मिक स्तरावर बोलणे होते. बाबांशी झालेल्या थोड्या वेळच्या बोलण्यातूनही मला पुष्कळ चैतन्य मिळून माझा उत्साह वाढतो.
३ आ. झोकून देऊन सेवा करणे : बाबा झोकून देऊन सेवा करतात. ते ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, ग्रंथ वितरण करणे आणि अर्पण मिळवणे, यांसाठी संपर्क करतात अन् गुरुदेवांच्या कृपेने त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो.
३ इ. वडिलांनी नामजपादी उपाय केल्यावर बरे वाटणे : एकदा सांगली येथून निघायच्या २ दिवस आधी माझी मुलगी (कु. ईश्वरी, वय १० वर्षे) आणि नंतर मी रुग्णाईत झाले. आम्हाला थंडी वाजून ताप आला होता. तेव्हा बाबांनी ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या ग्रंथातून नामजप शोधून आम्हा दोघींच्या डोक्यावर हात ठेवून नामजप केला. त्यानंतर आम्हाला बरे वाटू लागले. तेव्हा ‘बाबांनी केलेल्या प्रार्थना आणि नामजपादी उपाय यांमुळे आम्हाला लवकर बरे वाटले’, असे आम्हाला जाणवले. बाबांच्या समवेत बसून नामजप करतांना माझा नामजप चांगला होतो. माझे मन शांत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ६.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |