‘७२ हुरें’ चित्रपटाचा ‘ट्रेलर’ अनुमतीविना प्रदर्शित !

चित्रपटाला प्रमाणपत्र देणार्‍या केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचा ‘ट्रेलर’ला मात्र अनुमती देण्यास नकार !

(१. ‘७२ हुरे’ ही इस्लामी संकल्पना असून त्यानुसार इस्लामचे काटेकोर पालन करणारे स्वर्गात गेल्यावर त्यांना ७२ सुंदर युवतींचा सहवास लाभतो.
२. ट्रेलर म्हणजे चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ)

मुंबई – धर्मांतर, आतंकवाद आणि निष्पाप लोकांचा करण्यात येणारा बुद्धीभेद, या आधारावर बनवण्यात आलेल्या ‘७२ हुरें’ या चित्रपटाचे विज्ञापन करणार्‍या व्हिडिओला (‘ट्रेलर’ला) अनुमती देण्यास ‘केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळा’ने नकार दिला. चित्रपटाचे निर्माते मंडळाच्या निर्णयाविरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे जाण्याच्या सिद्धतेत आहेत. हा चित्रपट ७ जुलै या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अनुमती नाकारल्यानंतरही हा ‘ट्रेलर’ प्रसारित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट असतांना ‘ट्रेलर’ला विरोध का ? – सहनिर्माते अशोक पंडित

अशोक पंडित

चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित म्हणाले, ‘‘आम्ही चित्रपटात एका मृतदेहाचे पाय दाखवले आहेत. ते चित्रण मंडळाने हटवण्यास सांगितले आहे. कुराणचा संदर्भ काढून टाकण्यास सांगितला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे. चित्रपटाला ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’चे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यातीलच दृश्ये ‘ट्रेलर’मध्ये आहेत, मग त्यास अनुमती कशी नाकारली जाऊ शकते ? ’’

मंडळाच्या ‘ट्रेलर’ला अनुमती नाकारण्याच्या निर्णयाविषयी बोलतांना अशोक पंडित म्हणाले, ‘‘ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या या चित्रपटाला ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (‘इफ्फी’त)‘इंडियन पॅनोरमा’ विभागात पुरस्कारही मिळाला आहे. असे असतांना चित्रपटाच्या ‘ट्रेलर’ला अनुमती का नाकारली जात आहे ? केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळातच काहीतरी गडबड आहे आणि त्याला प्रसून जोशी उत्तरदायी आहेत.’’

काय आहे ‘ट्रेलर’मध्ये ?

२ मिनिटे ३१ सेकंदाच्या या ‘ट्रेलर’मध्ये मुसलमानांचा बुद्धीभेद करून त्यांना आत्मघातकी आतंकवादी कसे बनवले जाते ? हे दाखवण्यात आले आहे. हे आतंकवादी निष्पाप लोकांची हत्या करतांना दाखवण्यात आले आहे. या आतंकवाद्यांचा असा विश्‍वास आहे की, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या प्राणाची आहुती दिली, तर अल्ला त्याला ‘जन्नत’मध्ये (स्वर्गामध्ये) आश्रय देतो. या ट्रेलरमध्ये मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर झालेले बाँबस्फोट दाखवण्यात आले आहेत, तसेच जिहादी आतंकवादी लोकांचा बुद्धीभेद  करण्यासाठी ‘जिहाद’ हा शब्द कसा वापरतात ?, हे दाखवण्यात आले आहे.

आतंकवाद्यांना मृत्यूनंतर प्रत्यक्षात ‘७२ हुरें’ मिळत नसल्याचे चित्रण !

आतंकवादी आत्मघातकी आक्रमण करून स्वतःही मरतात. मृत्यूनंतर त्यांच्यातील संभाषण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यात ज्या लाभाचे आमीष दाखवून त्यांना आतंकवादी बनवून आत्मघात करण्यास भाग पाडले जाते, तो लाभ मृत्यूनंतर त्यांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांचा जळफळाट होतांना दिसत आहे, तसेच स्वतःची फसवणूक झाल्याचेही त्यांना वाटत आहे’, असेही दाखवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

इस्लाममधील संकल्पनेवर आधारित चित्रपटाचे विज्ञापन करणार्‍या व्हिडिओला (‘ट्रेलर’ला) अनुमती नाकारणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला सहज अनुमती देते, हे लक्षात घ्या !