वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात पार पडलेले ‘राष्ट्र आणि धर्म जागृती’ उद़्बोधन सत्र
विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – केवळ व्यासपिठावरून घोषणा करून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष कार्य करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम केल्यामुळे हिंदूंची शक्ती विभागली जाते. गावागावांत महिलांचे गट शासकीय योजनांद्वारे काम करत असतात. या महिलांच्या गटांना धर्मकार्यात सहभागी करून घ्यायला हवे. गावांमध्ये ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान राबवले जाते, त्याप्रमाणे संस्कारांच्या प्रसारासाठी अभियान राबवायला हवे. अशा प्रकारे संस्कार वाहिनीच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये १५ सहस्र जण कार्यरत आहेत. ही संख्या १ लाखापर्यंत पोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आर्य चाणक्य यांनी राजकीय शक्तीचा उपयोग धर्मकार्यासाठी करून घेतला. याचा आदर्श घेऊन आम्ही धर्मकार्य करत आहोत. ख्रिस्ती मिशनरी प्रलोभने दाखवून गरीब हिंदूंचे धर्मांतर करतात; मात्र आम्ही हिंदूंना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे छत्तीसगड येथील धर्मांतर रोखता आले. जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे, असे मार्गदर्शन छत्तीसगडमधील
श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज यांनी केले. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात २१ जून या दिवशी (सहाव्या दिवशी) ते मार्गदर्शन करत होते.
हिंदूंच्या प्रतीकांना आक्रमकांनी दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ! – दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, ठाणे
मोगलांतील एकाही बादशाहने कोणतेही मानवतेचे कार्य केलेले नाही. त्यांची ओळख क्रूरतेसाठी आहे. उलट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी राष्ट्र-धर्म आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. ताजमहल हा तेजोमहल, कुतुबमीनार हा विष्णुस्तंभ, तर कथित ज्ञानवापी मशीद हे भगवान शिवाचे मंदिर आहे. आक्रमकांनी दिलेली नावे, हे आक्रमकांचे उदात्तीकरण आहे. आपला इतिहास पराभवाचा नसून विजयाचा आहे. शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगरला ‘औरंगाबाद’ म्हणायचे असेल, तर त्यांनी अवश्य म्हणावे; परंतु माझ्यापुढे प्रश्न आहे की, ‘या राष्ट्राचा राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत कि औरंगजेब ?’, ‘छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल करून मारले, हे योग्य होते का ?’, ‘शरद पवार यांच्या मनात छत्रपती छंभाजी महाराज यांच्यापेक्षा औरंगजेबाविषयी आदरभाव आहे का ?’ देश स्वतंत्र झाल्यानंतर आक्रमकांनी ठिकाणांना दिलेली नावे पालटणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. औरंगजेब आपणाला प्रात:स्मरणीय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे आपल्यासाठी प्रात:स्मरणीय आहेत. आपल्या पूर्वजांनी दिलेली नावे पालटण्यामागे आपली संस्कृती नष्ट करणे, हे आक्रमकांचे षड्यंत्र होते.
ख्रिस्ती धर्म प्राचीन असल्याचा खोटा प्रचार करून ख्रिस्त्यांकडून भारतात धर्मांतर ! – एस्थर धनराज, सल्लागार, भारतीय स्वाभिमान समिती, तेलंगाणा
येशू ख्रिस्ताच्या काळात त्याचा शिष्य भारतात येऊन त्याने भारतामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, असा खोटा प्रचार ख्रिस्त्यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात १६ व्या शतकापर्यंत भारतात ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. ख्रिस्ती धर्मामध्ये सर्वाधिक अंधश्रद्धा आहे. विदेशात मोठ्या विद्यापिठांची स्थापना झाल्यानंतर पहिली १०० वर्षे तेथे ख्रिस्ती धर्माचे शिक्षण दिले गेले. त्यानंतर विद्यापिठांमध्ये अर्थशास्त्र, गणित आदी विविध विषय शिकवण्यात येत आहेत. याउलट भारताच्या विद्यापिठांमध्ये धर्माचे शिक्षण दिले जात नाही. ख्रिस्ती धर्मप्रचारक राष्ट्रविरोधी प्रचार करत आहेत. ‘जोपर्यंत भारतातील भूभाग ख्रिस्त्यांसाठी देत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मातर चालू राहील’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनर्यांचा प्रचार चालू आहे. असे असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. ख्रिस्ती धर्मप्रचारकांना हिंदु धर्माविषयी शिक्षण देऊन शत्रूभेद शिकवला जातो. सर्व हिंदूंनी ख्रिस्त्यांच्या प्रचाराचे तंत्र समजून घ्यायला हवे. हिंदूंनी याचा अभ्यास केला, तरच ते ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रतिवाद करू शकतील.
उद्योगपतींनी साधना केल्यास त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल ! – रवींद्र प्रभुदेसाई, संचालक, पितांबरी उद्योग समूह
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मार्गदर्शनामुळेच व्यवसाय करतांना धर्मसेवा करू शकत आहे. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला ‘उद़्+योजक = उद्योजक’ अशी उद्योगाची व्याख्या सांगितली. ते म्हणाले होते, ‘ज्याने ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होते, त्याला धर्म म्हणतात. आज कलियुगामध्ये अर्थशक्तीचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे अर्थशक्तीकडे दुर्लक्ष केल्यास आपली हानी होऊ शकते. तुमच्या आस्थापनातील कर्मचार्यांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे, हे तुमचे दायित्व आहे. उद्योगपतींनी साधना केल्यास त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल.’
जो ईश्वराची माहिती समाजापर्यंत पोचवतो, तो देवाला अधिक आवडतो. ‘शनीची साडेसाती दूर करण्यासाठी शनीची उपासना केली जाते’, हे लक्षात घेऊन आम्ही ‘शनि उपासना’ या उदबत्तीच्या उत्पादनाची निर्मिती केली. त्याच्या वेष्टनावर ‘शनीची उपासना कशी करावी ?’, याविषयी माहिती दिली. आपणही आपल्या उत्पादनांच्या वेष्टनावर आनंदप्राप्ती करण्यासाठी कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगणारी माहिती देऊ शकता. त्यामुळे सहस्रो लोकांपर्यंत साधना पोचू शकेल.
माझ्या आस्थापनातील सर्व १५ विभागांमध्ये कर्मचार्यांकडून प्रतिदिन वैश्विक प्रार्थना आणि मारुतिस्तोत्र म्हणवून घेतले जाते. जर आस्थापनातील कर्मचारी सात्त्विक असतील, तेथे भ्रष्टाचार होणार नाही. त्यांच्याकडून साधना करवून घेतल्यामुळे आपला लाभ वाढतो, तसेच हिंदु धर्माची सेवा होते.
कर्मचार्यांची ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे हे उद्योजकांचे दायित्व ! – संपादक |
भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेऊन त्याविरोधात लढा दिला पाहिजे ! – ऋषी वशिष्ठ, अर्थशास्त्रज्ञ, देहली
भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. काश्मीरमधील केसर आणि हिमाचल प्रदेशमधील सफरचंद यांची शेती, राजस्थानमधील खाण उद्योग, उत्तरप्रदेशमधील पान मसाला उद्योग, गुजरातमधील तेल उद्योग, कर्नाटकातील चंदनाची शेती, केरळमधील नारळाची शेती आदी रोखीची अर्थव्यवस्था संपूर्णतः मुसलमानांकडे आहे. हा केवळ योगायोग नसून सनातन हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर केला जाणारा ‘प्रयोग’ (षड्यंत्र) आहे. त्यामुळे भारतातील ही इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे, ती हिंदूंना समजावून सांगितली पाहिजे आणि त्याविरोधात लढा दिला पाहिजे.
भारतातील मोठ्या २-३ मंदिरांची अर्थव्यवस्था ही भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा अधिक आहे. ९५ टक्के हिंदू मंदिरांमध्ये दान करतात. त्या मंदिरांना या संघर्षात सहभागी करून घेता येऊ शकते. त्यांना संघटित करून राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय न्यासाची स्थापना करून अशा हिंदूंना एका समान सूत्रात संघटित केल्यास इस्लामी षड्यंत्र रोखता येऊ शकते.
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात फसलेल्या मुलींना सोडवण्यासाठी दक्षता समित्यांची स्थापना करणे आवश्यक ! – अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ
देशात लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यासाठी धर्मांध तरुण हिंदु असल्याचे सांगून हिंदु मुलींशी परिचय वाढवतात. त्यानंतर एक दिवस तिच्याशी लग्न करतात. त्या मुलीवर आधीच वशीकरण केलेले असल्याने ती त्याला सोडून जात नाही आणि तो सांगेल, त्याप्रमाणे वागायला लागते. तिने तसे न केल्यास तिला पुष्कळ मारहाण केली जाते. एक दिवस तिचे संपूर्ण आयुष्य उद़्ध्वस्त होते. अशा प्रकारे ‘लव्ह जिहाद’ मध्ये अडकलेल्या मुलींना सोडवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दक्षता समिती स्थापन केल्या पाहिजेत.
लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी चळवळ उभारायला हवी ! – अधिवक्ता शैलेश कुलकर्णी
या वेळी अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडलेल्या गोवा येथील एका हिंदु मुलीची कशी सुटका केली, याचा स्वानुभव कथन केला. त्यांनी सांगितले, ‘‘गोवा येथील एक हिंदु मुलगी पुणे येथे नोकरीनिमित्त असतांना एका धर्मांध तरुणाने हिंदु बनून तिच्याशी परिचय वाढवला आणि नंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर मुसलमान बनण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला. त्यासाठी तिला पुष्कळ मारहाण केली. नंतर तिने हिजाब, बुरखा आणि काळे कपडे परिधान करणे चालू केले. धर्मांधाने तिला ‘धर्मांतर केले नाही, तर तुला मारून टाकीन’, अशी धमकीही दिली. तिने ती संकटात असल्याविषयी मैत्रिणीच्या माध्यमातून वडिलांना संदेश (मॅसेज) पाठवला. अर्थात् तिच्या वडिलांनी हे प्रकरण माझ्याकडे सोपवले गेले. त्यानंतर मी तिच्या वडिलांसह कोथरूडला गेलो. पीडितेच्या घरी जाण्यापूर्वी पुणे येथील बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांना कळवले. या कामासाठी त्यांनी २५० कार्यकर्ते साहाय्याला दिले. यासमवेतच पुणे पोलिसांना कळवले असल्याने तेही समवेत होते. प्रारंभी मुलीने आमच्या समवेत येण्यास नकार दिला; पण नंतर तिला घेऊन आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात गेलो. तेथे तिला विश्वासात घेतले. तेव्हा तिने पोलिसांना सर्व माहिती दिली. मुलीने लिहून देतांना ‘ती त्याच्यासमवेत स्वत:हून गेली’, असे सांगितले आणि त्याच्या विरुद्ध कोणतीही तक्रार करण्यास नकार दिला. यावरून ‘द केरल स्टोरी’ आपल्या घरापर्यंत पोचली आहे’, असे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी ‘पापा, प्लिज हेल्प मी’ (बाबा, मला साहाय्य करा) अशा प्रकारचीही चळवळ राबवू शकतो.’’
गडांवर पुन्हा भगवा फडकावण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, हिंदु जनजागृती समिती
शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे भूमी जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार (मुसलमानाचे थडगे), कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते. पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. हे महाराष्ट्रासह भारतातील सर्वच गड-दुर्गांच्या संदर्भात दिसून येते. गडांवरील पुन्हा भगवा फडकावण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार.