गोवा : जमावाकडून अनधिकृत मदरसा, वाहने आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्युत्तर !

रूमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याचे प्रकरण

पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

मडगाव, १९ जून (वार्ता.) – पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर आक्रमण झाल्याच्या घटनेनंतर काही घंट्यांतच मोठ्या जमावाने मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यावर तक्रार नोंदवण्यासाठी मोर्चा नेला. मार्च्यात सहभागी झालेले ‘जय शिवाजी, जय भवानी’, अशा घोषणा देत होते. रूमडामळ परिसरातील अनधिकृत कृत्यांवर आळा घालणे आणि आक्रमण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करणे अशा मागण्या जमावाकडून करण्यात आल्या. १७ जूनच्या रात्री आणि १८ जून या दिवशी स्थानिक ज्या घरात अनधिकृतपणे मदरसा चालत असल्याचे म्हणत होते, तेथे जमावाने दगडफेक केली, तसेच माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य सैयमुल्ला फणीबांद यांच्या मालकीच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. यानंतर रूमडामळ परिसरातील गोमांस विक्रीच्या दुकानांवरही दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.

संशयित आरोपी आयुब खान याला २ दिवसांची कोठडी

पंच विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी आयुब खान याला १९ जून या दिवशी मडगाव न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. तसेच पंचसदस्य वळवईकर यांना सामाजिक माध्यमातून धमकी देणारा अब्दुल रझाक यालाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास  प्राधान्य ! – संतोष देसाई, पोलीस उपअधीक्षक

रूमडामळ परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखणे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी दोन्ही गटांतील प्रतिनिधींना बोलावून समज देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.

रूमडामळ पंचायत विसर्जित करा ! – विनायक वळवईकर, पंचसदस्य

मडगाव – रूमडामळ पंचायत ज्यांच्या हातात आहे, ते जातीय तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत. या पंचायत परिसरात चालू असलेल्या अनधिकृत कृत्यांना पंचायतीचा पूर्ण पाठिंबा आहे. पंचायत क्षेत्रात पंचायतीच्या अनुज्ञप्तीविना बांधकामे चालू आहेत आणि ती बंद करण्यास पंचायत काहीच पुढाकार घेत नाही. सरकारने याची नोंद घेऊन पंचायत विसर्जित करावी, अशी मागणी रूमडामळ येथील पंच विनायक वळवईकर यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘जोपर्यंत रूमडामळ परिसरातील अनधिकृत कृत्यांना आळा बसत नाही, तोपर्यंत ही तेढ कायम रहाणार आहे. येथे हिंदु आणि मुसलमान असा भेदभाव नाही, तर अनधिकृत बांधकामे, अनधिकृत भंगारअड्डे आणि अनधिकृत गोमांस विक्रीची दुकाने हेच येथील तणावाचे प्रमुख कारण आहे. येथे १०० चौ.मी. भूमीत ३ मजली इमारत उभी आहे. ज्या घरांमध्ये अनधिकृत मदरसा चालू आहे, तो बंद करण्यासंबंधी २ मासांपूर्वी पंचायतीमध्ये ठराव संमत करण्यात येऊनही अजूनही मदरसा बंद करण्याची नोटीस पाठवण्यात आली नाही.’’

 (सौजन्य : prime media goa)

रूमडामळ पंचायतीने अनधिकृत मदरशावर कारवाई करायला हवी होती ! – उल्हास तुयेकर, भाजपचे स्थानिक आमदार

या घटनेवरून भाजपचे नावेली मतदारसंघाचे आमदार उल्हास तुयेकर म्हणाले, ‘‘रूमडामळ पंचायत क्षेत्रात निवासी घरामध्ये चालू असलेल्या अनधिकृत मदरशावर पंचायतीने कारवाई करायला हवी होती. पंचसदस्य वळवईकर यांना माझा आणि भाजप मंडळाचा या प्रकरणी पाठिंबा आहे. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही; मात्र कोणतीही धार्मिक कृती ही धार्मिक स्थळाच्या आतच झाली पाहिजे. निवासी घरामध्ये मदरसा चालवणे अनधिकृत आणि चुकीचे आहे. रूमडामळ परिसरात रात्री असामाजिक कृत्ये चालत असल्याच्या तक्रारी आहेत आणि यामुळे मी रात्री ९ नंतर सर्व अनधिकृत कृत्यांवर बंदी घालण्याची सूचना पोलिसांना केली आहे.