Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका

देशातील १९ राज्यांत प्रश्नपत्रिका फोडणारे माफिया

नवी देहली – जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पक्षाचे ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधातील आंदोलन संपले असले, तरी वर्ष २०१४ पासून जुलै २०२६ पर्यंत प्रश्नपत्रिका फुटीची किमान ११६ प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमुळे अनुमाने साडेसात कोटी उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. या प्रश्नपत्रिका फुटीच्या माफियांचे जाळे १९ राज्यांमध्ये पसरले आहे.

१. वर्ष २०१४ ते २०२४ या काळात ८९ प्रकरणे समोर आली होती. यांपैकी २१ केंद्रीय संस्थांशी आणि ६८ राज्यस्तरीय परीक्षांशी संबंधित होती. त्यानंतर वर्ष २०२५ मध्ये २० आणि २०२६ मध्ये जुलैपर्यंत ‘नीट-यूजी’सह प्रश्नपत्रिका फुटीची ७ प्रकरणे नोंदवली गेली.

२. जानेवारी २०१९ ते जून २०२४ या कालावधीत देशभरातील १९ राज्यांमध्ये ६५ परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या. यामध्ये सरकारी भरतीपासून ते प्रवेश, बोर्ड आणि विद्यापीठ यांच्या परीक्षांचा समावेश आहे. या ६५ प्रकरणांपैकी ४५ सरकारी भरती परीक्षांशी संबंधित होती. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे किमान २७ परीक्षा रहित किंवा पुढे ढकलण्यात आल्या. यामुळे ३ लाखांहून अधिक सरकारी पदांवरील भरती रखडली. शिक्षक आणि पोलीस भरती परीक्षा सर्वाधिक लक्ष्य होत्या.

३. प्रश्नपत्रिका फुटीची उत्तरप्रदेशात ११, मध्यप्रदेश आणि राजस्थान यांमध्ये प्रत्येकी ९, महाराष्ट्रात ६ आणि गुजरातमध्ये ५ प्रकरणे नोंदवली गेली.

४. केंद्र सरकारच्या शालांत परीक्षा, केंद्रीय विद्यालय संघटना, केंद्रीय लोकसेवा आयोग, सेना, कृषी वैज्ञानिक भरती मंडळ यांसारख्या ८ भरती परीक्षा रहित कराव्या लागल्या.

यामुळे भरती प्रक्रिया २ ते ८ महिने लांबली.

५. वर्ष २०२५ – २६ मध्ये बोर्ड, भरती, पात्रता, विद्यापीठ आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिका फुटतच राहिल्या.

६. ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीनंतर २१ मुलांच्या आत्महत्या आणि शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आले.

संपादकीय भूमिका

प्रश्नपत्रिका फोडणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा करण्यासाठी कायद्यात पालट करणे आवश्यक ठरले आहे !