संगमनेर (जिल्हा नगर) येथे हिंदु आक्रोश मोर्च्यानंतर धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक : २ जण घायाळ !

संगमनेर येथे काढण्यात आलेल्या भव्य हिंदु आक्रोश मोर्च्यात सहभागी झालेले सहस्रों हिंदुत्वनिष्ठ

संगमनेर (जिल्हा नगर) – येथे ‘भगवा मोर्चा’ पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवर असतांना संगमनेरजवळील समनापूर गावात धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक केली. या दगडफेकीत चारचाकी आणि दुचाकी वाहने यांची प्रचंड हानी झाली. या दगडफेकीत दोघे जण किरकोळ घायाळ झाले आहेत. समनापूर येथे झालेल्या दगडफेकीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे.

धर्मांधांनी दगडफेक केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूंनीही त्यांच्यावर दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत घायाळ झालेल्या दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती केले आहे. ‘कोणत्या कारणामुळे ही दगडफेक झाली ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत. समनापूर येथे तणावाचे वातावरण आहे.

दगडफेक करणार्‍यांना त्वरित अटक केली जाईल ! – राकेश ओला, पोलीस अधीक्षक

‘समनापूर येथे झालेल्या दगडफेकीचे सीसीटीव्हीचे चित्रण माझ्याकडे आले आहे. याची पडताळणी केली जाईल. दगडफेक करणार्‍यांना तातडीने अटक केली जाईल. जनतेने अफवांवर विश्‍वास ठेवू नये’, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक केल्यानंतर परिस्थिती हाताळतांना पोलीस

संगमनेर येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदु आक्रोश मोर्च्याद्वारे घोषणांनी परिसर दणाणला !

‘विघातक प्रवृत्ती आणि लव्ह जिहाद’च्या विरोधात शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ जून या दिवशी ‘हिंदु आक्रोश म्हणजे भगवा मोर्चा’ काढण्यात आला. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील सहस्रोंच्या संख्येने सहभागी झालेल्या हिंदु समाज बंधू-भगिनींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. संगमनेर नगरपालिकेच्या जवळील लाल बहादुर शास्त्री चौकात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हिंदु धर्मप्रेमी जमण्यास प्रारंभ झाला. पहाता पहाता सहस्रोंच्या संख्येने हिंदु तरुण आणि तरुणी मोर्च्यात सहभागी झाले होते. सर्वांनी भगवी टोपी परिधान करून हातात भगवे झेंडे घेतले होते. त्यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण झाले होते.

‘भारतमाता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘गोमाता की जय’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे’, ‘धर्मांतरविरोधी कायदा झालाच पाहिजे’, या घोषणांनी संगमनेर शहर दणाणून गेले. शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडी चौक, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, संगमनेर बसस्थानक मार्गे हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्च्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.