नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – प्रल्‍हाद सिंह पटेल

नदीची सगळ्‍यांत अधिक हानी पशूवधगृहांमुळे !

सोनगाव (बारामती) येथील सोनेश्‍वराचे दर्शन घेताना प्रल्हाद सिंह पटेल (उजवीकडे)

बारामती (जिल्‍हा पुणे) – येथील दोन्‍ही सहकारी साखर कारखाने, तसेच फलटण तालुक्‍यातील पशूवधगृहाचे दूषित पाणी हे नीरा नदीत सोडल्‍याचा आरोप नदीकाठच्‍या ग्रामस्‍थांनी केला. तसेच संबंधितांवर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय राज्‍यमंत्री प्रल्‍हाद सिंह पटेल यांनी बारामती तालुक्‍यातील नीरा वागज येथे भेट दिली. ५ जूनपासून पटेल २ दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्‍या दौर्‍यावर आहेत. इंदापुर तालुक्‍यातील दौर्‍यानंतर सायंकाळी पटेल यांनी सोनगाव येथील सोनेश्‍वराचे दर्शन घेतले, तसेच नीरा नदीची पहाणी केली. या वेळी नदीची सगळ्‍यात अधिक हानी पशूवधगृहामुळे झाली आहे. नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. कारवाई कशी केली जाईल ? हे सांगू शकत नाही; पण संकेत मात्र देऊ शकतो. सुधारा नाहीतर परिणामांना सामोरे जा, अशी चेतावणी त्‍यांनी प्रदूषण करणार्‍यांना दिली आहे.

पटेल पुढे म्‍हणाले की, भूमीतील पाणी खराब झाले आहे का ? याचीही माहिती घ्‍यावी लागेल. नीरा नदीतील पाण्‍याचा अहवाल ७ दिवसांत येईल. जेव्‍हा अहवाल येईल, तेव्‍हा सगळ्‍यांसाठी अहवाल खुला करणार आहे. त्‍या वेळी लोकांनी सुधारले पाहिजे. अन्‍यथा त्‍यांनी कारखाने बंद करायची सिद्धता ठेवावी लागेल.

संपादकीय भूमिका :

‘गणेशोत्‍सवाच्‍या वेळी मूर्ती विसर्जनामुळे नदी प्रदूषण होते’, अशी ओरड करणार्‍या तथाकथित पर्यावरणवाद्यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ? देशभर राजकारणासाठी अवैध पशूवधगृहे चालू आहेत. प्रतिदिन शेकडो गायी कापल्‍या जात आहेत. या पशूवधगृहातील रक्‍तामुळे कित्‍येक ठिकाणच्‍या नद्या प्रदूषित होत आहेत. तसेच ही पशूवधगृहे चालवण्‍यासाठी महानगरपालिका कित्‍येक लाख लिटर पाणी या पशूवधगृहास पुरवत आहे. याचा एकंदरीत परिणाम आज या देशातून गोवंश याच पिढीच्‍या डोळ्‍यांदेखत नष्‍ट होत आहे.