गोवा : उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी

नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात प्रारंभ

पणजी, ५ जून (वार्ता.) – नवीन शैक्षणिक वर्षाला ५ जूनपासून प्रारंभ झाला. दोन मासांच्या सुटीनंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वर्गांमध्ये उपस्थिती लावली. कुजिरा, बांबोळी येथील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी वर्गात येणार्‍या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अनेक शाळा लवकर सुटल्या. पालकांनी मुलांना शाळेत सोडायला ठिकठिकाणी गर्दी केली होती. पणजी परिसरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम चालू असल्याने अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तसेच मडगाव येथेही अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसून आली.

गोवा सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षी पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथमच शाळेत जाणारा आणि वयाची ३ वर्षे पूर्ण झालेला मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवणारी शाळा ५ जुलै या दिवशी चालू होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यापुढील वर्गांसाठी टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

पावसाच्या आगमनाला विलंब होत असल्याने आणि उकाड्यामुळे शाळा अन् उच्च माध्यमिक शाळा एक आठवड्याने पुढे ढकलण्याची मागणी सावईवेरे येथील पालकवर्गाने केली आहे. पालकांच्या मते, ‘‘पालकांनाच उकाडा असह्य होत असतांना पाल्यांनाही अशा वातावरणात शिकणे कठीण होणार. सध्याचे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक असते. यामुळे सरकारने शाळा एक आठवडा विलंबाने चालू करावी.’’