कोल्हापूर, ५ जून (वार्ता.) – दुर्धर, गंभीर आणि महागड्या शस्त्रक्रियांमध्ये सामान्यांना दिलासा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाद्वारे गरजूंना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ दिला जातो. २५ पेक्षा गंभीर आजारांसाठी ५० सहस्र ते २ लाखांपर्यंत साहाय्य देण्यात येते. यात कर्करोग, अवयव प्रत्यारोपण, हृदयविकार, रस्ते अपघात यांचा प्रमुख समावेश आहे. कक्ष चालू झाल्यापासून गेल्या ९ मासांत ७१ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून ९ सहस्र ७०० रुग्णांना त्याचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी कोल्हापूर ‘प्रेस क्लब’ येथे पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी ‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष श्री. शीतल धनवडे, कोल्हापूर येथील ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’चे दायित्व सांभाळणारे श्री. प्रशांत साळुंखे, श्री. प्रशांत जोशी यांसह अन्य उपस्थित होते.
१. राज्यात वर्ष २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यावर हा कक्ष जवळपास बंद करण्यात आला. गेल्या अडीच वर्षांत केवळ अडीच कोटी रुपयांचे साहाय्य करण्यात आले; मात्र शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यावर आपण हा कक्ष परत कार्यरत केला.
२. गेल्या काही वर्षांत कर्करोग होण्याचे प्रकार वाढले असून कक्षाकडे येणार्या आवेदनांपैकी २५ टक्के आवेदन हे कर्करोगांसाठी असते.
३. याची नोंदणी, आवेदन हे सर्व नि:शुल्क असून या प्रकरणात संबंधित रुग्णांकडून कुणीही पैशांची मागणी केल्यास ती देऊ नये, तसेच या सुविधा ज्या ज्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत, त्यांनी त्यांच्या रुग्णालयाच्या बाहेर तसा फलक लावावा. या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ती जिल्हाधिकार्यांकडे करू शकतो.