स्वतःच्या कृतीतून मुलीवर चांगले संस्कार करणार्‍या कल्याण (ठाणे) येथील सौ. देवकी रमाकांत गरिबे (वय ६४ वर्षे) !    

सौ. देवकी गरिबे

१. सकारात्मकता

‘माझी आई सर्व प्रसंगांत नेहमी सकारात्मक असते. कुठलेही काम ‘मला येत नाही’, असे ती कधीच म्हणत नाही. ती नेहमी ‘आपण करूया’, असे म्हणते.

२. इतरांना साहाय्य करणे

सौ. आर्या लोटलीकर

ती स्वतःहून इतरांच्या साहाय्यासाठी धावून जाते. ‘आपल्याला जमते, ते आपण करायचे’, असे ती सांगते.

३. स्थिर आणि संयमी

आई शांत, सुस्वभावी आणि सात्त्विक वृत्तीची आहे. मी तिला चिडलेले कधीच बघितले नाही. कितीही कठीण प्रसंग आला, तरी तिचा संयम सुटलेला मी आजवर पाहिला नाही. ती नेहमी समस्थितीत असते. ‘एखादी व्यक्ती इतकी संयमी कशी असू शकते ?’, याचे मला फार आश्चर्य वाटते.

४. लहानपणी संतांकडून आशीर्वाद मिळणे

माझी आई लहान होती. तेव्हा एक संत त्यांच्या घरी आले होते. (माझे आजोबा साधना करत असल्याने नेहमी कुणी ना कुणी आध्यात्मिक व्यक्ती घरी येत असत.) तेव्हा त्यांनी माझ्या आईला भगवी वस्त्रे दिली आणि तिचे ‘मीरा’, असे नामकरण केले. तेव्हा ती केवळ ७ – ८ वर्षांची होती.

५. स्वतःच्या कृतीतून मुलीवर योग्य संस्कार करणे

५ अ. सासूबाईंची सेवा मनोभावे करणे : माझी आजी (वडिलांची आई) तिच्या शेवटच्या काळात जवळजवळ ८ वर्षे अंथरुणाला खिळून होती. माझी आई शाळेत शिक्षिका होती. आईला शाळेत मे मास आणि दिवाळी या काळात मोठी सुटी असे. तेव्हा ती आजीची सेवा करण्यासाठी तिला आमच्या घरी आणत असे. ती आजीची सेवा आवडीने आिण न कंटाळता करत असे. तेव्हा मी इयत्ता ५ वी किंवा ६ वीत असेन. आजीला शौचासाठी भांडे द्यायला आणि अंघोळ घालतांना ती मला समवेत घ्यायची. त्यातूनच मला ज्येष्ठांच्या सेवेची सवय लागली.

५ आ. मुलींवर ज्येष्ठांचा आदर करण्याचा संस्कार करणे : माझे लग्न झाले. तेव्हा माझ्या पाठवणीच्या वेळी आई माझ्या सासर्‍यांना हात जोडून म्हणाली, ‘‘माझ्या मुलीचा तिच्या गुणदोषांसहित स्वीकार करा. मी तिला पूर्णपणे तुम्हाला दिले आहे’ आणि खरेच त्यानुसार माझे आई-वडील कधीही माझ्या सासरी कुठल्याही गोष्टीत ढवळाढवळ करत नाहीत किंवा मला ‘तू असे वाग, असे कर’, असे सांगत नाहीत. ते नेहमी ‘योग्य तेच वाग’, असे सांगतात. माझ्या आजेसासूबाई (सनातनच्या ९९ व्या संत पू. (कै.) विजया लोटलीकर) अंथरुणावर झोपून होत्या. तेव्हा आई-बाबा मला म्हणाले, ‘‘तू पू. आजींची चांगली सेवा कर. त्यात कुठे न्यून पडू नकोस.’’ ते नेहमी मला ‘सासरकडच्या सर्वांना सांभाळ’, असे सांगतात.

६. स्वामी समर्थांवर श्रद्धा असणे

अ. आईची श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा आहे. ती सेवानिवृत्त झाल्यापासून प्रतिदिन संध्याकाळी ७.३० वाजता स्वामींच्या मंदिरात आरतीला जाते.

आ. माझ्या आईचे वडील (कै.) हरिश्चंद्र सूर्यवंशी हे अध्यात्मातील अधिकारी होते. त्यांनी कल्याण पूर्व येथे स्वामींचे मंदिर बांधले आहे. तेथे आई नेहमी जाते.’

– सौ. आर्या अमेय लोटलीकर (सौ. देवकी रमाकांत गरिबे यांची मुलगी, वय ३८ वर्षे), फोंडा, गोवा. (१३.९.२०२२)