अकोला येथे १३ मे २०२३ या दिवशी रात्री समाजकंटकांच्या जमावाने प्रचंड धुडगूस घातला. समोर कोणताही दुसरा गट किंवा जमाव नसतांना समाजकंटकांनी रात्री घरासमोर उभी केलेली वाहने जाळली. दंगलग्रस्त भागातील नागरिकांच्या घरावर दगड, विटा मारून घरे पेटवण्याचा प्रयत्न केला. समाजमाध्यमावरील धार्मिक भावना दुखावणार्या एका लिखाणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. याविषयी आधी या लोकांनी पोलिसांकडे तक्रारही प्रविष्ट केल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांवरून समजते. ‘पोलिसांकडे तक्रार केल्यावर अशा प्रकारे हिंसाचार करण्याची वास्तविक पहाता काही आवश्यकता नव्हती; पण हे सर्व पूर्वनियोजित होते का ?’, असा प्रश्न यानिमित्ताने साहजिकच उपस्थित होतो.
१. अकोल्यात झालेली दगडफेक ही दंगल नसून धर्मांधांनी केलेले आक्रमण !
रात्रीच्या वेळी नागरिक आपापल्या घरात झोपलेले असतांना अशा प्रकारे दगडफेक करणे, म्हणजे याला दंगल म्हणता येईल का ? नव्हे ! याला ‘आक्रमण’ असेच म्हणावे लागेल; कारण दंगल दोन गटांत किंवा जमावात होते. मग एकाच गटाकडून अशा प्रकारे जाळपोळ आणि दगडफेक झाली. त्याला आक्रमणच म्हणावे लागेल. अशा प्रकारे धर्मांधांकडून आक्रमण होण्याची ही २ मासांतील महाराष्ट्रातील दुसरी घटना आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील रामनवमीच्या मिरवणुकीवरही दगडफेक करून आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर अकोल्यात दुसरी घटना घडली. अकोल्यातील घटनेनंतर ‘हिंदु-मुसलमान दंगल’ अशी चर्चा चालू आहे; पण तसे म्हणणे या घटनेत योग्य ठरणार नाही. ही घटना पूर्वनियोजित होती का ? या दिशेने या घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे; कारण हिंसाचाराचा प्रारंभ एकाच गटाकडून झाला. त्याला दुसर्या गटाकडून प्रतिकार करण्यात आला. घटना घडण्यापूर्वी समाजमाध्यमांवरील त्या िलखाणाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. तो जमाव पाहून पोलिसांनी सजग होणे आवश्यक होते.
२. धर्मांधांच्या बंदोबस्तासाठी उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाई होणे आवश्यक !
हिंदु कधीही धर्मांधता दाखवत नाहीत. हिंदूंच्या धार्मिक भावना भडकावणारे लिखाण समाजमाध्यमांवरून अनेकदा प्रसारित केले जाते; पण हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंसाचार न करता त्याचा कायदेशीर बंदोबस्त करतात. तरी काही कट्टरपंथियांच्या धर्मांधतेचा हिंदूंना त्रास सहन करावा लागत आहे. उत्तरप्रदेशात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशांमधून दिल्या जाणार्या धर्मांध शिक्षणाची साखळी तोडली. धर्मांधांकडून होणारी आक्रमणे आणि दंगली यांवर नियंत्रण मिळवले. तशी कारवाई आता महाराष्ट्रातही झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वास्तविक पहाता अकोल्याच्या घटनेत समाजमाध्यमावरील लिखाण हे नैमित्तिक कारण ठरत आहे. त्याची तक्रार करण्यासाठी रात्रीचीच वेळ का निवडली ? असाही प्रश्न उपस्थित होतो. या घटनेत ज्यांची वाहने जाळली, ज्या घरांवर दगडफेक करण्यात आली, त्यांचा या कथित लिखाणाशी काय संबंध ? या घटनेत मृत्यू झालेल्या विलास गायकवाड या निष्पाप नागरिकाचा काय संबंध होता ? त्याचा नाहक मृत्यू झाला.
३. सरकार, हिंदु धर्मीय, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना अपकीर्त करण्यासाठी त्यांना लक्ष्य केले जात आहे का ?
शासन आणि पोलीस दरबारी अकोल्यावर ‘अतीसंवेदनशील’, असा असलेला शिक्का गेल्या काही वर्षांत पुसण्यात आला होता; मात्र या घटनेने तो काळा डाग पुन्हा दिसू लागला आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अशा प्रकारच्या घटना जवळपास बंद झाल्या होत्या; पण अलीकडच्या काळात त्या पुन्हा चालू झाल्याचे निदर्शनास येत आहे. ‘काही आंदोलनांत आंदोलकांनी अतिशय टोकाची भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले; पण केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही. पोलिसांनी अतिशय शांत आणि संयम बाळगून ती आंदोलने शमवली. कदाचित् त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडवून सरकार, हिंदु धर्मीय, हिंदुत्वनिष्ठ संघटन यांना अपकीर्त करण्यासाठी त्यांना लक्ष्य केले जात आहे का ? असाही प्रश्न या घटनेवरून निर्माण होतो. हिंदु सहिष्णू असल्यामुळे धर्मांधही सुखाने नांदत आहेत; मात्र हिंदूंना या सहजीवनाचा कधी कधी असा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा ‘हे सर्व धोके ओळखून हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अधिक सजग आणि संघटित होणे आवश्यक आहे’, असे या निमित्ताने म्हणावेसे वाटते.
– श्री. विजय कुलकर्णी
(साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’, १६.५.२०२३)