पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दिनांकानुसार जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र लोकमाता, राजमाता, देवी, गंगाजळ, निर्मळ अशा विविध बहुमानांनी भरून गेले आहे. अहिल्यादेवी यांचे अपार शहाणपण, खंबीर मन, विलक्षण बुद्धीचातुर्य, सत्त्वशील, धर्ममूर्ती, देवावर अपार निष्ठा यांमुळे त्या पेशव्यांच्या गादीशी अखेरपर्यंत निष्ठावान राहिल्या; म्हणूनच श्रीमंत पेशवे ‘पुण्याचे पुण्यद्वार’ म्हणून माहेश्वरीचा उल्लेख करत असत. होळकर परिवारातील सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना पहावे लागले. अहिल्यादेवी शेवटी एकट्या राहिल्या, तरीही शेवटपर्यंत प्रजाहितदक्ष राहून शेवटपर्यंत त्या अविरतपणे धर्मकार्य करत राहिल्या.
१. अहिल्यादेवी यांचे बालपण आणि त्यांच्यातील शौर्याविषयीचा प्रसंग
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी हे एक लहान गाव. सुशीला माणकोजी शिंदे यांच्या पोटी अहिल्यादेवी यांनी जन्म घेतला. पुढे ती सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून झाली. लग्न झाले, तेव्हा अहिल्यादेवी १० वर्षांच्या होत्या. त्यांची बुद्धी प्रखर होती. गणित, वाचन याप्रमाणे भूगोलाचे शिक्षणही त्यांना देण्यात आले होते. आपल्या गोड स्वभाव आणि सेवावृत्ती यांमुळे त्या सर्वांच्या लाडक्या झाल्या होत्या. कोणत्याही हिशोबातील चूक त्या एका नजरेत काढू शकत होत्या. मल्हाररावांचे पत्रव्यवहार, खासगी आणि सरकारी यांमधील जमा यांचा चोख व्यवहार त्या राखत असत.
एकदा मल्हारराव होळकर बाजीराव पेशव्यांसमवेत चौंडी या गावी सैन्यासह राहिले असता सीना नदीकाठी महादेवाच्या मंदिराजवळ पोरवयीन अहिल्याबाई वाळूमध्ये महादेवाची पिंड बनवण्यात दंग होत्या. इतक्यात सैन्यातील घोडा उधळला, सर्वांची पळापळ झाली; परंतु चिमुकली अहिल्या आपण बनवलेल्या त्या पिंडीला देहाची पाखर घालून तेथेच बसून राहिली. घोडा बाजूने निघून गेला. तेव्हा बाजीरावांनी ओरडून विचारले, ‘‘पोरी येथे का थांबलीस ? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता तर !’’ त्यावर मुळीच न घाबरता तेजस्वी डोळे श्रीमंतांच्या डोळ्यांना भिडवत ती म्हणाली, ‘‘जे आपण घडवावे, ते जिवापाड, प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे’’, असेच सगळी वडील माणसे सांगतात. तेच मी केले. तिच्या डोळ्यातील तेज पाहून श्रीमंत बाजीराव पेशवे स्मित हास्य करत मल्हाररावांना म्हणाले, ‘‘या पोरीला तुमची सून करून घ्या.’’
२. पेशव्यांचे कर्ज उतरवण्यासाठी अहिल्यादेवींनी सुभेदार मल्हारराव यांना स्वधन देण्याविषयी दिलेला सल्ला
पेशव्यांच्या उत्तर मोहिमेमुळे कर्ज झाले होते, ही गोष्ट जेव्हा अहिल्यादेवींना कळली, तेव्हा सुभेदार मल्हारराव यांना त्यांनी सांगितले, ‘‘प्रत्यक्ष स्वामी कर्जामध्ये बुडालेले असतांना सेवकाने धन जमवत रहावे, हे अशोभनीय आहे. आपण तात्काळ जाऊन श्रीमंतांचे कर्ज उतार करावे.’’ पुढे इतिहासाने नोंद घ्यावी, अशी विलक्षण घटना घडली. मल्हारराव आपल्या लाडक्या सुनेच्या सांगण्यावरून सर्व खजिना घेऊन पुण्याला गेले आणि त्यांनी श्रीमंतांचे कर्ज उतार केले.
३. अहिल्यादेवींचा हिशोबातील नि:पक्ष चोखपणा आणि केलेले धर्मकार्य
प्रत्यक्ष सुभेदार पुत्र पती खंडेराव यांच्याशीही व्यवहारातील कोणतीही चूक त्या खपवून घेत नसत. खासगी खर्चासाठी सरकारातील एक पैसाही वापरणे, हे त्या पाप समजत असत; परंतु सरकारी खर्चापोटी लागणार्या रकमा आवश्यकता पडल्यास त्या आपल्या खासगी निधीतून देत असत. त्यांनी केलेली सर्व धर्मकार्ये, तीर्थस्थळांची बांधणी, घाट, विहिरी, मंदिरे, धर्मशाळा यांसाठी लागलेला सर्व व्यय त्यांनी आपल्या खासगी उत्पन्नातून केला होता. अनेकांना ठाऊक नसणारी ही विशेष गोष्ट अशी आहे की, अहिल्यादेवींना खासगी खर्चासाठी ठराविक प्रदेशातून जो महसूल मिळत असे, तो त्यांनी कुशलतेने वापरून विकास घडवून तो अनेक पटींनी वाढवला आणि त्यातून उभे राहिलेले सर्व धन त्यांनी धर्मकाय करण्यासाठी वापरले. अथात् ही सव धमकाये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या व्यक्तीगत उत्पन्नातून केलेली आहेत.
४. खंडेरावांचे निधन
कुंभेराचे जाट पुण्याला चौथाई (उत्पन्न) पाठवत नव्हते. तेव्हा श्रीमंत पेशव्यांनी मल्हाररावांना कुंभेरास वेठा घालण्यास सांगितले. या कामगिरीवर खंडेरावही सोबत होते. वेढा अगदी कडक करण्यात आला होता. या वेढ्यात अहिल्याबाईही होत्या. रसद पुरवण्याचे मुख्य काम त्या करत होत्या. खंडेराव निशाणीच्या ध्वजाकडे निघाले, तेवढ्यात कुंभेरी गडावरून एक गोळा आला आणि त्याने त्यांच्या छातीचा वेध घेतला अन् खंडेराव तात्काळ गतप्राण झाले. तेव्हा मल्हाररावांनी शपथ घेतली, ‘अरे जाटा, तुझी कुंभेरी मी धुळीस मिळवेन.’ अखेर जाट शरण आले. यानंतर मोठ्या अपार प्रयत्नाने मल्हारराव आणि माता गौतमीबाई यांनी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून परावृत्त केले. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना दौलतीचा कारभार ‘चिरंजीव’ म्हणून पहाण्यास सांगितले. अहिल्यादेवींनी सव राज उपभोगांचा त्याग करून पांढरी वस्त्रे धारण केली आणि राज्यकारभार पाहिला.
५. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले धमकाय
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अखंड भारत वषांतील अनेक तीथक्षेत्रांना खचाची व्यवस्था करून दिली. विहिरी-तळी खोदून, अन्नछत्रे उभी करून यात्रेकरूंच्या अन्न-पाण्याची व्यवस्था केली. भारतातील अनेक तीथस्थळांचा जीणाेद्धार केला. जनतेच्या हितासाठी जे जे संभव आणि शक्य आहे, ते ते प्रयत्न त्यांनी केले. दरोडेखोरी करणार्या भिल्ल रामोशांना पकडून आणून प्रेमाने त्यांची विचारपूस केली आणि त्यांना कामधंदे उपलब्ध करून दिले. त्यांच्यातील बलवान लोकांना सैन्यामध्ये सहभागी करून घेतले. त्यांच्यावर विशेष दायित्व सोपवले. चोर, डाकू म्हणून ओळखला जाणारा हा समाज अहिल्यादेवींना आई मानू लागला. अहिल्यादेवी नेहमी म्हणत असत, ‘स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते.’
६. पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा अखेरचा श्रावण
खर्डा येथे कुरापतखोर निजामाशी पेशव्यांची लढाई झाली. होळकरांच्या निशाणाला अग्रभागी रहाण्याचा मान मिळाला. यशवंतराव होळकर आणि बापू होळकर यांच्या तलवारींनी अजोड पराक्रम केला. पेशव्यांच्या सेवेत होळकरी निशाणाला सन्मान मिळाला. अहिल्यादेवींना धन्य धन्य वाटले. नर्मदामातेची ओटी भरून त्यांनी हत्तीवरून साखर वाटत पेशव्यांचा विजय आणि होळकरांची शौर्यकथा साजरी केली. पेशव्यांच्या गादीशी अखेरपर्यंत निष्ठा ठेवून असणार्या पुण्यश्लोक अहिल्याबाई श्रावण कृष्ण चतुर्दशी १३ ऑगस्ट १७९५ या दिवशी पंचतत्त्वात विलीन झाल्या.
– श्री. संदीप अंकुश टेंगले, केडगाव, जिल्हा पुणे.
(साभार : मासिक ‘स्वयंभू’, दिवाळी विशेषांक २०२२)