वेदांतील ज्ञानाचे चौर्य !

वेदांचा तो अर्थ आम्‍हासीच ठावा ।
येरांनी वाहावा भार माथा ॥

खादल्‍याची गोडी देखिल्‍यासी नाही ।
भार धन वाही मजुरीचे ॥

उत्‍पत्तिपाळण संहाराचे निज ।
जेणे नेले बीज त्‍याचे हाती ॥

तुका म्‍हणे आम्‍हा सापडले मूळ ।
आपणचि फळ आले हाता ॥
– संत तुकाराम

संत तुकाराम महाराजांनी या अभंगात म्‍हटले आहे, ‘वेदांचा खरा अर्थ, खरे रहस्‍य हे आम्‍हास ठाऊक आहे आणि इतर अभ्‍यासक केवळ त्‍या ज्ञानाचा भार माथी वहातात. एखादा खाद्यपदार्थ केवळ पाहून चालत नाही, तर तो खावा लागतो, तरच त्‍याची खरी चव कळते. त्‍याप्रमाणेच वेदांचेही आहे. नुसते ज्ञान असून भागत नाही, तर त्‍यातील सांगितलेल्‍या गोष्‍टींचा अनुभव यावा लागतो आणि त्‍याद्वारेच खरा अर्थ उमगतो, नाहीतर कामगार (मजूर) भाराची ने-आण करतो; परंतु त्‍यातील मालाचा त्‍याला काडीमात्रही उपयोग होत नाही’, असा काहीसा भाग भारतियांचा झाला आहे का ? असा प्रश्‍न भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेचे (इस्रोचे) अध्‍यक्ष एस्. सोमनाथ यांनी केलेल्‍या विधानानंतर पडतो. सोमनाथ नुकतेच उज्‍जैन येथे एका विद्यापिठात बोलतांना म्‍हणाले, ‘‘बीजगणित, वर्गमूळ, काळाची गणना, स्‍थापत्‍यशास्‍त्र, विश्‍वाचा आकार, धातूविज्ञान आणि विमान चालवणे हे वेदांमधून प्रथम शिकवले गेले. वेद हे विज्ञानाचे मूळ आहे; पण हे ज्ञान अरबस्‍तानातून पाश्‍चात्त्य देशांमध्‍ये पोचले आणि तेथील शास्‍त्रज्ञांनी स्‍वतःच्‍या नावाने त्‍याचा प्रचार केला.’’ येथे प्रश्‍न उपस्‍थित होतात, जर भारतातून वेदांतील हे ज्ञान पाश्‍चात्त्य देशांत पोचले आणि त्‍यांचा वापर त्‍यांनी स्‍वतःच्‍या नावाने केला, तर भारतियांनी वेदांच्‍या ज्ञानाचा वापर आतापर्यंत का केला नाही अन् ते जगाला का सांगितले नाही ? ‘पाश्‍चात्त्यांनी वेदांच्‍या ज्ञानाची चोरी केली’, असेेे इस्रोचे अध्‍यक्ष सांगतात, ही जितकी महत्त्वाची गोष्‍ट आहे, तितकीच यावर भारत सरकार किंवा संबंधित तज्ञ, विचारवंत, अभ्‍यासक का बोलले नाहीत ? आणि बोलत नाहीत ? यापुढे वेदांच्‍या ज्ञानाचा वापर करून जे पाश्‍चात्त्यांनी केले, त्‍याच्‍या पुढे जाऊन आपण कसा वापर करू शकतो, यासाठी काही प्रयत्न करण्‍याचा विचार का केला जात नाही ? आपल्‍याला कुणी रोखले आहे का ?

गुलामगिरीमुळे झालेली हानी !

एस्. सोमनाथ

सोमनाथ म्‍हणाले, ‘‘भारतीय शास्‍त्रज्ञांनी त्‍यांचे संशोधन प्राचीन काळापासून संस्‍कृतमध्‍ये लिहिले आहे; पण नंतर त्‍यावर फारसे संशोधन झाले नाही. ८ व्‍या शतकात लिहिलेले ‘सूर्यसिद्धांत’ हे याचे उदाहरण आहे. या पुस्‍तकात पृथ्‍वीचा परिघ, सूर्यमाला आणि अनेक गोष्‍टी लिहिल्‍या होत्‍या, ज्‍याचे श्रेय पाश्‍चिमात्‍य जगाने नंतर घेतले.’’ याचाच अर्थ गेल्‍या १ सहस्र २०० वर्षांत आपण वेदांतील विज्ञानाचा कोणताही वापर केला नाही, हे स्‍पष्‍ट आहे. आजही त्‍याचा वापर करण्‍याचा प्रयत्न होत आहे कि नाही, हेही कळण्‍यास मार्ग नाही. युरोपमध्‍ये सोळाव्‍या शतकामध्‍ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. पाश्‍चात्त्यांनी  विज्ञानाच्‍या आधारे अनेक शोध लावले आणि त्‍या आधारे ती आज विकसित राष्‍ट्रे बनली आहेत. अत्‍याधुनिक प्रगत ज्ञान म्‍हणून त्‍यांच्‍याकडे आजही पाहिले जाते. त्‍या तुलनेत भारत मागास राहिला. याला १ सहस्र २०० वर्षांची गुलामगिरी हे मोठे कारण मानले जाऊ शकते, यात दुमत नाही; मात्र स्‍वातंत्र्याच्‍या गेल्‍या ७५ वर्षांत तरी याचा अभ्‍यास करून भारताने विज्ञानामध्‍ये पुढे जाणे अपेक्षित होते, तसे झाले नाही. ‘आज काही प्रमाणात भारत पुढे चालला आहे, हे जरी सत्‍य असले, तरी वेदांमध्‍ये जे काही ज्ञान आहे, त्‍याच्‍या तुलनेत ते नगण्‍य आहे’, असे यातील अभ्‍यासकांनी म्‍हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही.

वैदिक विश्‍वविद्यालये हवीत !

गुलामगिरीच्‍या पूर्वी भारतामध्‍ये गुरुकुल परंपरा होती. नालंदा आणि तक्षशिला यांसारखी विश्‍वविद्यालये होती. लोक साधना करणारे होते. त्‍या वेळी सुबत्ता आणि ज्ञान दोन्‍ही नांदत होते; मात्र भारतावर झालेले इस्‍लामी आक्रमण, मोगलांची राजवट आणि नंतर ब्रिटीश राजवट यांमुळे ही सर्व परंपरा जाणीवपूर्वक नष्‍ट करण्‍यात आली. इस्‍लामी आक्रमकांनी तोडफोड केली, तर ब्रिटिशांनी हिंदूंचा बुद्धीभेद करून त्‍यांना त्‍यांच्‍या या ईश्‍वरी ज्ञानापासून अत्‍यंत दूर नेऊन ठेवत त्‍यांना यांच्‍याच विरोधात उभे केले. त्‍याचा त्‍यांच्‍या दृष्‍टीने योग्‍य तोच परिणाम झालेला आज भारतात दिसत आहे. ही स्‍थिती पालटण्‍याची संधी स्‍वातंत्र्यानंतर होणे अपेक्षित होते; मात्र भारतावरील, हिंदूंवरील आणि त्‍यांच्‍या संस्‍कृतीवरील आक्रमण संपलेले नव्‍हते. त्‍यामुळे मागील ७५ वर्षांत हिंदुद्वेषी सत्ताधारी राजकीय पक्षांमुळे ही स्‍थिती पालटण्‍यात आली नाही. नेहरूंनी तर संस्‍कृतला मृत भाषा घोषित करून टाकले. आता सोमनाथ यांनी केलेल्‍या आरोपांवर विचार करून भारत सरकारने वेदांमधील विज्ञानाचा शोध घेऊन भारताला पुढे नेण्‍यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी तसे विद्यापीठ स्‍थापन केले पाहिजे. इतकेच नाही, तर वेद हे संस्‍कृतमध्‍ये आहेत; म्‍हणून पुढील पिढीला संस्‍कृतचे ज्ञान होण्‍यासाठी संस्‍कृतला राष्‍ट्रीय भाषेचा दर्जा देऊन ठिकठिकाणी संस्‍कृत विद्यालये काढून ती शिकवण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना प्रोत्‍साहित केले पाहिजे किंबहुना ते अनिवार्यच केले पाहिजे. वेदांसह अन्‍य धर्मग्रंथांतील विज्ञानाचा शोध घेण्‍यासाठी देशात काही ठिकाणी संशोधन आणि प्रयोग करणारी केंद्रे स्‍थापन केली पाहिजेत. नालंदा आणि तक्षशिला येथे प्रत्‍येक प्रकारचे जसे नौका बांधणे, शस्‍त्रे बनवणे आदी शिक्षण दिले जात होते. हे ज्ञान पुन्‍हा मिळवण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे. देहली येथील विष्‍णुस्‍तंभ गेली सोळाशे वर्षे न गंजता उभा आहे. म्‍हणजे लोखंड गंजू नये, यासाठी काय प्रक्रिया केली पाहिजे, याचे ज्ञान त्‍या काळी हिंदूंकडे होते. त्‍याचा शोध घेतला पाहिजे. वेदांचे ज्ञान पाश्‍चात्त्यांनी स्‍वतःच्‍या नावावर खपवले, याचा विचार करण्‍याऐवजी वेदांतील प्रचंड ज्ञानाचा आपण आता कसा वापर करू शकतो, याचा विचार करून काही प्रयत्न केले, तर भारत विश्‍वगुरु होण्‍यासह विज्ञानगुरुही होईल, यात शंका नाही.

भारत विश्‍वगुरु होण्‍यासह विज्ञानगुरु होण्‍यासाठी वेदांचे शिक्षण अनिवार्य करा !