दापोली आगारातून शिर्डी, अक्कलकोट, अंबाजोगाई परळी वैजनाथ या बससेवा त्वरित चालू कराव्यात !

राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांची मागणी

वैभव बहुतूले यांची बससेवा त्वरित चालू करण्याबाबत पत्राद्वारे मागणी

दापोली – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दापोली आगारातील शिर्डी, अक्कलकोट, अंबाजोगाई, परळी वैजनाथ संस्थानकडे जाणार्‍या एस्.टी.च्या फेर्‍या अनेक महिने बंद ठेवण्यात आल्या आहेत. दापोली-शिर्डी, दापोली-अक्कलकोट, दापोली-अंबाजोगाई परळी वैजनाथ या बससेवा त्वरित चालू करण्यात याव्यात, असे राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले यांनी महाव्यवस्थापक वाहतूक शिवाजी जगताप आणि उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती १, श्रीनिवास जोशी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की,

दापोली तालुक्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे परळी वैजनाथ, अंबाजोगाई, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, अहमदनगर, शिर्डी परिसरातील अनेक नागरिक निम शासकीय, शासकीय, खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत. या नागरिकांना जाण्या-येण्यास नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दापोली पुणे शिर्डी, दापोली कराड अक्कलकोट, दापोली पंढरपूर अंबाजोगाई परळी वैजनाथ या बससेवा चालवणे शक्य नसल्यास कोपरगाव शिर्डी पुणे दापोली, अक्कलकोट कराड दापोली, परळी वैजनाथ अंबाजोगाई पुणे दापोली संदर्भातील बससेवा कायमस्वरूपी चालू करण्यासाठीचे संबंधित पत्र संबंधित विभागाला पाठवून बससेवा चालू करण्यात यावी.