१. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात आरतीसाठी गेल्यावर पुष्कळ गर्दी असल्यामुळे मंदिर परिसरातच थांबण्याचा निर्णय घेणे
‘जानेवारी २०२३ मध्ये मी आणि माझे यजमान (आधुनिक वैद्य उज्ज्वल प्रताप कापडिया) कोल्हापूर येथे काही दिवसांसाठी गेलो होतो. तेव्हा आम्ही प्रतिदिन कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जात होतो. आमचा कोल्हापूरला रहाण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी आमच्या मनात विचार आला, ‘सकाळी लवकर श्री महालक्ष्मीच्या मंदिरात जावे, म्हणजे आपल्याला आरतीही मिळेल आणि सकाळी देवळात गर्दी अल्प असल्यामुळे आपल्याला देवीचे दर्शनही नीट होईल.’ त्यामुळे आम्ही सकाळी लवकर श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात गेलो. तेव्हा तिथे देवीची आरती नुकतीच चालू झाली होती. आरतीसाठी मंदिरात पुष्कळ गर्दी होती. त्यामुळे आम्ही मंदिर परिसरात थांबलो.
२. एका अपरिचित व्यक्तीने जवळ येऊन मंदिरात आरतीला जाण्यास सांगणे
काही वेळाने आम्ही थांबलो होतो, तिथे ५० – ५५ वर्षे वयाची कपाळावर टिळा लावलेली एक व्यक्ती आमच्या जवळ आली आणि आम्हाला म्हणाली, ‘‘अरे, देवीची आरती चालू आहे आणि तुम्ही बाहेर थांबला आहात. चला, मंदिरात आरतीला जा.’’ त्या व्यक्तीचे ऐकून आम्ही मंदिरात आरतीसाठी गेलो. तिथे पुष्कळ गर्दी होती. त्या गर्दीत आम्हाला देवीचे दर्शन घेता येत नव्हते; म्हणून आम्ही हात जोडून मागे उभे राहिलो.
३. आरती संपल्यावर त्या अपरिचित व्यक्तीने तेवढ्या गर्दीतही देवीसमोर उभे रहाण्यास जागा करून देणे
आरती संपत आल्यावर ती व्यक्ती मंदिरात आली आणि आम्हाला म्हणाली, ‘‘अरे, तुम्ही असे मागे का थांबला आहात ? देवीचे दर्शन घ्या. तुम्ही एवढ्या लांबून आला आहात. त्यामुळे तुम्हाला देवीचे दर्शन मिळायला हवे.’’ त्यानंतर त्यांनी आम्हाला देवीसमोर उभे रहाण्यास जागा करून दिली.
४. अपरिचित व्यक्तीमुळे आरती आणि देवीचे दर्शन व्यवस्थित होणे
आम्ही देवीसमोर उभे राहिल्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘आता पुजारी सर्वांना आरती देतील, ती तुम्ही घ्या आणि देवीचे दर्शनही व्यवस्थित घ्या.’’ नंतर तेथील पुजार्यांनी सर्वांना आरती दिली. आम्ही आरती घेतली आणि १ मिनिट देवीसमोर उभे राहून तिचे मनोभावे दर्शन घेतले.
५. देवीचे दर्शन घेतल्यावर मागे वळून पाहिल्यानंतर ती अपरिचित व्यक्ती कुठेही न दिसणे आणि ‘देवीच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी’, यासाठी गुरुदेव त्या अपरिचित व्यक्तीच्या रूपात आले’, असे जाणवणे
आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि मागे वळून पाहिले, तर ती व्यक्ती आम्हाला कुठेही दिसली नाही. आम्ही बाहेर मंदिर परिसरात पाहिले, तरी ती व्यक्ती आम्हाला दिसली नाही. त्या वेळी आमच्या लक्षात आले, ‘शेवटच्या दिवशी देवीची आरती आणि तिचे दर्शन मिळावे’, अशी आमची इच्छा होती. आमची ती इच्छा पूर्ण व्हावी; म्हणूनच गुरुदेव आमच्यासाठी त्या व्यक्तीच्या रूपात आले. त्यांनी आम्हाला देवीची आरती अन् देवीचे दर्शन घडवले.’
त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आपल्यावर सतत लक्ष असते आणि ते आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात’, अशी अनुभूती आम्हाला आली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. उमा उज्ज्वल कापडिया, फोंडा, गोवा. (१३.३.२०२३)
• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |