विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई !

विनम्र अभिवादन !

२६.५.२०२३ या दिवशी राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदानदिन आहे. त्या निमित्ताने…

राणी लक्ष्मीबाई

‘ज्येष्ठ शुक्ल सप्तमी या िदवशी झाशीच्या लक्ष्मीबाईंनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात आत्मबलीदान केले.

‘हातात तलवार आणि कुडीत प्राण आहे, तोपर्यंत झाशी माझी आहे’, अशी राणीची प्रतिज्ञा होती; परंतु ह्यू रोझ याने झाशीस दिलेला वेढा परतवता न येऊन राणी ग्वाल्हेरला आली. तेथेही शत्रूचा वेढा पडला. शत्रूची फळी फोडून जाण्याचा प्रयत्न तिने केला. २ इंग्रज शिपाई तिच्या पाठीमागे धावत होते. वाटेत एक नाला आला. राणीचा घोडा पैलतीर गाठू शकला नाही. स्वतःचा देह जिवंतपणे दुसर्‍याच्या हाती जाऊ नये, ही भारतीय स्त्रीची वृत्ती राणीमध्ये उसळून वर आली. यासाठी तिने आपली रक्ताने न्हालेली तलवार सरसावली. एका शिपायाने पुढून राणीवर वार केला. दुसर्‍याने मागून केला. राणीचे शरीर रक्ताने माखून गेले. उग्ररूप धारण करून शेवटचा प्रयत्न तिने केला. दोन्ही शिपाई मारल्यानंतर रणशालिनी लक्ष्मी खाली पडली. राणीने शेवटचे वाक्य उच्चारले, ‘‘वीरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे.’’ तिच्या मुखावर थोडा उल्हास उमटला आणि या भारतीय स्वातंत्र्यलक्ष्मीने आपले डोळे मिटले.

वरसईकर विष्णुभट गोडसे यांनी त्यांच्या ‘माझा प्रवास’ या लिखाणात लक्ष्मीबाईंचे करूण चित्र रेखाटले आहे. ‘‘झाशीची राणी दृष्टीस पडली. तिचे सर्व अंग धुळीने भरलेले होते. तोंड किंचित् आरक्त असून म्लान आणि उदास दिसत होते. बाईस तृष्णा पुष्कळ लागली होती. मी रस्सीमडके विहिरीत सोडणार तोच बाई म्हणाल्या, ‘‘तुम्ही विद्वान ब्राह्मण मजकरता पाणी काढू नका. मीच काढून घेते.’’ बाईंनी मृण्मय पात्रांतून ओंजळीने पाणी पिऊन तृष्णा हरण केली. दैवगती मोठी विचित्र आहे. नंतर मोठ्या निराशेने बोलल्या, ‘‘मी अर्धा शेर तांदुळाची धनीन, मजला विधवा धर्म सोडून हा उद्योग करण्याची काही जरूरी नव्हती; परंतु हिंदु धर्माचा अभिमान धरून या कर्मास प्रवृत्त झाले आणि याचकरता वित्ताची, जीविताची सर्वांची आशा सोडली.’’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))