गोवा : ‘माझी बस’ योजनेअंतर्गत कदंब महामंडळाला खासगी बसगाड्या चालवायला घेण्यास संमती

राज्य मंत्रीमंडळ बैठक

पणजी, २४ मे (वार्ता.) – राज्य मंत्रीमंडळाने ‘माझी बस’ या योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत कदंब वाहतूक महामंडळाला खासगी बसगाड्या चालवण्यासाठी घेण्यास मान्यता मिळणार आहे. ही योजना प्रारंभी ‘काणकोण-पणजी’, ‘पेडणे-पणजी’, ‘सावर्डे-पणजी’ आदी निवडक ४ मार्गांवर लागू केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिली.

योजनेविषयी अधिक माहिती देतांना वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो म्हणाले, ‘‘माझी बस’ योजना ज्या मार्गावर राबवली जाणार आहे, त्या मार्गावरील सर्व खासगी बसगाड्या या योजनेचा भाग होणार आहेत. बसने प्रतिदिन किती कि.मी. अंतर पार केले त्याच्या आधारावर बसमालकाला एक विशिष्ट रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम इंधनाच्या प्रतिदिन दरावरही अवलंबून असेल. बसचा चालक हा बसमालक नेमणार आहे, तर बसवाहक (तिकीट देणारा) हा कदंब महामंडळाचा कर्मचारी असेल. बसची देखभाल आणि इतर खर्च हा बसचा मालक पहाणार आहे. ही योजना प्रारंभी ४ मार्गांवर लागू करून तेथून मिळणार्‍या प्रतिसादावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. खासगी बस चालवण्यासाठी घेण्यापूर्वी ती चांगल्या स्थितीत आहे ना, याची पडताळणी केली जाणार आहे. या बसगाड्यांचे वेळापत्रक ग्राहकांना ‘डिजिटल’ स्वरूपात मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकार खासगी बसचालकांना त्यांच्या जुन्या बसगाड्या पालटून नवीन बसगाड्या घेण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार करत आहे.’’

मंत्रीमंडळ बैठकीतील इतर निर्णय

१. ‘गोवा लॉजिस्टीक अँड वेअरहाऊस’ (गोवा मालवाहतूक आणि गोदाम) धोरणाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

२. तुये, पेडणे येथील जलस्रोत खात्याच्या संकुलातील ३ सहस्र ४१० चौ.मी. भूमी विकलांग मुलांसाठी विद्यालय चालवणार्‍या मांद्रे, पेडणे येथील ‘आत्मविश्वास सोसायटी’ यांना देण्याचा निर्णय झाला आहे. या विद्यालयाची जानेवारी २०१४ पासूनची ४० लाख रुपये थकीत भाडेपट्टी माफ करण्यात आली आहे.

३. ८ गावांमध्ये ४ जी भ्रमणभाष मनोरा उभारण्यासाठी सरकारी भूमीचे हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.