सौ. पल्लवी हंबर्डे या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. त्यांच्या समवेत रामनाथी आश्रमातील काही साधक गेली ८ वर्षे सेवारत आहेत. सहसाधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. अमोल बधाले
१ अ. हसतमुख : ‘सौ. पल्लवी या नेहमी उत्साही असून त्यांचा चेहरा हसतमुख असतो.
१ आ. निर्मळ मन : सौ. पल्लवी यांचे मन निर्मळ असल्यामुळे त्यांच्या मनात कोणाविषयी विकल्प किंवा प्रतिक्रिया नसतात. त्यांच्या समवेत एखादा प्रसंग घडल्यास किंवा माझ्याकडून बोलण्यात काही चुकले असल्यास किंवा सेवेत काही चुकीचे झाले, तरी दुसर्या दिवशी त्या सर्व विसरलेल्या असतात. त्यांच्या मनात जराही द्वेष नसतो.
१ इ. प्रेमळ स्वभाव : त्यांचा स्वभाव प्रेमळ असल्यामुळे त्या सर्वांशी जुळवून घेतात. त्यामुळे त्या इतरांना आपल्याशा वाटतात. त्यामुळे साधक त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतात.
१ ई. इतरांना साहाय्य करणे : कुणीही काहीही साहाय्य मागितले, तरी त्या लगेच साहाय्य करतात.
१ उ. सेवेची तळमळ : त्यांना कोणतीही सेवा दिली, तरी त्या ‘नाही’ म्हणत नाहीत. त्यांनी केलेल्या सेवेत काही चुका झाल्या, तरी त्या निराश न होता सेवा अधिक चांगली होण्यासाठी प्रयत्न करतात. ‘कोणतीही सेवा पल्लवीताईंना सांगितल्यावर त्या दायित्व घेऊन ती पूर्ण करू शकतात’, असा विश्वास उत्तरदायी साधकांना वाटतो.’
२. सौ. नम्रता वानखडे
२ अ. सहसाधकांना समजून घेणे : ‘मी वर्ष २०१० पासून पल्लवीताईंना ओळखते. आम्ही दोघीही अमरावती येथे रहात होतो. त्या वेळी त्या उत्तरदायी साधक म्हणून काही सेवा करत होत्या. तेव्हाही त्यांच्या मनात साधकांविषयी पूर्वग्रह किंवा प्रतिक्रिया नसायच्या. त्या सहसाधकांची स्थिती समजून घ्यायच्या. आम्ही दोघी आध्यात्मिक मैत्रिणी आहोत.
२ आ. त्या आता फोंडा, गोवा येथे रहातात. आश्रमातील सेवा आणि घरातील सर्व कामे याचे त्या योग्य नियोजन करून त्या त्यांचे दायित्व व्यवस्थित पार पाडतात. त्याविषयी त्यांची कधीही तक्रार नसते.
२ इ. इतरांना आधार देणे : मी माझ्या संदर्भात घडलेला एखादा प्रसंग त्यांना सांगितल्यावर ‘त्या प्रसंगात माझी नेमकी काय चूक आहे ? मी कोणता दृष्टीकोन घेऊन प्रयत्न करायला हवे’, हे मला त्या स्पष्टपणे सांगतात. त्या मला कधीही भावनेच्या स्तरावर हाताळत नाहीत. ‘त्या तत्त्वनिष्ठ राहून योग्य काय असायला हवे’, हे मला सांगतात. त्यामुळे मला त्यांचा आधार वाटतो.
२ ई. प्रसंग घडल्यावर त्यावर लगेच मात करणे : एखादा प्रसंग घडल्यावर त्यांना त्या प्रसंगाचा काही त्रास होत असेल, तर त्याविषयी त्या लगेच माझ्याशी बोलून योग्य तो उपाय काढतात आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रसंगात अडकत नाहीत.
२ उ. आम्ही आध्यात्मिक मैत्रिणी असल्याने एकमेकींशी मोकळेपणाने बोलून चुकाही सांगण्यातील सहजता आम्ही एकमेकांमध्ये अनुभवतो.’
३. सौ. मनीषा पानसरे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
३ अ. सेवेची तळमळ : ‘सौ. पल्लवी यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केल्यावर काही दिवसांतच त्यांनी दायित्व घेऊन सेवा करण्यास प्रारंभ केला. ‘मी आश्रमात नवीन आले आहे, तर मला ही सेवा जमणार नाही’, असे त्यांनी कधीही सांगितले नाही. टप्प्याटप्प्याने संकलन सेवेतील सर्व प्रकारच्या सेवा शिकून घेतल्या आणि त्याचे दायित्व घेऊन त्या सेवा करू लागल्या. त्यानंतरही कधी सेवा करायला कोणी साधक उपलब्ध नसतील, तर तीही सेवा त्या करू लागल्या. त्या स्वतःची सेवा आणि दिलेली अधिक सेवा असे दोन्ही सहजतेने करतात.’
सर्व सूत्रांचा दिनांक (२६.४.२०२३)