पंचगंगा नदीत मिसळल्या जाणार्या प्रचंड सांडपाण्याविषयी अंनिस आतापर्यंत कधीच काही बोललेली ऐकिवात नाही !
कोल्हापूर – पंचगंगेचे प्रदूषण अल्प करण्याविषयीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आला आहे. यात ८९ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा अहवाल प्रदूषण मंडळाकडून मुख्य सचिवांना पाठवण्यात येणार असून मुख्य सचिव हा अहवाल हरित लवादाला सादर करणार आहेत. (इतक्या मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण थांबण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना न करता प्रशासन केवळ गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करते, हे कितपत योग्य आहे ? गणेशभक्तांना पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनास आडकाठी करणारे प्रशासन जी गावे सांडपाणी थेट नदीत सोडतात, त्यांच्यावर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? – संपादक)
यात पंचगंगा नदीचे प्रदूषण नियंत्रित करण्याच्या विविध उपाययोजनांचा समावेश आहे. पंचगंगा नदीकाठी १७१ गावे असून यांपैकी किती गावांचे पाणी थेट नदीत मिसळते ? याचे सर्वेक्षण करण्यात आले. यात प्रदूषणास कारणीभूत ठरणार्या ८९ गावांमध्ये वनराई बंधारे, सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे घालण्यात आले आहेत. नदीकाठच्या मोठ्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय केंद्रशासनाकडे ८९ गावांसाठी २५२ कोटी रुपयांचा आराखडा पाठवण्यात आला आहे.
या अहवालाच्या संदर्भात प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशी केली असता संबंधित अधिकार्यांना ‘असा कोणताही अहवाल आम्हाला मिळालेला नाही’, असे सांगितले. |