चिपळूण – येत्या २ जूनला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात (लोटिस्मात) महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.
२ जूनला लोटिस्माच्या सभागृहात सकाळी ६ वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. पवित्र नद्यांच्या जलाने महाराजांच्या प्रतिमेला मंगलस्नान केले जाईल. त्यानंतर महाराज पालखीतून गौतमेश्वराच्या दर्शनाला जातील. या पालखीसमवेत सनई-चौघडा आणि मंगलवाद्ये असतील, तसेच या वेळी सरीपट्ट्याचे चित्तथरारक खेळही होतील.
गौतमेश्वराच्या दर्शनानंतर महाराज ग्रामदेवत कालभैरवाचे दर्शन घेऊन दरबारात येतील. त्यानंतर पुरोहित महाराजांचा मंत्रांसहित अभिषेक करतील. महाराजांची स्तुतीस्तोत्रे गायली जातील. नृत्यगायनादी कार्यक्रम झाल्यानंतर शहरातील प्रमुख देवस्थानांना मानाची वस्त्रे आणि श्रीफळ देण्यात येणार आहे.
३५० वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र रायगडावर जसा राज्याभिषेक झाला, तसाच राज्याभिषेक सोहळा होणार असून या उत्सवात सर्वांनी पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.