मूळ संभाजीनगर येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी संतपदी विराजमान झाले. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (पू. सत्यनारायण तिवारी यांची मुलगी), फोंडा, गोवा.
१ अ. मुलीच्या साधनेला विरोध करणे आणि सनातनच्या ग्रंथांतील चैतन्याने पालट होऊ लागणे : ‘वर्ष १९९८ मध्ये मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. त्यानंतर एक वर्षाने मी सेवेनिमित्त बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाबांनी (श्री. सत्यनारायण तिवारी यांनी) मला सांगितले, ‘‘तू कुठे जायचे नाहीस. तू गेलीस, तर तुझे पाय तोडून टाकीन.’’ एकदा मी त्यांना न सांगता सेवेनिमित्त बाहेर गेले. तेव्हा त्यांनी सनातन संस्थेचा कापडी फलक जाळून टाकला. एकदा आम्ही सनातनच्या ग्रंथांसबंधी सेवा करण्याचे ठरवले. तेव्हा बाबांनी सांगितले, ‘‘मी ते ग्रंथ फेकून देईन. मी ग्रंथांचे सगळे खोके जाळून टाकीन’’; मात्र आम्ही सनातनचे ग्रंथ घरी आणल्यावर बाबा एकदम शांत झाले. त्यानंतर त्यांच्यात पालट होऊ लागला.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले संभाजीनगर येथे आल्यावर वडिलांनी त्यांना साष्टांग दंडवत घालणे : बाबा संभाजीनगर येथील साधकांच्या घरी जाऊन राग व्यक्त करायचे आणि अपशब्द बोलायचे. वर्ष २००३ मध्ये गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) संभाजीनगर येथे आले होते. तेव्हा ‘बाबा गुरुदेवांना भेटले, तर काय होईल ?’, अशी भीती मला वाटली. बाबा गुरुदेवांना भेटायला गेले असतांना गुरुदेव त्यांच्या समोर पाठमोरे उभे होते. गुरुदेवांनी वळून पाहिल्यावर बाबांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला.
आम्ही सर्व जण पहातच राहिलो. साधक मला सांगू लागले, ‘‘आरती तुझे वडील आले.’’ मी जाऊन पाहिले, तर वातावरण काही वेगळेच झाले होते. गुरुदेवांनी माझ्या बाबांकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले. त्या दिवसापासून बाबा गुरुदेवांशी जोडले गेले.
बाबा २ वर्षांनंतर देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आले.
१ इ. ‘श्री गजानन महाराजांनीच मला आश्रमात आणले आहे’, असे वडिलांना वाटणे आणि त्यांनी मुलीला ‘तू चांगल्या ठिकाणी आली आहेस’, सांगणे : बाबा पूर्वी श्री गजानन महाराजांची भक्ती करत होते. बाबांची त्यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. गजानन महाराज प्रकटदिनाच्या दिवशी ते गजानन महाराजांच्या मंदिरात न चुकता जात असत. त्यांना रात्री कितीही उशिरा आठवण झाली, तरी रात्री १० – ११ वाजताही ते मंदिरात जायचे. बाबा जेव्हा प्रथमच देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आले, त्या दिवशी गजानन महाराज प्रकटदिन होता. मी बाबांना याची आठवण करून दिली. त्या दिवशी बाबांना वाटले, ‘गजानन महाराजांनीच मला (बाबांना) येथे आणले आहे.’ बाबांनी आश्रम पाहिल्यानंतर मला सांगितले, ‘‘तू पुष्कळ चांगल्या ठिकाणी आली आहेस.’’
१ ई. त्यानंतर २ वर्षांनी बाबा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मी तुला काय संरक्षण देणार ? तू एवढ्या चांगल्या ठिकाणी आहेस. तुला जे करायचे आहे, ते तू कर.’’
१ उ. पूर्वजांच्या त्रासामुळे वडिलांचा मुलीच्या साधनेला विरोध असणे : आम्हाला पूर्वजांचा पुष्कळ त्रास आहे. माझ्या वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत आम्ही पितृपक्षात श्राद्धविधी केले नव्हते. मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर ६ – ७ वर्षांनंतर पितृपक्षात श्राद्धविधी करायला आरंभ केला. बाबा माझ्या साधनेला विरोध करत होते. आध्यात्मिक त्रासामुळे त्यांना अधिक प्रमाणात राग येत असे.
१ ऊ. २० – २२ वर्षे राजकारणात असणे, राजकारणात ‘प्रामाणिकपणाला महत्त्व नाही’, हे लक्षात आल्यावर राजकारण सोडून साधनेत येणे आणि त्यानंतर ७ – ८ वर्षांतच आध्यात्मिक स्थिती चांगली होणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गुरुदेवांची चौकट आली होती, ‘राजकारणात राहून काही लाभ होणार नाही. साधना केली, तरच पुढे जाणार.’ बाबा २० ते २२ वर्षे एका राजकीय पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते होते. त्यांना तेथे कोणतेही पद मिळाले नाही, तरीही त्यांना त्याचे दुःख झाले नाही. त्यांनी निवडणुकीच्या वेळी कधीही पैसे घेतले नाहीत. ‘राजकारणात ‘प्रामाणिकपणा’, या गुणाला महत्त्व नाही’, हे लक्षात आल्यावर त्यांनी राजकारण सोडले आणि ते साधनेत आले. ते साधनेत आल्यानंतर ७ – ८ वर्षांतच त्यांची आध्यात्मिक स्थिती चांगली झाली.
१ ए. साक्षीभाव : साधनेत येण्याच्या आधीपासूनच बाबांमध्ये पुष्कळ साक्षीभाव आहे. ते भावनाशील होत नाहीत. बहिणीला मार लागण्याच्या प्रसंगी, तसेच तिच्या लग्नाच्या वेळी किंवा भावाला काही झाल्यासही ते स्थिर होते. ते साधनेत आल्यानंतर त्यांनी सगळे गुरुदेवांवर सोपवले आहे.
१ ऐ. २० ते २२ वर्षांपासून नोंदवहीत प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका लिहिणे : बाबा २० ते २२ वर्षांपासून एका नोंदवहीत (डायरीत) प्रतिदिन त्यांच्याकडून झालेल्या चुका लिहीत असत, उदा. कोणाला मारले, शिव्या दिल्या किंवा कोणाचा राग आला. तेव्हा त्यांचा ‘मी देवाला सांगितले आहे’, असा भाव असायचा. त्यांनी स्वतःहून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली. माझी आई त्यांचे लिखाण त्यांना न सांगता वाचत असे. बाबांनी ‘माझ्या आईने (त्यांच्या पत्नीने) हे वाचले, तर तिला काय वाटेल ?’, असा विचार केला नाही.’
२. सौ. सविता सत्यनारायण तिवारी (पू. सत्यनारायण तिवारी यांच्या पत्नी), फोंडा, गोवा.
२ अ. यजमानांनी देवद आश्रमाच्या दाराच्या बाहेर साष्टांग दंडवत घालणे : ‘एकदा मी यजमानांना सांगितले, ‘‘मी २ मास देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी जाते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू जाऊन ये. मी येथील सांभाळतो. मी तुला आश्रमात पोचवायला येतो.’’ आम्ही आश्रमापाशी गेल्यावर मी थेट आतमध्ये गेले; मात्र यजमानांनी आश्रमाच्या दाराच्या बाहेर साष्टांग दंडवत घातला. यजमान त्या स्थितीत १० मिनिटे होते. तेव्हा मला वाटले, ‘यजमानांमध्ये किती भाव आहे ! आश्रमात सूक्ष्मातून गुरुदेवांचे अस्तित्व असल्याने यजमानांनी आश्रमाच्या दाराच्या बाहेर साष्टांग दंडवत घातला.’
२ आ. देवाप्रती भाव
२ आ १. काही न खाता-पिता ७ घंटे देवाची पूजा करणे आणि पूजेनंतर देवाकडे क्षमायाचना अन् प्रार्थना करणे : यजमान काही न खाता-पिता ७ घंटे देवाची पूजा करण्यात आणि स्तोत्रे म्हणण्यात व्यस्त असायचे. त्यांनी एकही दिवस पूजा करण्याचे चुकवले नाही. पूजा झाल्यानंतर ते देवाला सांगायचे, ‘मी पुष्कळ दोषी आहे. मला क्षमा कर.’ ते १० ते १५ मिनिटे क्षमायाचना करत असत. त्यानंतर ते ‘सर्वांचे चांगले होवो’, अशा आशयाची प्रार्थना करत असत.
२ आ २. ते इतका वेळ पूजा करत असतांना सर्व जण त्यांना सांगायचे, ‘‘तुम्ही मध्ये चहा घ्या. पोळी खा’’; पण ते कुणाचे ऐकत नसत. एवढे ते हट्टी होते; मात्र त्यांचे देवाकडे लक्ष होते.
२ इ. ३० वर्षांनी घरी आलेल्या मित्राशी बोलण्यापेक्षा देवपूजेला महत्त्व देणे : एकदा ते पूजा करत असतांना त्यांचा एक मित्र घरी आला. तो ३० वर्षांनी आमच्या घरी आला होता, तरीही यजमान पूजा करत होते. त्यांनी ‘इतरांना काय वाटेल ?’, याचा विचार केला नाही. त्यांचा मित्र गेल्यानंतर मी यजमानांना विचारले, ‘‘तुमचा मित्र ३० वर्षांनी घरी आला, तर तुम्ही त्याच्याशी अधिक बोलला का नाहीत ?’’ तेव्हा यजमान म्हणाले, ‘‘तो देवापेक्षा मोठा आहे का ? तू होतीस ना त्याच्याशी बोलायला ?’’
२ ई. यजमानांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाल्यावर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया तिवारीकाका आधीपासूनच राबवत आहेत.’’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २३.४.२०२३)
पू. सत्यनारायण तिवारी संत होण्याच्या संदर्भात त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळालेल्या पूर्वसूचना !१. पू. सत्यनारायण तिवारी यांना ‘संत’ घोषित करण्याच्या दिवशी ते आनंदी असणे : ‘२३.४.२०२३ या दिवशी माझे वडील (पू. सत्यनारायण तिवारी) यांना भेटण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घरी येणार होत्या. त्या दिवशी बाबांना झोप येत नव्हती. अन्य दिवशी ते अधिक वेळ झोपेतच असतात. तेव्हा आईने त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला आज झोप येत नाही का ? आज तुम्ही आनंदीही दिसत आहात. काय झाले ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तू आरतीला विचार. तिला ठाऊक असेल.’’ २. पू. सत्यनारायण तिवारी यांची मुलगी आणि मुलगा यांना ‘त्यांचे वडील संत झाले आहेत’, असे वाटणे : मलाही वाटत होते, ‘बाबा संत झाले असावेत.’ प्रत्यक्षात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी बाबा संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. तेव्हा ‘बाबांना त्याची पूर्वसूचना मिळाली होती’, याची मला जाणीव झाली. संभाजीनगर येथे असलेला माझा भाऊ श्री. निखिल तिवारी यालाही त्या दिवशी दुपारी ‘बाबा संत झाले असावेत’, असे जाणवले.’ – होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी |
|