शनिदेव आणि त्यांची करावयाची उपासना

आज १९.५.२०२३ या दिवशी ‘शनैश्चर जयंती’ आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

‘शनिमहाराज आणि संकटे, शनिमहाराज खरोखर कसे आहेत ? शनिमहाराजांची उपासना यथार्थपणे कशी करावी ?’ याविषयीचे विवेचन येथे देत आहोत.

शनिदेव

१. साडेसातीतील घटनांचे विश्लेषण

‘शनि ग्रह म्हणजे संकटे’, हे समीकरण खरे नाही. साडेसातीच्या फेर्‍यामध्ये आपणास जे त्रास होतात आणि अनपेक्षित धक्के बसतात, त्याचे प्रमाण कुणी नीटपणे पडताळले आहे ? त्याची कारणमीमांसा केली आहे का ? उलट सर्वसामान्य जनतेने हा अपसमज करून घेतला आहे. प्रत्येकाने बारकाईने स्वतःच्या साडेसातीतील घटनांची सूची ठेवली आणि त्यांचे विश्लेषण केले, तर त्यास पुढील गोष्टी आढळतील.

अ. साडेसातीत वास्तूयोग हमखास यशस्वी होतो.

आ. साडेसातीत विवाह जमतो आणि प्रसन्न होतो.

इ. साडेसातीत पदोन्नती होते.

ई. साडेसातीत व्यवसाय किंवा नोकरीत नवी संधी आणि वाट सापडते.

उ. मानवी संबंधांचे सर्वाेत्तम ज्ञान आणि लोक जोडणे जमते.

२. स्वतःच्या चुकीच्या कर्मांचा त्रास शनिदेवाच्या नावावर खपवणे कितपत योग्य ?

मी स्पष्ट सांगतो, ‘ तुम्ही एकदा नाही, तर १० वेळा तुमच्या आयुष्यातील घटना पडताळा. प्रामाणिकपणे ठरवा की, साडेसाती कशी गेली ? अर्थात् प्रकृती त्रास आणि काही वेळेस कायद्याच्या चक्रात सापडणे, याही गोष्टी होतात. आर्थिक फटके लक्षात रहातात; पण हे त्रास होण्यामागे स्वतःकडून काही चूक झाली आहे का ? याचे आत्मपरीक्षण प्रामाणिकपणे कुणी करत नाही.

शनिमहाराज काही अनपेक्षित गोष्टी आपल्या समजुती आणि अहंकाराला उखडून काढण्याकरता घडवतात; पण एकूण साडेसात वर्षांत खरोखरचा त्रास ७ – ८ मासच असतो. सारांश मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, शनिदेव म्हणजे संकटे नव्हेच. ते नेहमी प्रसन्न असतात. तुमच्या चुकीच्या कर्मांचा त्रास तुम्ही त्यांच्या नावावर खपवता हेच सत्य !

३. शनिमहाराज कृतीशील, सामर्थ्यवान आणि कृपाळू असणे

शनिमहाराज हे बोलत नाहीत; पण कृतीशील आहेत. ते खरोखर केवढे सामर्थ्यवान आणि कृपाळू आहेत, हे आम्हास समजले नाही. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या त्यांची नोंद घेणे भाग पडते ते खालील गोष्टींमुळे (ज्यामुळे त्यांची उपासना आवश्यक ठरते) !

अ. शनीचा दशमाशी संबंध क्रांतीकारी असतो. दशमात असतांना ते ‘बूट पॉलीश’ करायला लावतील आणि तेथून राजपदीही नेऊन बसवतील (पण त्याकरता ते प्रसन्न व्हायला हवेत, जो या लेखाचा विषय आहे.), तसेच राजपदावरून भिकारी अवस्था आणायला कचरणार नाहीत, ज्याला कारणीभूत तुम्हीच असता.

आ. शनिमहाराजांचा धनस्थानाशी संबंध हा आर्थिक आणि कौटुंबिक दृष्ट्या अनेक विचित्र स्थित्यंतरातून नेतो.

इ. चतुर्थ स्थानी ते तुम्हास सुख घराबाहेर शोधण्याचा सल्ला देतील.

ई. तृतीय, षष्ठ, लाभ या स्थानात ते अधिक साहाय्यकारी ठरतात; पण तुम्ही कसे वागता ? यावर ते बारीक लक्ष ठेवतात.

उ. ते सप्तम स्थानी असतांना एकाकीपणा आणि संसाराची व्यर्थता ठराविक प्रसंगातून लक्षात आणून देतात. वैवाहिक सौख्यापासून रोखून धरणे, हा त्यांचा एक अपरिहार्य भाग असतो.

ऊ. व्यय आणि भाग्य स्थानातून तुम्हाला ते तत्त्वज्ञानाची उब पुरवत असतात. ती जाणून घेणे तुमच्यावर आहे.

ए. अपंगत्व, कुबड, थकवा, एकाकी मरण, दीर्घ आजार, लोकप्रियता, नेतृत्व, आर्थिक चढ-उतार आणि हावरटपणाला शिक्षा अशा प्रत्येक गोष्टीत शनिमहाराजांचा संचार असतो.

ऐ. अनेकांना वाटते की, ते नैराश्यवादी बनवतात; पण ते चूक आहे. तो तुमचा निर्णय असतो. तुम्ही जिद्दीने उभे रहा, तर शनिमहाराज पाठीशी उभे असतील. स्वप्नवत यश देणारे शनीच !

ओ. शनिमहाराजांची महादशा पत्रिकेत ऐन उमेदीत असणे, म्हणजे आयुष्यातील प्रचंड घडामोडींची सूचना होय.

४. शनिदेवांना प्रसन्न कसे करावे ? त्यांची यथार्थ उपासना कशी करता येईल ?

शनिमहाराजांचा कृपाळूपणा आणि सामर्थ्य पाहिले; पण वेळप्रसंगी त्यांच्याएवढा कठोर शिक्षक नाही. आता सर्वांत महत्त्वाच्या मुद्याकडे वळू. आपणास अधिकाधिक सुखदायी काळ हवा असेल, तर शनिदेवांना प्रसन्न कसे करावे ? त्यांची यथार्थ उपासना कशी करता येईल ? ते लक्ष देऊन वाचा.

४ अ. ‘पारंपरिक कर्मकांड तात्काळ बंद करणे’, ही उपासनेची पहिली पायरी ! : पारंपरिक उपासना आणि काही गल्लाभरू ज्योतिषांनी सुचवलेल्या उपायांपेक्षा या लेखात सुचवलेले उपाय अन् उपासना अत्यंत धक्कादायक वाटतील; पण खोलवर विचार करून त्यांचा अंगीकार सर्वांनी करावा. शनिदेवाला ढोंगीपणाची चीड आहे. उक्ती आणि कृती यांतील दोन ध्रुव त्यांना केव्हाही प्रसन्न करू शकत नाहीत. शनिदेवाला शिस्त, प्रामाणिकपणा, सत्य, साधुत्व, संयम, मिताहार, तत्त्वज्ञान, चिंतन, लोकसेवा आणि नियमांचे पालन या गोष्टी आवडतात. वरील ढोंगी गोष्टी नव्हेत. तसेच उद्योगीपणा, कष्ट, आर्थिक काटेकोरपणा आणि नियोजनबद्धता यांवर त्यांचा कटाक्ष आहे; म्हणून ठामपणे सांगतो की, पारंपरिक कर्मकांड तात्काळ बंद करावे, ही उपासनेची पहिली पायरी !

४ आ. शनिदेवाला आवडणार्‍या २ प्रकारच्या उपासना : शनिदेवाला मानसिक आणि व्यावहारिक अशा २ प्रकारच्या उपासना आवडतात. केवळ शनिवारी नव्हे, तर आयुष्यातील प्रत्येक क्षणाला ती उपासना जपणे, त्यांना प्रसन्न करणे आवश्यक आहे. यास्तव ‘केवळ शनिवार’ कल्पना डोक्यातून काढावी. प्रतिदिन कामावर जातांना मनोमन त्यांचे स्मरण करून वंदन करावे. रात्री एकांतात बसावे. पूर्ण शांतता असावी. दिवसभरातील आणि आयुष्यातील कर्मांची आठवण करावी. ‘त्यात काय चुकले ?’, याचे चिंतन करावे. रात्री झोपतांना पुन्हा स्मरण करावे आणि आपल्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागावी. अशा रितीने प्रतिदिन तीनदा स्मरणोपासना होईल.

४ इ. भ्रष्टाचार किंवा बेकायदा गोष्टींपासून दूर रहाणे : प्रतिदिन कोणतीही गोष्ट करतांना सत्य आणि प्रामाणिकपणा जपत आहोत का ? ते मनाला विचारत रहावे. जिथे भ्रष्टाचार किंवा बेकायदा गोष्टींचा वास येईल, तिथून तात्काळ बाजूला व्हावे.

४ ई. शनिदेवाला मिताहार, सात्त्विकता आणि स्वनिर्मित गोष्टी मान्य असणे : शनिवारचा उपवास करण्याऐवजी शनिदेवाला मिताहार, सात्त्विकता आणि स्वनिर्मित गोष्टी मान्य आहेत. यास्तव बाहेरचे खाणे (अपरिहार्यता सोडता) तात्काळ आणि कायमचे बंद करावे. केवळ घरी शिजवलेले अन्न खावे. दूध आणि फळे यांचा समावेश असावा. चमचमीत खाणे नसावे. उपवास केल्यास केवळ दूध आणि फळे खावीत. आहार न्यून आणि ठराविक वेळीच घ्यावा. ही एक मोठी उपासना आहे.

४ उ. शनिदेवाला निसर्ग जवळचा असणे : शनिदेवाला निसर्ग जवळचा आहे. आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा तरी डोंगर किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन काही घंटे कोणत्याही संपर्कावाचून चिंतनात घालवावेत.

४ ऊ. प्रतिदिन एक घंटा मौन पाळावे.

४ ए. अडचणीत असलेल्यांना निरपेक्षपणे साहाय्य करणे : जो अडचणीत आहे, ज्याला शिक्षणविषयक शंका आहेत, ज्यांना परावलंबित्व आहे, अशांना संधी मिळेल, तेवढे साहाय्य करावे. त्यासाठी कोणत्याही गोष्टींची अपेक्षा ठेवू नये.

४ ऐ. कुठेही देणगी दिल्यास बोलू नये. देणगीचा योग्य ठिकाणी व्यय (खर्च) होईल, याकडे लक्ष द्यावे.

४ ओ. शनिदेव चंगळवादाविरुद्ध असणे : शनिदेव चंगळवादाविरुद्ध आहेत. त्यामुळे सर्व गरजा अल्प कराव्यात. केवळ गरजेपुरत्याच संख्येने संचय असावा.

४ औ. कायद्याचे पालन ही शनिदेवाची उपासना असणे : कायद्याचे पालन ही शनिदेवांची उपासना आहे. सर्व प्रकारचे कर भरणे, रहदारी, संस्थेची नियमावली इत्यादी गोष्टीत हयगय कधीही करू नये. कायदा कठोरपणे पाळावा आणि दुसर्‍याशी वेळप्रसंगी झगडावे.

४ अं. शरिराला वळण लावल्यास शनिमहाराज कौतुक करतात. यास्तव प्रतिदिन न चुकता व्यायाम करावा. विशेषतः चालणे भरपूर असावे.

४ क. शनिदेवाचा नीलवर्णाशी संबंध असणे : निळा रंग शांतपणा आणि विचारीपणा दर्शवतो. शनिदेवाचा नीलवर्णाशी संबंध आहे; म्हणून प्रतिदिन निळ्या आकाशाकडे काही वेळ तरी एकटक पहात बसावे.

४ ख. शनिमहाराजांना कोणत्याही छत्राची आवश्यकता नसणे : शनिमहाराजांना कोणत्याही छत्राची आवश्यकता नाही. त्यातून ते विचारांचा स्वतंत्रपणा आणि स्वाभिमान सुचवतात. कोणतीही सभा, परिषद, वरिष्ठ यांपुढे स्वतःचे प्रामाणिक मत स्पष्टपणे आणि ठामपणे मांडावे. कुणाचेही लांगूलचालन करणे, म्हणजे शनिदेवांचा अपमान आहे.

४ ग. अव्यवस्थितपणा आणि शनिदेव यांचे वाकडे आहे. प्रत्येक गोष्टीत नियोजन आणि बारीक सारीक सूत्रांचा विचार केल्याने त्यांची मोठी उपासना होते.

४ घ. नम्रता, कष्टाविषयी आदर आणि ज्ञानार्जन यांच्यामुळे शनिमहाराज अतिशय प्रसन्न होतात. त्यामुळे सतत आदर्शांच्या शोधात रहावे.

४ च. शनिदेवाला वेळेची बेशिस्त आवडत नसणे : शनिदेवाला वेळेची बेशिस्त आवडत नाही; म्हणून प्रत्येक गोष्टीत वेळेचे बंधन पाळावे. प्रत्येक कार्याच्या पूर्णत्वाकरता कालमर्यादा घालावी. भाषण असो वा लेखन असो, त्यात मुद्देसूदपणा असावा आणि तो दिलेल्या मर्यादेत आहे, याची निश्चिती करावी.

४ छ. साडेसातीविषयी प्रथमच सांगितले आहे; तथापि उपाय म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सर्वप्रथम कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करतांना नीट वाचून विचार करून मग स्वाक्षरी करावी. यामुळे अनपेक्षित धक्के बसणार नाहीत.

४ ज. प्रत्येक व्यक्तीविषयीचे आपले मत आणि त्याच्याकडून असणारी अपेक्षा साडेसाती चालू असतांना ठराविक कालांतराने पडताळत रहावी; कारण तो भास असू शकतो. शनिदेव उपाय सुचवतात की, कठोरपणे चिकित्सा करावी.

४ झ. शनिदेवाची सर्वाेत्तम उपासना : नवीन उद्योगात आणि कामात स्वतःला झोकून देणे. जितक्या योग्य दिशेने प्रयत्न, कष्ट आणि उद्यमशीलता ठेवाल, त्यातून ते ठराविक काळानंतर प्रचंड भरभराट मिळवून देतील. अर्थात् हे काम करतांना कुणावरही अन्याय होऊ नये किंवा कुणासही बुडवून प्रगती असू नये.

४ ट. अन्याय आणि असत्य शनिदेवांना अमान्य असणे : अन्याय आणि असत्य शनिदेवांना मान्य नाही. त्यामुळेच त्याविरुद्ध न लढणे, हा त्यांचा अपमान करणे होय. प्रत्येकाने शनिदेवाची उपासना म्हणून समाजातील सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध जमेल तेवढे लढत रहावे. आजूबाजूला नजर टाका, तुम्हाला अनेक व्यक्तीमत्त्वाचे लोक दिसतील, जे खरोखर शनिदेवाची उपासना करत आहेत.

४ ठ. सत्तेच्या आसंदीत बसून सूडबुद्धी म्हणून त्या आसंदीचा वापर करणार्‍यास शनिदेव क्षमा करत नाहीत. ते एक दिवस प्रतिष्ठा धुळीस मिळवतात.

४ ड. आर्थिक व्यवहारात काटेकोर रहाणे : आर्थिक व्यवहार आणि शनिदेव यांचा मोठा संबंध आहे. जगाचे अर्थशास्त्र, तेजी-मंदी, तेलाचा व्यापार, कामगार लढे, आर्थिक प्रगती आणि अधोगती, नाणे व्यवहार, स्थावर, संपत्ती, किंमतीतील चढ-उतार आदी अनेक गोष्टींवर शनिदेवाची निर्विवाद सत्ता आहे. यातून यशस्वीपणे टिकून रहाण्याकरता शनिदेवांनी एकच उपासना सुचवली आहे, ‘‘आर्थिक व्यवहारात काटेकोर रहा. हिशोब चोख ठेवा. घोटाळे करू नका. येणे आहे, त्याचा तपशील ठेवा आणि वेळप्रसंगी झगडायला मागे-पुढे पाहू नका.’’

४ ढ. शनिमहादशा चालू असतांना कोणत्याही गोष्टीत तक्रार करणे बंद करा. आरंभीची वर्षे तुमच्याकडून काम करून घेतल्यावर ते प्रसन्न होतात. वर सांगितलेली उपासना पूर्ण शनिमहादशेत चालू ठेवावी.’

– श्री. हनुमंत नाडगौडा

(साभार : ‘भाग्यनिर्णय’, दिवाळी अंक २००७)