परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवासाठी नामधुनी सिद्ध करतांना साधकांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष २०२२ मध्‍ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त मंगलमय रथोत्‍सव साजरा झाला. या सोहळ्‍यात नामधून लावण्‍यासाठी त्‍या सिद्ध करण्‍याची सेवा महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, संगीत विशारद), सौ. अनघा जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, बी.ए. संगीत) आणि सतारवादक श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के, वाद्य अभ्‍यासक) करणार होते. या रथोत्‍सवात लावण्‍यासाठी त्‍यांनी ‘श्रीमन् नारायण नारायण हरि हरि’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘जय जय राम कृष्‍ण हरि’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘नारायण नारायण गुरुवर नारायण’, आणि ‘गोविंद बोलो हरि गोपाल बोलो’, अशा एकूण ६ नामधुनी सिद्ध केल्‍या होत्‍या. ही सेवा करतांना त्‍यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

१. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के, वाद्य अभ्‍यासक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

श्री. मनोज सहस्रबुद्धे

१ अ. ‘जय जय राम कृष्‍ण हरि’ ही नामधून वाजवून पहातांना ‘कृष्‍ण’ हा शब्‍द सतारीवर नीट वाजवता न येणे आणि नामजप करत सतारीवरील आवरण काढल्‍यावर ‘कृष्‍ण’ शब्‍द नीट वाजवता येणे : ‘मी ‘जय जय राम कृष्‍ण हरि’ ही नामधून सतारीवर वाजवून पहात असतांना मला ‘कृष्‍ण’ हा शब्‍द नीट वाजवता येत नव्‍हता. त्‍या ठिकाणी ‘कुश्‍ण’ किंवा ‘कुन’ असे वाजल्‍याचा आवाज यायचा. प्रत्‍येक वेळी मला ते खटकायचे; परंतु ‘तो कसा वाजवायचा ?’, हे माझ्‍या लक्षात येत नव्‍हते. नंतर मी नामजप करत सतारीवरचे आवरण काढले आणि मला साक्षात् कृष्‍णच गवसला, म्‍हणजे सतारीवर ‘कृष्‍ण’ शब्‍द कसा वाजवायचा ?’, याचे मला आपोआप ज्ञान झाले. त्‍यामुळे ‘कृष्‍ण’ शब्‍द नीट वाजवता येऊन ती नामधून वाजवतांना मला पुष्‍कळ आनंद मिळाला.

१ आ. नामधुनींच्‍या ध्‍वनीमुद्रणाची सेवा करतांना विविध अडथळे येणे, देवाने नामजप करत आवरण काढण्‍यास सुचवणेे, त्‍याप्रमाणे केल्‍यावर सर्व अडचणी दूर होऊन ध्‍वनीमुद्रण व्‍यवस्‍थित होणे : १८.५.२०२२ या दिवसापासून रथोत्‍सवात लावायच्‍या नामधुनींचे ध्‍वनीमुद्रण चालू केले होते. तेव्‍हा नामधून गाणार्‍या सौ. अनघा जोशी यांना सर्दी होऊन त्‍यांचा आवाज बसला. वाफ घेऊनही त्‍यांची सर्दी जात नव्‍हती. दुसर्‍या दिवशी दुपारी नामधून गाणार्‍या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनाही श्‍वास घ्‍यायला त्रास होऊ लागला. त्‍या दोघीही बर्‍या झाल्‍यावर मला सराव करून बसवलेल्‍या स्‍वरांचे विस्‍मरण होऊ लागले. आम्‍हाला ध्‍वनीमुद्रण (audio track चे संकलन) करतांना अनेक अडथळे येत होते. शेवटी शरण जाऊन देवाला प्रार्थना केल्‍यावर त्‍याने मला नामजप करत माझ्‍यावरचे आणि सतारीवरचे आवरण काढायला सुचवले. त्‍याप्रमाणे मी प.पू. गुरुदेवांना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली. थोडा वेळ नामजप करून प्रथम माझ्‍यावरचे आणि सतारीवरचे आवरण काढले. नंतर मी मानसरित्‍या दोन्‍ही गायिका, वादक, ध्‍वनीमुद्रण करणारा साधक आणि सर्व यंत्रे यांच्‍यावरचे आवरण काढले. तेव्‍हा मला अतिशय हलके वाटले. त्‍यानंतर आम्‍हा सर्वांचा सेवेचा उत्‍साह वाढला.

त्‍यानंतर ‘श्रीमन् नारायण नारायण हरि हरि’, ‘गोविंद बोलो हरि गोपाल बोलो’ आणि ‘जय जय राम कृष्‍ण हरि’, या तीन नामधुनींचे पहिल्‍याच प्रयत्नात सुंदर ध्‍वनीमुद्रण झाले. तेव्‍हा ‘वाईट शक्‍ती कसे अडथळे आणतात ?’ आणि ‘नामजपादी उपाय केल्‍यावर अडथळे कसे दूर होतात ?’, याची मला अनुभूती आली. या अनुभूतींसाठी मी प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

(२२.५.२०२२)

२. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

२ अ. रथोत्‍सवाच्‍या वेळी ‘तुम्‍ही म्‍हटलेल्‍या नामधुनी लावा’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून आणि स्‍थुलातून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगणे : ‘रथोत्‍सवाच्‍या वेळी लावण्‍यासाठी प्रथम आम्‍ही अन्‍य गायकांनी म्‍हटलेली श्री नारायणावरील वेगवेगळी गाणी निवडली होती. ‘ती गाणी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना ऐकायला देऊया’, असा विचार माझ्‍या मनात आला, तेव्‍हा ‘अन्‍य गायकांनी म्‍हटलेली गाणी घेण्‍यापेक्षा ‘तुम्‍हीच म्‍हणा’, असे परात्‍पर गुरु डॉक्‍टर सांगत आहेत’, असे मला आतून जाणवलेे; पण मी त्‍या विचाराकडे दुर्लक्ष केले.

त्‍यानंतर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकण्‍यासाठी मी अन्‍य गायकांनी म्‍हटलेली गाणी लावल्‍यावर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ मला म्‍हणाल्‍या, ‘‘साधकांनी म्‍हटलेली गीते ऐकतांना ती अधिक चांगली वाटतात.’’ श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ म्‍हणाल्‍या, ‘‘यापेक्षा तुम्‍हीच (मी आणि सौ. अनघा जोशी) म्‍हणा.’’ त्‍यांनी मला काही धून म्‍हणूनही दाखवल्‍या. गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) मला आतून सुचवत होते, तेच श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी मला सांगितले.

२ आ. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ ही नामधून ध्‍वनीमुद्रित करतांना ‘सतारीचीही धून घेऊया’, असे देवाने सुचवणे आणि ‘सतारीच्‍या नादामुळेे नामधून ऐकतांना अधिक प्रमाणात आनंदाची स्‍पंदने येत आहेत’, असे जाणवणे : मी आणि सौ. अनघा जोशी नामधून गाण्‍याचा सराव करत असतांना मी सतारवादक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांना समवेत टाळ वाजवण्‍यासाठी बोलावले. तेव्‍हा माझ्‍या मनात आले, ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ ही नामधून म्‍हणतांना त्‍यामध्‍ये सतारीचा आवाजही चांगला वाटेल.’ मी श्री. मनोज सहस्रबुद्धे यांना म्‍हणाले, ‘‘सतारीवर ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ ही नामधून वाजवून पहा.’’ त्‍यांनीही अल्‍प कालावधीत सराव करून ही धून अतिशय सुंदर वाजवली. गायन, तबला, सतार आणि टाळ यांचा फार सुंदर मेळ जमला. ही आमच्‍यासाठी विशेष अनुभूती होती. सतारीमुळे ही नामधून ऐकतांना त्‍यात अधिक प्रमाणात आनंदाची स्‍पंदने जाणवली.

२ इ. सिद्ध झालेल्‍या नामधुनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ऐकवण्‍यासाठी लावल्‍यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘या नामधुनींवर डोलावेसे वाटते’, असे सांगणे : सर्व नामधुनी ध्‍वनीमुद्रित झाल्‍यावर आम्‍ही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना ऐकवण्‍यासाठी त्‍या लावल्‍या. त्‍या ऐकवल्‍यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ म्‍हणाल्‍या, ‘‘या नामधुनी ऐकतच रहाव्‍या’ आणि ‘या नामधुनींवर डोलावे’, असे वाटते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ म्‍हणाल्‍या, ‘‘नामधुनी थांबल्‍यावरही ‘या नामधुनींचा नाद घुमत आहे’, असे जाणवतेे. अन्‍य गायकांनी म्‍हटलेल्‍या गीतांपेक्षा साधकांनी म्‍हटलेल्‍या नामधुनी त्‍यातील सात्त्विकतेमुळे अधिक चांगल्‍या वाटतात.’’

२ ई. नामधुनी ऐकल्‍यावर परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना त्‍या पुष्‍कळ आवडणे आणि त्‍यांनी ‘डोळे बंद करून नामधुनी ऐकतांना अधिक आनंद जाणवतो’, असे सांगणे : या नामधुनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनाही ऐकण्‍यासाठी लावल्‍या. त्‍या ऐकतांना त्‍यांनी प्रथम काही वेळ डोळे उघडे ठेवून ऐकल्‍या आणि नंतर काही वेळ डोळे बंद करून ऐकल्‍या. ते म्‍हणाले, ‘‘छान झाल्‍या आहेत. ‘ऐकत रहावे’, असे वाटते. डोळे उघडे ठेवून ऐकत असतांना लक्ष थोडे इकडे-तिकडे जाते; परंतु डोळे बंद करून ऐकल्‍यावर मन नामधुनीवर एकाग्र होऊन आत आनंद जाणवतो.’’

३. सौ. अनघा जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, बी.ए. संगीत), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

सौ. अनघा जोशी

३ अ. वर्ष २०२२ मधील परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवात लावण्‍यासाठी नामधुनी सिद्ध करतांना वेगळाच आनंद मिळणे : या आधीही आम्‍हाला परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवात गायनसेवेची संधी मिळाली होती; पण वर्ष २०२२ मधील परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या रथोत्‍सवासाठी विविध नामधुनी सिद्ध करतांना मला आतून वेगळाच आनंद जाणवत होता.

१. प्रत्‍येक नामधून ध्‍वनीमुद्रित करतांना ‘तो नामजप देवाच्‍या चरणांजवळ जात आहे’, असा भाव ठेवल्‍याने नामधुनींचे ध्‍वनीमुद्रण करतांना आनंदाचे प्रमाण वाढले होते.

२. ‘अंतर्मनात जणू आनंदाच्‍या उकळ्‍या फुटत आहेत’, असे मला जाणवत होते. नामधून म्‍हणतांना आम्‍ही डोलत होतो, तेव्‍हा जणू ‘नामधूनच आम्‍हाला डोलवत आहे’, असे मला जाणवत होते.

३. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ ही नामधून म्‍हणतांना मला कधी श्रीरामाचे, तर कधी परात्‍पर गुरुमाऊलींचे श्रीरामाच्‍या रूपात दर्शन व्‍हायचे.

४. ‘श्रीमन् नारायण नारायण हरि हरि’ ही नामधून म्‍हणत असतांना केवळ ‘नारायण नारायण’च म्‍हणत रहावे’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.

५. ‘गोविंद बोलो हरि गोपाल बोलो’ ही नामधून म्‍हणत असतांना ‘गोविंदाला, हरीला केवळ आळवतच रहावे’, असे मला वाटत होते.

६. नामधुनी ध्‍वनीमुद्रित करतांना ‘आम्‍ही चैतन्‍याच्‍या स्रोतात आहोत’, असे मला जाणवत होते.

७. या नामधुनी ध्‍वनीमुद्रित झाल्‍यावर त्‍या ऐकतांना ‘या नामधुनी आम्‍ही गायल्‍या नसून अन्‍य कुणी गायल्‍या आहेत’, असे मला वाटले.

८. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यांमुळेच या नामधुनी अधिक चैतन्‍यदायी आणि दैवी झाल्‍या आहेत’, असे मला जाणवलेे.

९. प्रत्‍येक नामधुनीमध्‍ये परात्‍पर गुरुमाऊलीच्‍या जन्‍मोत्‍सवाचे अफाट चैतन्‍य आले असून ‘त्‍यांनीच या नामधुनी आमच्‍याकडून म्‍हणून घेतल्‍या आहेत’, असे मला वाटले.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक २.६.२०२२)

कृतज्ञता

परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त असलेल्‍या रथोत्‍सवासाठी विविध नामधुनी सिद्ध करण्‍याची सेवा आम्‍हाला त्‍यांच्‍या चरणी समर्पित करण्‍याची संधी मिळाली. यासाठी अनंत कोटी ब्रह्मांडनायक परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या चरणी आम्‍ही शरणागतभावानेे कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

रथोत्‍सवात होणार्‍या नृत्‍यासाठी निवडलेली गीते परात्‍पर गुरु डॉ. आठवले ऐकत असतांना ‘नारायणम् भजे नारायणम्’ या गीतामधील बासरीची धून चालू असतांना क्षणार्धात ‘त्‍यांनी हा रथोत्‍सव दिव्‍य लोकांत नेला’, असे जाणवणे

‘रथोत्‍सवात केल्‍या जाणार्‍या नृत्‍यांसाठी निवडलेली गीते परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना ऐकण्‍यासाठी लावली. तेव्‍हा ते आसंदीवर बसले होते आणि त्‍यांचे चरण माझ्‍या डोळ्‍यांसमोर येत होते. त्‍यातील ‘नारायणम् भजे नारायणम्’ या गीतामध्‍ये धृवपद झाल्‍यावर बासरीची एक धून वाजते. ती धून ऐकतांना माझे पूर्ण लक्ष त्‍यांच्‍या चरणांवर एकाग्र झाले आणि मला होणार्‍या रथोत्‍सवाचे दृश्‍य दिसून ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी क्षणार्धात हा रथोत्‍सव दिव्‍य लोकांत नेला. हा रथोत्‍सव या भूतलावर होत नसून उच्‍च लोकांत होत आहे’, असे दिसले. ते अनुभवतांना माझी भावजागृती झाली.

प्रत्‍यक्षातही श्रीमन् नारायणस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉक्‍टर रथामध्‍ये विराजमान होऊन रथोत्‍सव चालू झाल्‍यावर ‘रथाच्‍या मार्गाच्‍या दोन्‍ही बाजूंना उभे असलेले साधक गुरुदेवांना पहातांना पूर्ण भावावस्‍थेत गेले. तेव्‍हा हा रथोत्‍सव या भूतलावरील नाही’, असे मला जाणवले.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (२.६.२०२२)

रथोत्‍सवाच्‍या दोन दिवस आधी पुष्‍कळ पाऊस पडत असणे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना ‘तुम्‍हीच हा रथोत्‍सव निर्विघ्‍न करून घेणार आहात’, अशी मनात प्रार्थना केल्‍यावर रथोत्‍सवाच्‍या दिवशी आकाश निरभ्र होऊन रथोत्‍सव निर्विघ्‍नपणे पार पडणे

‘रथोत्‍सवाच्‍या २ दिवस आधी मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना रथोत्‍सवासाठी सिद्ध केलेल्‍या नामधुनी ऐकण्‍यासाठी लावल्‍या होत्‍या. तेव्‍हा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. नामधून ऐकून झाल्‍यावर त्‍यांनी मला विचारले, ‘‘एवढ्या पावसात आपला रथोत्‍सव होईल ना ?’’

तेव्‍हा मी त्‍यांच्‍यासमोर हात जोडून मनात प्रार्थना केली, ‘आपणच करून घेणार आहात.’ आश्‍चर्य म्‍हणजे रथोत्‍सवाच्‍या दिवशी आकाश पूर्ण निरभ्र झाले होते. तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी रथोत्‍सव सहजतेने करून घेतला’, असे मला जाणवले.

रथोत्‍सव पूर्ण झाल्‍यानंतर लगेचच पाऊस आला. तेव्‍हा माझ्‍या मनात विचार आले, ‘गुरुदेवांचे पंचमहाभूतांवर आधिपत्‍य आहे. त्‍यामुळे साधकांनी कसलीही काळजी करायला नको.’ त्‍यानंतर माझ्‍या मनात केवळ कृतज्ञताच जाणवत होती.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (२.६.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक