परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त नागपूर येथे काढलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !

सौ. रीभा मिश्रा

१ अ. नागपूर येथे ‘हिंदु एकता दिंडी’च्या वेळी दुपारी ४ वाजता उन्हाची तीव्रता न्यून होऊन उन्हाचा त्रास न होणे : ‘८.५.२०२२ या दिवशी नागपूर शहरात परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. ‘दुपारी ४ वाजता दिंडी चालू होणार होती.  प्रतिदिन नागपूरमध्ये दुपारी ४ वाजता पुष्कळ कडक ऊन असते. घराच्या बाहेर जाणे शक्य नसते. त्यामुळे ‘पुष्कळ ऊन असते. दिंडीत लहान मुलेही आहेत’, असा विचार येऊन मला थोडी काळजी वाटत होती. मी घरातून निघाल्यानंतर १५ ते २० मिनिटांतच वातावरणात पालट होत असल्याचे मला दिसू लागले. उन्हाची तीव्रता न्यून झाली. तेव्हा ‘आज दिंडीमध्ये सर्व देवता येणार आहेत’, असा विचार माझ्या मनात आला आणि ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांच्या मनातील विचार जाणतात. ते किती दयाळू आहेत !’, याची मला जाणीव होऊन गुरुदेवांप्रती कृतज्ञताभावाने माझे मन भरून आले.

१ आ. पायांच्या बोटांवरून चारचाकीचे चाक जाऊनही पायाला काहीच न होणे आणि हे पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : दिंडी झाल्यानंतर मी घरी परत जातांना एका साधकाला घरी सोडून येण्यासाठी थांबले होते. तोपर्यंत मी खाली वाकून अर्पणाचे पैसे पर्समधून काढून एका साधकाला देत होते. तेव्हा एक चारचाकी चालवणारे दादा गाडी मागे (रिव्हर्स) घेत असतांना माझ्या पायाची सर्व बोटे गाडीच्या चाकाखाली दबली गेली. मी थोडीशी ओरडले.  तेव्हा ‘आता माझ्या पायाच्या सर्व बोटांचा अस्थीभंग (फ्रॅक्चर) झाला असेल’, असे मला वाटले. ‘काही ना काहीतरी पायाला लागले असेल’, असे साधकांनाही वाटले; पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) एवढी कृपा होती, ‘माझ्या पायावरून गाडीचे चाक गेले असूनही मला काहीच लागले नाही.’ हा प्रसंग पाहून माझी गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली अणि माझी भावजागृती झाली. गुरुदेव माझ्यासाठी किती करतात ! ‘प्रत्येक क्षणी माझे रक्षक बनून माझ्या समवेत रहातात’, याची मला अनुभूती आली.

२. दिंडीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

अ. मी प्रत्यक्ष दिंडीजवळ पोचल्यावर मला वेगळेच चैतन्य आणि आनंद अनुभवता आला.

आ. सर्व साधकांना आनंदी पाहून माझाही आनंद ओसंडून वहात होता.

इ. जयघोष चालू असतांना माझ्या अंगावर रोमांच उभे रहात होते.

ई. ‘दिंडीत सर्व देवतांसह आम्ही सर्व जण चालत आहोत’, असे मला वाटले.

‘भगवान श्रीकृष्ण, दयाळू आणि कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच कृपेने मी या अनुभूती लिहून अर्पण करू शकले. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! मी गुरुदेवांच्या चरणी ही अनुभूती कृतज्ञतापुष्प रूपात अर्पण करते.’

– सौ. रीभा मिश्रा, नागपूर (१२.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक