परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

१. निसर्गदेवतेची अनुभवलेली कृपा

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर

‘२२.५.२०२२ या दिवसाच्या ३ – ४ दिवस आधी अधूनमधून पुष्कळ पाऊस पडत होता. २१.५.२०२२ या दिवशी रात्रीही सतत पाऊस पडत होता; मात्र २२.५.२०२२ या दिवशी सकाळी सूर्याेदय झाल्यावर ३ – ४ दिवसांत प्रथमच सूर्यदर्शन झाले. वातावरण अत्यंत प्रसन्न आणि आल्हाददायक होते. कोवळे सूर्यकिरण पृथ्वीला स्पर्श करत होते. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे भूवैकुंठ असल्याचे मला स्थुलातून अनुभवता आले.

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव आहे’, असे समजल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून भावजागृती होणे

२ अ. सनातनच्या तीन गुरूंचे दर्शन घेण्याची ओढ वाटणे : मी रथोत्सवाच्या वेळी रांगेत उभी असतांना मला पुढे एक रथ दिसला. मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे रथात चढतांना दर्शन झाले. तेव्हा माझ्या मनातील कृतज्ञताभाव जागृत होऊ लागला. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन घेण्याची ओढ आणि उत्सुकता मला लागली.

२ आ. सूत्रसंचालकाने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव आहे’, असे सांगितल्यावर मला अधिकच कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होऊ लागली.

२ इ. ‘सनातनचे तीनही गुरु स्थुलातून आमच्या पुढे असलेल्या रथात विराजमान आहेत आणि आम्ही त्यांच्या रथामागून चालणार आहोत’, हे लक्षात येताच माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. तीनही गुरूंचे चैतन्य ग्रहण होण्यासाठी माझ्या अंतर्मनातून उत्स्फूर्तपणे प्रार्थना होऊ लागल्या.

२ ई. रथोत्सवामध्ये विविध माध्यमांतून माझा भाव जागृत होत होता. ‘त्या भावावस्थेतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटत होते. अजूनही रथोत्सवाचे भावक्षण डोळ्यांपुढे येऊन माझी भावजागृती होते.

३. रथोत्सवाच्या वेळी भावजागृती होण्यास साहाय्य ठरलेले घटक

अ. सनातनच्या तीन गुरूंचे दिव्य अस्तित्व आणि त्यांचे साधकांकडे कृपादृष्टीने अन् कौतुकाने पहाणे, बोलणे आणि साधकांची प्रीतीपूर्वक विचारपूस करणे.

आ. सूत्रसंचालक करत असलेले अत्यंत भावपूर्ण सूत्रसंचालन.

इ. रथ ज्या मार्गावरून जात होता, त्याच्या दोन्ही बाजूंनी नमस्काराच्या मुद्रेत उभे असलेले साधक आणि त्यांच्या तोंडवळ्यावरील शरणागतभाव, कृतज्ञताभाव आणि सर्मपणभाव.

ई. रथोत्सवामध्ये साधकांनी जयघोष आणि नामजप करणे, भाव-भक्तीपर गीत लावणे अन् साधिकांनी भावविभोर होऊन नृत्ये करणे.

उ. नागेशी येथे साधक सेवा करतात, तेथे सनातनच्या तीन गुरूंचा काही वेळ विसावा होता. तेव्हा बर्‍याच कालावधीनंतर येथे एकत्रित तिन्ही गुरूंचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन झाले. तेव्हा ‘तेथील साधक आणि सजीव-निर्जीव सृष्टी कृतार्थ झाली’, असे वाटले.

४. रथोत्सवाच्या वेळी पुलकित झालेली अवघी सृष्टी !

अ. पृथ्वीमाता तीनही गुरूंच्या आगमनाने आनंदून गेली होती. दुपारी ३ वाजता ऊन होते आणि साधक अनवाणी चालत होते, तरीही त्यांच्या पायाला चटके बसत नव्हते.

आ. निसर्गही आनंदून तिन्ही गुरूंचे दर्शन घेत होता. झाडे, पशू आणि पक्षी सर्व सृष्टीला एक निराळीच चमक आली होती.

इ. ऊन-सावल्यांचा खेळ चालू होता. उष्णता वाढू नये, यासाठी सूर्यनारायण मधूनच ढगांमध्ये जात होता आणि तीन गुरूंचे दर्शन घेण्यासाठी काही वेळाने  ढगांमधून डोकावत होता.

ई. मधूनच थंड वार्‍याची झुळुक येत होती.

उ. पक्ष्यांचे २ थवे (श्वेत रंगाच्या पक्ष्यांचा थवा आणि काळ्या रंगाच्या पक्ष्यांचा थवा) रथाच्या वर आकाशात गोलाकार आकारात घिरट्या घालत होते. ‘जणू ते तीन गुरूंना प्रदक्षिणा घालत आहेत’, असे मला जाणवले.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे गुरुदेवा, आपणच या जिवाला शिकण्याची संधी देऊन त्यातील आनंद देत आहात’, त्याबद्दल मी आपल्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे भगवंता, तू आमच्याकडून तुला अपेक्षित अशी साधना करून घेऊन आम्हाला तुझ्या पावन चरणांशी घे’, हीच आर्त प्रार्थना !’

– वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक