सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा होणार असल्याचे मला कळले. तेव्हा त्यात सहभागी होण्याची, त्याची अनुभूती घेण्याची आणि ती अनुभूती आयुष्यभर हृदयात जतन करण्याची माझ्यात तीव्र इच्छा निर्माण झाली. काही कारणास्तव मला रथोत्सवात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. २२.५.२०२२ या दिवशी झालेल्या रथोत्सवाची छायाचित्रे ‘ऑनलाईन’ दैनिक ‘सनातन प्रभात’वर पाहून मी मंत्रमुग्ध झाले. मी रथोत्सवाशी संबंधित सर्व लेख तमिळ भाषेत भाषांतरित केले आणि sanatan.org या संकेतस्थळावर ठेवले, तरीही मला समाधान मिळाले नाही. नंतर ‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन २०२२’ आणि जुलै २०२२ मध्ये झालेली गुरुपौर्णिमा या दिवशी मला रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पहाण्याची संधी मिळाली. ‘रथोत्सव पहाण्याची संधी मिळणे’, ही माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभूती आहे; कारण ज्या ज्या वेळी मी रथोत्सव सोहळा आठवते, त्या त्या वेळी ‘मी रथोत्सवाच्या वेळी प्रत्यक्ष सहभागी होते’, असेच मला वाटते. अध्यात्मात अनेकातून एकात जाणे महत्त्वाचे आहे; मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडून एक अनमोल शिकवण मला शिकायला मिळाली. ती म्हणजे व्यष्टी साधनेत अनेकातून एकात जाणे महत्त्वाचे आहे आणि समष्टी साधनेत एकातून अनेकात जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन २०२२’ आणि जुलै २०२२ मध्ये झालेली गुरुपौर्णिमा यांदिवशी रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पहातांना ‘मी स्वतःच विविध रूपे घ्यावीत अन् विविधांगांनी अद्वितीय रथोत्सव सोहळा अनुभवावा’, असे मला वाटले.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे मधुर हास्य पाहून भावाश्रू अनावर होणे
ज्या मार्गाने रथोत्सव जाणार होता, त्या मार्गात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साधक उभे होते. तेथे मीही एक साधक बनून उभी राहिले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मनमोहक मधुर हास्य पाहून, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे मातृवात्सल्याने ओतप्रोत भरलेले मधुर हास्य पाहून मी परमानंदात न्हाऊन निघाले. माझ्या भावाश्रूंना मी आवरू शकले नाही. ‘रथोत्सव पाहून माझे जीवन सार्थक झाले’, असे मला वाटत होते; तरीही ‘रथोत्सवात सहभागी होण्याचा आनंद अधिकाधिक अनुभवूया’, असेही मला वाटत होते.
२. रथाच्या वर आकाशात भरारी घेणारा पक्षी बनून परात्पर गुरुदेवांच्या चरणी पुष्प अर्पण करणे
नंतर मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बसलेल्या रथाच्या वर आकाशात भरारी घेणारा पक्षी बनले. मी अलगद त्यांच्या चरणकमली एक फूल अर्पण केले. दोन्ही दिव्य मातांनी प्रथम माझ्याकडे असे हळूवारपणे पाहिले की, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची दिव्य दृष्टी माझ्यावर पडली. त्यांनी माझ्याकडे दृष्टी वळवली आणि मोहक स्मितहास्याने मी अर्पण केलेले पुष्प स्वीकारले.
३. रथाच्या समोरून जाणारे लहानसे वासरू बनणे आणि परात्पर गुरुदेवांनी पाठीवरून हात फिरवल्याचे जाणवून अंगावर रोमांच येणे
साक्षात् परमात्मा असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन घेण्यासाठी आता मी रथाच्या समोरून जाणारे लहानसे वासरू बनले. त्यांची दयाळू दृष्टी माझ्यावर पडली आणि ‘त्यांनी माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवला’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच आले.
४. नंतर मी नृत्य सादर करणारी गोपी बनले. मी माझे देहभान विसरले आणि फेर धरून नृत्य करू लागले. संपूर्ण जग परमात्म्याभोवती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याभोवती) फिरत होते आणि आनंदाच्या सागरात डुंबले होते.
५. नंतर मी रस्त्याच्या बाजूला असलेला दगड बनले. या दगडावर उभे राहून साधकाने रथोत्सवाची छायाचित्रे घेतली. त्या साधकात पुष्कळ भाव असल्याचे मला जाणवले. त्या वेळी माझ्या देहावर रोमांच आले.
मला आलेल्या या नवनवीन अनुभूतींमुळे माझ्यात अधिक अनुभूती घेण्याची इच्छा जागृत झाली. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव संपूर्ण विश्वाचे केंद्रबिंदू, म्हणजे सर्वांचे हृदयस्थान आहेत. त्यांच्या दिव्य उपस्थितीमुळे मी सर्व साधक, तसेच निसर्गातील सर्व झाडे, वनस्पती आणि पशू-पक्षी यांच्यात दैवी अस्तित्व अनुभवू शकले.
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, हे दयाघना, हे प्रभो, ‘तुम्ही ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीत कार्यरत असलेला सूक्ष्मातीसूक्ष्म परमाणू आहात. तुम्हीच संपूर्ण विश्वाचे आणि विश्वाच्या पलीकडेही व्यापलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहात. आमच्या अल्प बुद्धीने आम्ही तुमची महानता कधीच ओळखू शकणार नाही.
तमिळ भाषेत एक सुवचन आहे, ‘देवा, तुझ्या चरणकमली नतमस्तक होण्यासाठीही आम्हाला तुझ्या कृपेची आवश्यकता आहे.’ हे दयाघना, ‘माझ्या प्रत्येक श्वासाच्या समवेत मला गुरुस्मरण होऊ दे. माझे गुरुध्यान लागू दे आणि माझ्याकडून गुरुसेवा होऊ दे’, हीच तुमच्या कमलचरणी प्रार्थना !’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |