‘महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे गाव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मस्थान आहे. तेथे ज्या घरात त्यांचा जन्म झाला, त्या घराकडे जाणार्या रस्त्याला १२.५.२०२३ या दिवशी तेथील ग्रामपंचायतीकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे नाव देण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वर्ष २००८ मध्ये म्हणाले होते, ‘हिंदु राष्ट्रामध्ये रस्त्यावरचे फलक अध्यात्माशी संबंधितच असतील !’ रस्त्याला गुरुदेवांचे नाव दिल्याची बातमी वाचून मला त्यांचे ते उद्गार आठवले आणि वाटले, ‘त्यांच्या त्या वाक्याप्रमाणे व्हायला आता त्यांच्या नावापासूनच आरंभ झाला आहे !’
आपण बघतो की, रस्त्यांवर शासनाने विविध फलक लावलेले असतात, उदा. ‘अपघात टाळा !’, ‘अती घाई, संकटात नेई !’, ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक !’, ‘धूम्रपान, मद्यपान म्हणजे आयुष्याची धूळधाण !’, ‘दारू पिऊन गाडी चालवणे, म्हणजे अपघाताला निमंत्रण !’ इत्यादी. असे असूनही अपघात व्हायचे ते होतातच !
याउलट हिंदु राष्ट्रात रस्त्यावरील फलक हे आध्यात्मिक स्तरावरील असतील. यामध्ये साधनेचे थोडक्यात महत्त्व फलकावर लिहिले जाईल. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करा !’, असे लिहिले जाईल. तसेच घाटरस्त्याला आरंभ होण्यापूर्वी असलेल्या फलकावर ‘येथे २ मिनिटे थांबून देवाला प्रार्थना आणि नामजप करा !’, असे लिहिले जाईल. ‘देव चारचाकीत बसला आहे आणि आपण त्याचा चालक आहोत’, असा भाव ठेवा’, असे लिहिले जाईल. यामुळे गाडीच्या चालकाला देवाच्या अनुसंधानात रहाता येईल. चालक देवाच्या अनुसंधानात राहिला, तर देवच त्याची काळजी घेईल आणि अपघात होण्याचे प्रमाण बरेच अल्प होईल. तसेच अपघात होण्याचे कारण ‘अनिष्ट शक्ती’ हेही असते. देवाच्या अनुसंधानात राहिले, तर अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याचे प्रमाणही अल्प होईल. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीतच हिंदु राष्ट्राचा पाया ‘साधना करणे’ हा असेल !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१६.५.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |