‘ग्रेट ब्रिटन’ अटळ विभाजनाच्या दिशेने !

७५ वर्षांपूर्वी भारताच्या धार्मिक फाळणीला खतपाणी घालणार्‍या ‘ग्रेट ब्रिटन’ला नियतीची भेट !

स्वातंत्र्यवादी ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’चा नवा नेता म्हणून पाकिस्तानी वंशाचा हमजा युसूफ याची निवड झाली. हा पक्ष स्कॉटलंडला ग्रेट ब्रिटनपासून वेगळे होऊन ‘स्वतंत्र देश’ घोषित करण्याच्या कार्यसूचीवर (‘अजेंड्या’वर) काम करतो. ज्या ब्रिटीश साम्राज्याने विशाल भारतात स्वतःच्या कुटील धोरणांच्या आधारे हिंदु-मुसलमान आधारावर फाळणी करून २ देश निर्माण केले, त्या ब्रिटनचा आता नियती वेगळ्या मार्गाने प्रतिशोध घेत आहे. ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे आहेत अन् स्कॉटलंडचा आता नवा नेता हमजा युसूफ पाकिस्तानी वंशाचा !

ग्रेट ब्रिटनमध्ये भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशी मुसलमानांनी स्वतःची लोकसंख्या कल्पनेच्या बाहेर वाढवली आहे अन् या देशातील हिंदूही तिथे मोठ्या संख्येने आहेत. ब्रिटनमध्ये मुसलमानांनी अनेक भागांतून गोर्‍यांना हद्दपार करून घोषित-अघोषित ‘शरीयत वस्ती’ (पॉकेट्स) निर्माण केली आहेत. आता या पालटत्या लोकसंख्येचा राजकीय परिणाम या देशांच्या नव्या राजकीय नेतृत्वात दिसत आहे.

१. वर्ष २०१४ मधील स्कॉटिश स्वातंत्र्याचे सार्वमत (रेफरंडम)

आयर्लंडमध्ये ‘आयरिश रिपब्लिकन आर्मी’ आणि तिची राजकीय शाखा ‘सिन्न फेन’ यांचा कित्येक वर्ष आयरिश स्वातंत्र्यासाठी लढा चालू होता. ‘कॅथॉलिक आयर्लंड विरुद्ध प्रोटेस्टंट (बाप्टिस्ट) ब्रिटन’, असा हा संघर्ष होता. वर्ष २०२२ मध्ये परत एकदा सिन्न फेनला आयर्लंडच्या निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यानंतर आयर्लंडची आयरिश ओळख आणि स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आला होता.

वर्ष २०१४ मध्ये ‘स्कॉटलंडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा का ?’, याविषयी एक ‘रेफरंडम’ (सार्वमत) झाला; पण त्यात ५३.३ टक्के लोकांनी स्वातंत्र्याच्या विरोधात आणि ४४.७ टक्के लोकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केले. यामुळे स्कॉटिश स्वातंत्र्याचा मुद्दा मागे पडला; परंतु आता परत एकदा स्वातंत्र्यवादी स्कॉटिश नॅशनल पार्टीचा पाकिस्तानी नेता स्कॉटलंडचा पंतप्रधान होत असल्याने ही चळवळ परत एकदा जोर धरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आयर्लंडमध्येही हिंसक आयरिश रिपब्लिकन आर्मीची राजकीय शाखा सिन्न फेन पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेत आली आहे. त्यामुळे कॅथॉलिक आयर्लंड आणि प्रोटेस्टंट ब्रिटन यांच्यात स्कॉटलंडकडून प्रेरणा घेऊन काय काय राजकीय गणिते नव्याने निर्माण होतात, हा औत्सुक्याचा विषय आहे.

२. स्कॉटलंड आणि खलिस्तानी सार्वमत (रेफरंडम)

कॅनडा आणि ब्रिटन हे खलिस्तानी सार्वमताच्या नावाने भारतातील विभाजनवादी तत्त्वांना खुलेआम पाठबळ देतात. ‘रेफरंडम २०२०’ हा कोरोना महामारीमुळे बारगळलेला उपद्व्यापही पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या समन्वयातून ब्रिटनमधूनच चालू होता आणि आताही चालू आहे. नागा फुटीरतावादी गटांचे सगळे प्रचाराचे (प्रोपागंडाचे) प्रकल्प बाप्टिस्ट चर्चच्या माध्यमातून खुद्द ब्रिटनच्या भूमीवरून अव्याहतपणे गेली ७५ वर्षे चालू आहेतच.

३. ग्रेट ब्रिटनची शकले उडवून आशियायी मुसलमानांचे ‘इस्लामी राष्ट्र’ होण्याची शक्यता

‘कापं गेली आणि भोकं राहिली’, (गतवैभव, संपत्ती, थाट जरी (कर्माने) गेले असले, तरी त्याविषयीचा (पोकळ) अभिमान टिकून असणे.) असे म्हणतात. तीच अवस्था सध्याच्या ब्रिटनची आहे. एकेकाळी अख्ख्या जगावर साम्राज्य गाजवणारे ब्रिटन आज स्वतःचे ‘ग्रेट ब्रिटन’ हे नावही शाबूत ठेवायला धडपडत आहे आणि हळूहळू एकेक देश जात फक्त इंग्लंड शेष राहील, अशी चिन्हे आहेत.

ज्या ज्या देशातून ब्रिटिशांनी १९५० च्या दशकात आपला पाय काढून घेतला, त्या त्या देशात धार्मिक, भाषिक, वांशिक, प्रादेशिक आधारावर विभाजनवादी, फुटीरतावादी चळवळी आणि गटांना निर्माण करून त्यांना ब्रिटीश आजपर्यंत पोसत आहेत. येणार्‍या काळात नियती ग्रेट ब्रिटनची शकले उडवून आणि ब्रिटीश राष्ट्राची ‘गोर्‍या लोकांचे प्रोटेस्टंट ख्रिस्ती राष्ट्र’ ही ओळख पुसून ‘काळ्या आशियायी मुसलमानांचे ‘इस्लामी राष्ट्र’ ही नवीन ओळख देऊनच थांबेल, अशी पुरेपूर शक्यता आहे.

– श्री. विनय जोशी

(साभार : ‘इन्स्टिट्यूट फॉर कनफ्लिक्ट रिसर्च अँड रिझोल्यूशन’चे संकेतस्थळ, २८.३.२०२३)

संपादकीय भूमिका 

एकेकाळी संपूर्ण जगतावर अधिराज्य गाजवणार्‍या ब्रिटनची शकले होणे, हे वसाहतवाद अपयशी असल्याचेच द्योतक !