‘संतभूमी असलेल्या भारतात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई यांच्या रूपाने अलौकिक अन् दिव्य भावंडे जन्माला आली. ‘विरक्ती’, ‘ज्ञान’, ‘भक्ती’ आणि ‘मुक्ती’ यांचे मूर्तीमंत रूप असलेली ही भावंडे जन्मतःच प्रगल्भ होती. मात्यापित्यांच्या देहत्यागानंतर मुक्ताई आपल्या थोरल्या बंधूंची जणू माऊली झाली. मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची, कधी बहीण, तर कधी शिष्या बनायची. ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईने त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केले, तर प्रसंगी तिने ज्ञानेश्वरांना उपदेशही केला. मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचे नाते विलक्षण होते.
ज्ञानेश्वरादी भावंडांविषयी आपण अनेक गोष्टी वाचल्या आहेत. पृथ्वीतलावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याला आरंभ झाला आणि ईश्वरी नियोजनाप्रमाणे उच्च लोकांतील अनेक उन्नत जीव पृथ्वीवर जन्म घेऊ लागले. उपजतच अनेक आध्यात्मिक गुण असलेले हे दैवी जीव अवतारी कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी जन्माला आले आहेत. यातीलच एक प्रगल्भ, आनंदी आणि लोभस बहीणभावाची जोडी म्हणजे जन्मतः ७१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि ६६ टक्के पातळी असलेली त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) !
पू. वामन आणि श्रिया यांना पाहिल्यावर संत ज्ञानेश्वर अन् मुक्ताई यांची आठवण येते. त्या दोघांमधील नाते पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. श्रिया आईच्या वात्सल्याने पू. वामन यांची काळजी घेते. कधी ती ‘मोठी ताई’ होते, कधी ‘सखी’ बनून ती पू. वामन यांच्याशी खेळते, तर बहुतांश वेळा ती ‘शिष्या’ बनून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करते. श्रियाच्या मनात पू. वामन यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ती प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करते. अवघ्या ४ वर्षांचे पू. वामन अगदी मोजक्या शब्दांत तिला साधनेविषयी मार्गदर्शन करतात आणि ती भावार्थ समजून घेऊन त्यांचे आज्ञापालन करते. पू. वामन खोडकरपणाने बालसुलभ लीला करून आपल्या ताईची गंमत करतात, तर श्रिया शरणागत स्थितीत राहून त्यांना प्रार्थना करते आणि त्या लीलांतील आनंद अनुभवते. त्या दोघांच्या बोलण्यात आणि भावविश्वात ‘नारायण’, म्हणजे केवळ ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले’ हेच असतात. पू. वामन आणि श्रिया यांचे नाते अगदी आगळेवेगळे असे आहे.
आताच्या काळात गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे प्रेमळ, समंजस, विरक्त, ज्ञानी, प्रगल्भ आदी गुणांनी युक्त असलेली अशी भावंडे पहायला मिळत आहेत. या अद्वितीय बहीण-भावंडांचे नाव सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिले जाईल.
पू. वामन अन् त्यांची श्रियाताई ।
भासती जणू ज्ञानेश्वर अन् मुक्ताई ।। १ ।।
अलौकिक प्रतिभा अन् प्रगल्भता ।
असे मूर्तीमंत सात्त्विकता अन् सुंदरता ।। २ ।।
गुरुमाऊलीच्या कृपेने जगकल्याणा अवतरली ।
कृतज्ञ गुरुदेवा, ऐसी गुणी भावंडे सनातनला दिली ।। ३ ।।
पू. वामन आणि कु. श्रिया यांच्या रूपात सनातनला संत ज्ञानेश्वर अन् मुक्ताई यांच्यातील सुंदर आध्यात्मिक नाते पहायला आणि अनुभवायला मिळत आहे. ‘साधकांना त्यांच्या सान्निध्याचा लाभ करून घेता येऊ दे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले चरणी नम्र प्रार्थना !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
(२३.४.२०२३)