भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात !

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

नवी देहली – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असून तेथे त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यासह संयुक्त अरब अमिरात यांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. भारत एका विशेष प्रकल्पासाठी काम करत आहेत. या प्रकल्पातून चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’च्या प्रकल्पाला शह देण्यात येणार आहे. भारताच्या या प्रकल्पामध्ये अमेरिका, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांचा मुख्य सहभाग असणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत पश्‍चिम आशियाई देशांना रेल्वेच्या जाळ्याने जोडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला असून त्यात भारताची मोठी भूमिका आहे. ‘भारताने रेल्वेमधील त्याच्या कौशल्याचा वापर करावा’, असे अमेरिकेला वाटत आहे. त्यामुळे या प्रकल्पातून भारताला मोठा लाभ मिळणार आहे. मध्यपूर्व भागात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

जर हा रेल्वे मार्ग सिद्ध झाला, तर भारताला त्याचा थेट लाभ होईल. पश्‍चिम आशियात रेल्वेचे जाळे पसरेल. या भागातून समुद्रमार्गे दक्षिण आशियालाही जोडण्याची योजना आहे. हे यशस्वी ठरले तर अत्यंत वेगाने अल्प खर्चात भारतात तेल आणि गॅस यांचा पुरवठा केला जाऊ शकतो. या रेल्वेमुळे आखाती देशात रहाणार्‍या लाखो भारतियांचा लाभ होऊ शकतो.