परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘श्री गुरु दिव्यदर्शन’ सोहळ्याच्या वेळी केरळ येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांना भरभरून चैतन्य आणि आनंद मिळण्याची महापर्वणी ! प्रत्येक वर्षी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरुदेवांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. २.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे या सोहळ्याचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्यात आले. या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांच्या पूर्वी झालेल्या विष्णुरूपातील ‘डोलोत्सव’ (झोपाळ्यावर बसवून स्तुती करणे) याविषयीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर साधकांना ध्वनी-चित्रफितीद्वारे श्रीराम रूपातील परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले.

हा भावसोहळा पहातांना केरळ येथील धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू आणि साधक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. श्री. राकेश नेल्लिताया, धर्मप्रेमी, कण्णूर

१ अ. दैवी सोहळा पहातांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन होणे : ‘जन्मोत्सवानिमित्तचा दैवी सोहळा मला आणि माझ्या पत्नीला पहाता आला. मला श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) ठिकाणी श्रीरामाचे दर्शन झाले आणि श्रीरामाचे दिव्य चैतन्य अनुभवता आले. मी गुरुदेवांच्या चरणी पूर्णपणे शरणागत आहे. ‘या सोहळ्याला ‘त्रिमूर्ती’ आणि ‘सप्तर्षी’ उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते. माझ्यासारख्या छोट्या जिवाला हा दैवी कार्यक्रम बघण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

२. श्री. सामजित, हिंदुत्वनिष्ठ, आलप्पुषा

२ अ. सोहळ्यापूर्वी केरळ राज्यातील निवडणुकीचे निकाल बघून मन दुःखी होणे, सोहळा पहातांना मन शांत होऊन गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर भावजागृती होणे : ‘भावसोहळा चालू होण्यापूर्वी मी केरळ राज्यातील निवडणुकीचे निकाल बघत होतो. ‘हिंदु संघटनेचा एकही प्रतिनिधी जिंकून आला नाही’, याविषयी हिंदु विरोधकांच्या टीकाटिप्पणी वाचून माझे मन दुःखी झाले होते. ज्या क्षणी मी सोहळा बघण्यास आरंभ केला, त्या क्षणापासून माझे मन शांत झाले. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) दर्शन झाल्यावर माझे सर्व दुःख दूर होऊन माझी भावजागृती झाली आणि डोळ्यांतून अश्रू आले. आता माझी सर्व चिंता दूर झाली असून ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी उत्साहाने प्रयत्न करावा’, असे मला वाटत आहे. ‘गुरु पाठीशी आहेत’, अशी माझी दृढ श्रद्धा आहे.’

३. सौ. सुनिता, जिज्ञासू, कोची

३ अ. दैवी सोहळा बघून मन शांत होणे : ‘हा दैवी सोहळा बघून माझे मन शांत झाले. ‘श्री गुरु आणि सद्गुरुद्वयी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांचे दर्शन झाले’, हे माझे परमभाग्य आहे’, असे मला वाटते. मला रामनाथी आश्रमात जाण्याची इच्छा होत आहे.’

४. सौ. चंद्रिका माहेर, हितचिंतक, कोची

४ अ. सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाल्यामुळे कृतज्ञता वाटणे : ‘भावसोहळा पहातांना परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे मला कृतज्ञता वाटली. ‘सोहळ्यामध्ये सद्गुरुद्वयी (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) अतिशय भावपूर्ण रीतीने सर्व कृती करत होत्या. त्या वेळी ‘आपण केवळ कार्य आणि कृतीच करत असतो’, याची मला जाणीव झाली.’

५. कु. आयुष साईदीपक (आध्यात्मिक पातळी ५४ टक्के आणि वय ९ वर्षे), थिरूवनंतपूरम्

‘भावसोहळा पाहिल्यानंतर मला पुष्कळ चांगले वाटले आणि आनंद झाला.’

६. श्री. नंदकुमार कैमल, कोची

६ अ. वाढलेला आध्यात्मिक त्रास सोहळ्याची पूर्वसिद्धता करतांना उणावणे आणि सोहळा बघतांना परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटणे : ‘मागील ४ – ५ दिवसांपासून माझा आध्यात्मिक त्रास वाढला होता; पण सोहळ्याची पूर्वसिद्धता करायला लागल्यावर माझ्या त्रासाचे प्रमाण उणावले. काही दिवसांपासून भावजागृतीचे प्रयत्न करूनही माझी भावजागृती होत नव्हती; परंतु हा सोहळा बघतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटू लागली. विष्णुस्तुती ऐकत असतांना ‘मी त्या स्तुतीशी एकरूप होत आहे आणि ‘मीच विष्णूची स्तुती करत आहे’, असे मला वाटत होते.’

७. श्री. कनकराज, कन्नूर

‘सोहळा पहातांना ‘मला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला वाटले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ३.५.२०२१)

(क्रमश:)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक