सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी ‘श्री गुरुदेवांचे आपल्या घरी आगमन होणार आहे’, या भावाने त्यांच्या स्वागताची मानस सिद्धता करणे आणि सूक्ष्मातून ते आल्यावर त्यांची मानसपूजा करणे
‘२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा होता. त्या दिवशी ‘श्री गुरुदेवांचे प्रत्येकाच्या घरी आगमन होणार आहे’, याच विचारात माझे मन होते.
‘श्री गुरुदेवांचे आपल्या घरी वास्तव्य होणार’, यापेक्षा परम भाग्य कोणते ?’, या विचारांनी मी त्यांच्या स्वागताची मानस सिद्धता केली. त्यांना पाय धुण्यासाठी पाणी आणि पाय पुसण्यासाठी स्वच्छ कापड ठेवले. त्यांना बसण्यासाठी आसंदी ठेवली. त्यांना बसण्याची विनंती केल्यावर त्यांनी त्याचा स्वीकार केला. नंतर आम्ही त्यांची मानसपूजा केली.
२. कार्यक्रम चालू झाल्यावर गुरुदेवांच्या चैतन्यामुळे वातावरण आनंदी आणि प्रसन्न वाटणे अन् साधकांना आनंद होऊन त्यांची भावजागृती होणे
मी कार्यक्रम चालू होण्यापूर्वी प्रार्थना आणि नामजपादी उपाय केले. कार्यक्रमात गुरुदेवांचे आगमन झाल्यावर मी दोन्ही हात जोडून भावस्थितीत उभा राहिलो. नंतर श्री गुरुचरणांशी नतमस्तक झालो आणि पुढील कार्यक्रम पहाण्यासाठी उत्सुक झालो. श्री गुरुदेवांनी सर्वांकडे पाहून सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले. गुरुदेवांच्या चारही बाजूंना पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसत होता. गुरुदेवांच्या चैतन्यामुळे वातावरण आनंदी आणि प्रसन्न वाटत होते. सगळीकडे सुगंध दरवळत होता. त्यामुळे सर्वांचे मन आनंदाने भरून येत होते. ‘आम्ही जणू त्यांच्याच समोर बसलो आहोत आणि कार्यक्रमात सहभागी झालो आहोत’, असे आम्हाला वाटत होते. त्यातूनच आमची भावजागृती होत होती आणि ‘कार्यक्रम कधी संपला ?’, हे आम्हाला समजलेच नाही.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी शतशः नतमस्तक होऊन ‘त्यांच्या चरणांची धूळ बनून रहाता येऊ दे’, हे एकच मागणे मागतो.
गुरुकृपा आम्हावरी आम्ही भाग्यवंत ।
विसरू कसा गुरु मूर्तीमंत ।।
गुरुचरणांचा लागलासे ध्यास ।
विसरू कसा मी गुरुचरणांस ।।
– श्री. सुरेश दाभोळकर (आताचे वय ७१ वर्षे), रानबांबुळी, ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग. (१४.५.२०२१)
|