गोवा : सांखळी आणि फोंडा नगरपालिकांवर भाजप गटाचे निर्विवाद वर्चस्व !

सांखळीत १२ पैकी ११, तर फोंड्यात १५ पैकी ११ उमेदवार विजयी

भाजप गटाचे निर्विवाद वर्चस्व !

पणजी, ७ मे (वार्ता.) – प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या सांखळी आणि फोंडा येथील नगरपालिका मंडळांवर भाजप गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ५ मे या दिवशी झालेल्या पालिका निवडणुकीसाठीच्या मतदानानंतर ७ मे या दिवशी मतमोजणी होऊन दुपारपर्यंतच राज्य निवडणूक आयोगाने निकाल घोषित केला. सांखळी येथील एकूण १२ जागांपैकी ११ जागांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित गटाच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला आहे, तर फोंडा येथील एकूण १५ जागांपैकी १० जागांवर येथील कृषीमंत्री रवि नाईक यांच्या नेतृत्वाखालील गटाने विजय मिळवला. फोंड्यात मगोप्रणित गटाला ४ जागा मिळाल्या, तर १ अपक्ष निवडून आला. सांखळीत काँग्रेसचे केवळ प्रवीण ब्लेगन बिनविरोध निवडून आले, तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात केवळ ६६६ मतांनी पराभूत झालेले धर्मेश सगलानी यांचा पालिका निवडणुकीत रश्मी देसाई यांच्याकडून ३० मतांनी पराभव झाला. कृषीमंत्री रवि नाईक यांचे दोन्ही पुत्र रॉय आणि रितेश निवडून आले आहेत.

सांखळी पालिका निवडणूक विजयी उमेदवार

यशवंत माडकर, निकिता नाईक, सिद्धी संदेश परब, रश्मी दिलीप देसाई, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, आनंद काणेकर, दयानंद बोरयेकर, दीपा जल्मी, अंजना कामत (सर्व भाजप गट) आणि प्रवीण ब्लेगन

 (सौजन्य : Goa 365 TV)

फोंडा पालिका निवडणूक विजयी उमेदवार

रॉय रवि नाईक, रितेश रवि नाईक, वीरेंद्र ढवळीकर, ज्योती नाईक, शौनक बोरकर, विश्‍वनाथ दळवी, रूपक देसाई, दीपा कोलवेकर, विद्या पुनाळेकर, आनंद नाईक (सर्व भाजप गट), गीताली शेणवी तळावलीकर, शिवानंद सावंत, प्रतीक्षा नाईक, वेदिका वळवईकर (सर्व मगोप्रणित गट) आणि व्यंकटेश नाईक (अपक्ष)

फोंड्यात प्रारंभी गीताली शेणवी तळावलीकर आणि संपदा नाईक यांना समान ४०२ मते मिळाली होती. त्यानंतर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित करायचे ठरले. यात गीताली शेणवी तळावलीकर यांनी बाजी मारली.

सांखळीतील लोक कारवाईच्या भीतीने आमच्यासमवेत यायला घाबरत होते ! – सगलानी यांचा आरोप

धर्मेश सगलानी यांनी पराभव स्वीकारल्याचे सांगतांना सांखळीच्या जनतेसाठी काम करत रहाणार असल्याचे म्हटले. आम्ही गेली १० वर्षे सांखळी पालिकेत सत्तेवर होतो. यंदा लोकांमध्ये ‘आम्हाला मत दिल्यास सरकार सूड उगवेल’, अशी भीती होती. ते आमच्यासमवेत उभे रहाण्यासही घाबरतात, असा आरोप सगलानी यांनी केला आहे.